घारगाव व दहा किलोमीटरचा परिसर ‘सतर्क क्षेत्र’ घोषित
![]()
नायक वृत्तसेवा, घारगाव
गेल्या पाच-सहा दिवसांपूर्वी संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील घारगाव येथे मृत कावळे आढळून आले होते. सदर कावळे पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल नुकताच प्राप्त झाला असून कावळ्यांचा मृत्यू बर्ड फ्ल्यू सदृश्याने झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी प्रभावित क्षेत्र व दहा किलोमीटरचा परिसर सतर्क क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. त्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचनाही संबंधित विभागांना दिल्या आहेत.

पशु संवर्धन विभागाला केलेल्या सूचनांमध्ये सर्व कुक्कुटपालनमधील कोंबड्यांची तपासणी करावी आणि मृत आढळल्यास नियंत्रण कक्षास कळवावे, कुक्कुटपालकांनी मृत किंवा आजारी पक्षांची माहिती तालुका पशु संवर्धन अधिकारी व नियंत्रण कक्षास द्यावी, एखाद्या ठिकाणी कोंबड्या किंवा मृत पक्षी आढळल्यास त्यांच्या संपर्कात अन्य पक्षी येणार नाही याची दक्षता घ्यावी, आजारी पक्षांचे विलगीकरण करावे, कुक्कुटपालकांनी जैव सुरक्षेबाबत खबरदारी घ्यावी, सतर्क क्षेत्रामध्ये पाच किलोमीटर त्रिज्येतील प्रभावित क्षेत्रात अंडी, कोंबडी, खत, पक्षीखाद्य, अनुषंगिक साहित्य व उपकरणांची विक्री व वाहतूक करु नये, प्रभावित क्षेत्रातील पक्ष्यांच्या आजाराचे निदान अहवाल प्राप्त होईपर्यंत कुक्कुट पक्ष्यांची खरेदी-विक्री किंवा कत्तलीची दुकाने, वाहतूक, पक्षी प्रदर्शने बंद राहतील, सतर्क क्षेत्रातील पक्षी विक्रीकरिता कोणत्याही बाजारात नेता येणार नाही, पशु संवर्धन विभागाने आजारी पक्ष्यांचे नमुने व मृत पक्षी तात्काळ तपासणीसाठी पाठवावे व अहवाल प्राप्त करुन घ्यावा, मृत पक्ष्यांची विल्हेवाट शास्त्रोक्त पद्धतीने लावण्याकरिता तीन फूट खोल खड्डा करुन त्यामध्ये चुना पावडर टाकून पक्षी पुरावे, याकामी आवश्यकतेनुसार पोलीस बंदोबस्त घ्यावा अशा सूचना निर्गमित केल्या आहेत.
