ओढे-नाले अतिक्रमणमुक्त करण्याचे मंत्री विखे पाटील यांचे आदेश!

नायक वृत्तसेवा, आश्वी
अतिवृष्टीमुळे संगमनेर तालुक्यातील अनेक गावातील शेती अजूनही पाण्याखाली असून, निचऱ्याच्या मार्गांवरील अतिक्रमणामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तालुक्यातील सर्व ओढे–नाले नकाशानुसार अतिक्रमणमुक्त करून त्यांचा नैसर्गिक प्रवाह पुन्हा पूर्ववत करण्याचे संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, यासाठी महसूल, जलसंपदा, जलसंधारण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने संयुक्तपणे कारवाई करावी, असेही निर्देश त्यांनी दिले.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उंबरीबाळापुर,रहिमपुर,जोर्वे शेतकऱ्यांच्या संमतीने त्यांच्या जमिनीतून पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक ते चर तयार करण्याची परवानगी दिली जाईल. तसेच या चरीसाठी लागणारा खर्च शासनाच्या निधीतून करण्यात येईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.अतिक्रमण काढताना सर्व विभागांनी परस्पर समन्वय साधावा आणि शेतकऱ्यांना शक्य तितका दिलासा मिळावा असा सुचना ही यावेळी विखे पाटील यांनी दिल्या. या अनुषंगाने महसूल विभागाच्या पथकाने उंबरी, बाळापूर, रहीमपूर, जोर्वे आणि कोल्हेवाडी या गावांना भेट देत नुकसानग्रस्त परिस्थितीचा आढावा घेतला. पाहणी दरम्यान बंद झालेले पाण्याचे मार्ग, ओढे आणि नैसर्गिक प्रवाह तातडीने मोकळे करण्याचे ठोस निर्णय घेण्यात आले. पावसाचे पाणी शेतांमध्ये साचून राहिल्याने सोयाबीन, मका, कपाशी त्याच बरोबर गुरासाठी चारा म्हणून वापरात असणारा घास, गिन्नी गवत या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

मंत्री विखे पाटील यांनी शक्य तिथे पायी फिरून किंवा अडचणीच्या मार्गावर दुचाकी वाहनावर जावून झालेल्या पिकांची पाहणी केली. तसेच अतिक्रमण झालेल्या ठिकाणी उपस्थित ग्रामस्थांना त्यांनी नकाशा दाखवून ओढ्या नाल्यांच्या मार्ग दाखवून दिला.अनेक ठिकाणी शासनाच्या जागांवर कशी अतिक्रमण आहेत हे त्यांनी निदर्शनास आणून दिले.वर्षानुवर्ष शासकीय यंत्रणेकडून झालेल्या दुर्लक्षामुळे अतिक्रमण निघण्याऐवजी वाढत गेल्याबद्दल प्रशासनावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली.गावात आणि शेतात पाणी येण्याचे कारण फक्त झालेली अतिक्रमण असल्याची जाणीव निसर्गाने करून दिल्याने ओढे-नाले आणि चरावरील अतिक्रमण काढण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेवून शासकीय यंत्रणेस सहकार्य करण्याचे आवाहन मंत्री विखे पाटील यांनी केले.

अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू करण्यापुर्वी सर्व सर्व्हेक्षण करून घ्यावे.ज्यांची अतिक्रमण आहेत, त्यांना नोटीसा देवून वेळ द्यावा. अन्यथा पुढील कारवाई सर्व विभागांनी एकत्रितपणे पूर्ण करावी.आता झालेल्या अतिवृष्टीने आपल्या सर्वाना सूचक इशारा दिला आहे.भविष्याचे संकट वाचविण्यासाठी आत्ताच प्रयत्न करावे लागणार असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी अधिकारी ग्रामस्थांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी प्रांताधिकारी अरूण उंडे, तहसीलदार धीरज मांजरे, गटविकास अधिकारी प्रविण सिनारे, तालुका कृषी अधिकारी रेंजा बोडके यांसह जलसंपदा विभाग,जलसंधारण विभाग,निळवंडे लाभ क्षेत्रातील अधिकारी उपस्थित होते.

Visits: 52 Today: 2 Total: 1108862
