सेंद्रीय कर्ब शेतीचा आत्मा असून शेतकर्यांनी जपावा ः बोराळे उंचखडक बुद्रुकमध्ये ऊस पाचट व खोडवा व्यवस्थापन कार्यशाळा

नायक वृत्तसेवा, अकोले
शेतजमिनीच्या सुपीकतेसाठी सेंद्रीय कर्ब अत्यंत महत्वाचा असून सेंद्रीय कर्बाच्या प्रमाणानुसार जमिनीची गुणवत्ता ठरते. सेंद्रीय कर्ब हा शेतीचा आत्मा असल्याने शेतकर्यांनी जपावा. त्यासाठी पाचटकुट्टी करून योग्य ऊस व्यवस्थापन करावा, असा सल्ला संगमनेर भागाचे उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी शेतकर्यांना दिला.

संगमनेर उपविभागातील अकोले, संगमनेर, राहाता व कोपरगाव या चारही तालुक्यात ऊस पिकाचे क्षेत्र मोठे आहे. उंचखडक बुद्रुक येथे ऊस पाचट व खोडवा व्यवस्थापन कार्यशाळा प्रत्यक्ष ऊस शेतात जावून घेण्यात आली. याप्रसंगी बोराळे यांनी मार्गदर्शन केले. शेतातील पाचट जाळण्याची पध्दत परिसरामध्ये सर्रास अवलंबली जाते. यामुळे ऊस उत्पादक शेतकर्यांचे मोठे नुकसान होत आहे. जमिनीचा पोत खराब होवून उत्पादकता कमी होत असल्याने पाचटकुट्टी करून त्याचे खत करा असे प्रभारी तालुका कृषी अधिकारी राजेंद्र बिन्नर म्हणाले.

शेतकरी प्रशिक्षण वर्गादरम्यान अगस्ति सहकारी साखर कारखान्याचे शेतकी अधिकारी सतीश देशमुख, प्रगतशील शेतकरी भाऊ खरात म्हणाले, आपण स्वतः मागील 5 ते 6 वर्षांपासून पाचट न जाळता त्याची कुट्टी करीत आहोत. जमीन भुसभुसीत होवून जमिनीचा पोत सुधारला असल्याचे व उत्पादकता वाढली असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यशाळेसाठी शेतकरी गोरक्ष मालुंजकर, नितीन देशमुख, अनिल देशमुख, सोपान देशमुख, शैलेंद्र देशमुख उपस्थित होते. मंडळ कृषी अधिकारी रवींद्र रोकडे यांनी प्रास्ताविक केले. मंडळ कृषी अधिकारी गिरीष बिबवे, बाळासाहेब बांबळे, कृषी पर्यवेक्षक रायभान गायकवाड, कृषी सहाय्यक हरीभाऊ जाधव यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

पाचट कुजल्यानंतर जमिनीत एकरी दीड ते दोन टन सेंद्रीय खताचा पुरवठा होतो. त्यामुळे जमिनीतील मातीच्या कणांची रचना सुधारुन जमीन भुसभुसीत होते. ऊसाच्या उत्पादनात देखील एकरी 4 ते 6 टनांची वाढ होते.
– सुधाकर बोराळे (उपविभागीय कृषी अधिकारी-संगमनेर)
