ट्विटर दबावात! आता महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचेही खाते ‘ब्लॉक’! बाळासाहेब थोरात : जागतिक समाजमाध्यमाने सत्तेच्या दबावाखाली येणं शोभणारं नाही..

वृत्तसंस्था, मुंबई
काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाचं अधिकृत ट्विटर अकाऊंट ब्लॉक केल्यानंतर आता ट्विटरनं राज्यातील काँग्रेस नेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचेही ट्विटर अकाउंट ब्लॉक केले आहे. दिल्लीतील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व खूनाच्या प्रकरणात पीडितेच्या कुटुंबाची ओळख उघड केल्यानंतर झालेल्या विविध घडामोडीत थोरात यांनी राहुल गांधींचे समर्थन केले होते. हाच धागा पकडून ट्विटरने त्यांचे खाते ‘ब्लॉक’ केले आहे. ट्विटरच्या या कारवाईवर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सूचक वक्तव्य केले असून ‘जागतिक समाजमाध्यमाने अशाप्रकारे सत्तेच्या दबावाखाली येणं त्यांना शोभणारं नाही’ असे म्हंटले आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यानंतर काँग्रेस पक्षाचे अधिकृत ट्विटर खाते ‘ब्लॉक’ केल्यानंतर आज ट्विटर इंडियाने राहुल गांधी यांच्या ‘दिल्ली प्रकरणाला’ समर्थन देणार्या नेत्यांचे खातेही ब्लॉक करण्याचा सपाटा लावला असून थोरात यांचे खातेही याच कारणाने ब्लॉक करण्यात आले आहे. ट्विटरच्या कारवाईनंतर पत्रकारांशी बोलतांना मंत्री थोरात म्हणाले की, ’ट्विटर हे जागतिक समाजमाध्यम आहे. त्यावर प्रत्येक जण आपलं मत मांडू शकतो. लोकशाहीत मतस्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य असते. फक्त ते देशाच्या विरोधात नसावे ही अपेक्षा असते. पण जे समाजाच्या हिताचे असते ते मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. राज्यघटने तो अधिकार दिलेला आहे. आम्ही त्याचा वापर करत होतो. राहुल गांधी देखील तेच करत होते. पण आज काँग्रेस पक्षाचे अधिकृत खाते ब्लॉक केले गेले. राहुल गांधी यांचेही यापूर्वीच केले गेले. राहुल गांधी यांचे समर्थन केल्याच्या कारणावरून आपलंही ट्विटर हँडल ब्लॉक करण्यात आले आहे.’

’खरं तर ट्विटर ही आंतरराष्ट्रीय पातळीवरील एक मान्यताप्राप्त संस्था आहे. अशा संस्थेने एखाद्या पक्षाच्या, म्हणजेच भाजपच्या किंवा सत्तेच्या दबावाखाली येणे हे त्यांना शोभणारे नाही. भारतात विचार स्वातंत्र्याची गळचेपी कशी सुरू आहे हे दाखवून देणारे हे उत्तम उदाहरण आहे. ट्विटर त्यासाठी कारणीभूत आहेच, पण त्यापेक्षाही अधिक जबाबदार भाजप आणि केंद्र सरकार आहे’ असा घणाघातही मंत्री बाळासाहेब थोरात यांनी यावेळी केला.

दिल्लीतील एका अल्पवयीन बलात्कार पीडित मुलीच्या आई-वडिलांची राहुल गांधी यांनी भेट घेतली होती. राहुल गांधी यांनी त्या भेटीचे काही फोटो ट्विटरवर ट्विट केले होते. त्यानंतर भाजपसह काहींनी बलात्कार पीडित मुलीच्या कुटुंबीयांची ओळख उघड केल्याबद्दल त्याविरोधात तक्रारी केल्या. त्यानंतर ट्विटरने गांधी यांचे ट्विटर खाते निलंबित करण्याची कारवाई केली. त्यानंतर काँग्रेस पक्षाच्या अधिकृत ट्विटर खात्यासह राज्यातील काँग्रेसचे ज्येष्ठनेते व राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचेही ट्विटर खाते आता ब्लॉक करण्यात आले आहे.

