अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्यास दहा वर्षे सश्रम कारावास
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्यास दहा वर्षे सश्रम कारावास
नायक वृत्तसेवा, नेवासा
नात्यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्या आरोपीस बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायद्यान्वये आणि अत्याचाराच्या कायद्यान्वये दहा वर्षे सश्रम कारावास, दहा हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास तीन महिने सश्रम कारावासाची शिक्षा जिल्हा व विशेष न्यायाधीश एस. एम. तापकिरे यांनी सुनावली आहे.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, आरोपीने नात्यातीलच असणार्या आजोबाच्या घरी असलेल्या अल्पवयीन मुलीस सोयरिकीच्या अनुषंगाने खोटा बहाणा करुन दुचाकीवर बसवून घेऊन गेला. रस्त्यात लघूशंकेचा बहाणा करुन निर्जनस्थळी दुचाकी थांबविली आणि पीडित मुलीवर बळजबरीने लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर आरोपीने पीडितेस बसस्थानकावर सोडून धमकी देत पोबारा केला. घरी परतलेल्या पीडितेने सर्व हकीगत आजी-आजोबांना सांगितली. या प्रकरणी पीडितेच्या भावाने 7 एप्रिल, 2018 रोजी नेवासा पोलिसांत फिर्याद दिली. यावरुन पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंवि कलम 376, 323 व बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा कलम 3 व 4 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा पोलीस उपनिरीक्षक पी. आर. भिंगारे यांनी तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणी दरम्यान नऊ साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्षातर्फे करण्यात आलेला युक्तीवाद ग्राह्य धरुन आरोपीस दहा वर्षे सश्रम कारावास, दहा हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास तीन महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त वकील मयूरेश नवले यांनी काम पाहिले. त्यांना सरकारी वकील एम. पी. गवते, पैरवी अधिकारी पो.कॉ.सुभाष हजारे, नवगिरे, अनिल जाधव, मरकड, शिंदे व अडांगळे यांचे सहकार्य लाभले.
![]()
