बेलापुरात आरएसएसचे पथसंचलन

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापनेला १०० वर्ष पूर्ण होत आहेत, त्या निमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने श्रीरामपूर शहरात दसरा सणाचे औचित्य साधून पथसंचलन केले. विशेष म्हणजे या पथसंचलनाला मुस्लिम बांधवांनी पुष्पवृष्टी करून भरभरून प्रतिसाद दिला.

ठिकठिकाणी जातीयवादाचे विष पेरले जात असून हिंदू- मुस्लिम वाद आपण अनेक ठिकाणी ऐकतो, पाहतो परंतु याला अपवाद श्रीरामपूर तालुका आहे असेच म्हणावे लागेल. श्रीरामपूर शहरात नुकतेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथ संचलन झाले या पथ संचलनाचे हिंदू बांधवाबरोबरच मुस्लिम बांधवांनी देखील स्वागत पथसंचलन श्रीरामपुरातील जामा मज्जिद समोर आल्यानंतर मुस्लिम बांधव दुतर्फा उभे राहिले व त्यांनी पथसंचलनात सहभागी असणाऱ्या स्वंयसेवकावर फुलांचा वर्षाव केला. यापूर्वी देखील मुस्लिम बांधवांनी अनेक वेळा एकोप्याचे दर्शन घडविले होते.

अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्राचे मंदिराची उभारणी केली जात असताना तालुक्यातील बेलापूर येथील मुस्लिम बांधवांनी सर्वप्रथम ५१ हजार रुपयांचा निधी मंदिराचे कोषाध्यक्ष व बेलापूर निवासी महंत गोविंद देवगिरीजी महाराज यांच्याकडे सुपूर्त केला होता. त्याचबरोबर दोन वर्षांपूर्वी मुस्लिम बांधवांची बकरी ईद व आषाढी कार्तिकी एकादशी ही एकाच दिवशी आल्याने मुस्लिम बांधवांनी हिंदू बांधवांच्या एकादशीचे पावित्र्य ओळखून बकरी ईद दोन दिवसानंतर साजरी करण्याचा निर्णय घेतला व या निर्णयाचे महाराष्ट्रभर स्वागत करण्यात आले. त्याचबरोबर गणेशोत्सव व मोहम्मद पैगंबर जयंती एकाच वेळेस आल्यामुळे मुस्लिम बांधवांनी हिंदू बांधवांच्या कुठल्याही उत्सवाला अडथळा येऊ नये म्हणून मोहम्मद पैगंबर जयंती व मिरवणूक गणेश विसर्जनानंतर करण्याचा निर्णय घेतला व नुकतेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनात श्रीरामपुरातील मुस्लिम बांधवांनी फुलांचा वर्षाव करून स्वागत केले. हिंदु बांधवांनी देखील मुस्लिम बांधवांचे अभिनंदन केले.

Visits: 42 Today: 3 Total: 1107306
