घारगाव पोलिसांची निष्क्रियता पुन्हा एकदा चव्हाट्यावर! व्यवस्थेसह वाहनही आजारी; गाय चोरांचे वाहन पकडूनही कारवाईस टाळाटाळ..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांच्या कारकीर्दीत संपूर्ण व्यवस्थाच आजारी पडलेल्या घारगाव पोलीस ठाण्यातून निष्क्रियतेचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. पिंपळगाव देपा येथील शेतकर्यांनी मध्यरात्री पाठलाग करुन पशुधन चोरुन नेणार्या चोरट्यांचे पिकअप वाहन पकडले. याबाबत घारगाव पोलिसांना कळवल्यावर ‘आमचे वाहन नादुरुस्त अहे, तुम्हीच घेवून या’ असे अजब फर्मान अंमलदाराने बजावले. ११२ क्रमांकावर फोन केल्यानंतर मात्र दोघा कर्मचार्यांनी गावात येवून शेतकर्यांसह पोलीस ठाणे गाठले. मात्र या घटनेला पंधरा तासांचा कालावधी उलटूनही गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली जात आहे. रात्रीच पोलिसांनी प्रतिसाद दिला असता तर, पळून जाणारे चोरटे सहज हाती लागले असते. मात्र निष्क्रीयतेत रमलेल्या घारगाव पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष तर केलेच, शिवाय वाहन पकडणार्या शेतकर्यांनाच तासन्तास ठाण्यात बसवून त्याचाच मानसिक छळ सुरु केलाय. यातून घारगाव पोलिसांच्या अनागोंदी व्यवस्थेसह निष्क्रियताही पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.
याबाबत चोरीची घटना घडलेल्या संभाजी राऊत (ता.पिंपळगाव देपा) यांनी दिलेल्या माहितीनुसार सदरची घटना आज पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास पिंपळगाव देपा येथील राऊत वस्तीवर घडली. राऊत यांच्या गोठ्यातून कोणीतरी अज्ञात इसम गाय चोरुन नेत असल्याची कुणकूण अचानक जाग आलेल्या तक्रारदाराच्या आईला लागताच त्यांनी आरडाओरड केली. त्यांच्या आवाजाने घरातील इतर माणसांसह आसपासच्या शेतकर्यांनी बाहेर येवून पाहिले असता राऊत यांच्या गोठ्यातील दोन गाया गायब झाल्या होत्या. त्यातील एक गाय त्यांनी आधीच वन विभागाच्या हद्दीत उभ्या केलेल्या वाहनात नेवून चढवली होती, दुसरी गाय घेवून जात असताना सदर महिलेने पाहिले.
यावेळी शेतकर्यांनी वनविभागाच्या जमिनीकडे जावून पाहिले असता चोरटे पिकअप वाहनातच असल्याचे व पाठीमागील बाजूस त्यात एक गाय असल्याचे दिसले. चोरट्यांची संख्या माहिती नसल्याने शेतकर्यांनी लांबूनच चोरट्यांच्या दिशेने दगडे भिरकावली. त्यामुळे घाबरलेले चोरटे वन विभागाच्या जागेतच वाहन सोडून चालवत नेलेल्या गाईसह पसार झाले. त्यानंतर संभाजी राऊत यांनी घारगाव पोलिसांना फोन करुन कळवले असता त्यांना धक्कादायक उत्तर मिळाले. पहाटेच्या गारव्यात रात्रपाळीच्या अंमलदारावर झोपेचा अंमल असल्याने त्याने ‘वाहन नादुरुस्त असून तुम्ही ती गाडी घेवून इकडे या..’ असे फर्मान सोडले.
त्यानंतर राऊत यांनी ११२ क्रमांकावर फोन केल्यानंतर काही वेळातच मोटारसायकलवरुन दोन पोलीस कर्मचारी आले व त्यांनी चोरट्यांच्या वाहनासह घारगाव पोलीस ठाणे गाठले. यावेळी संभाजी राऊत यांच्या सोबत सोपान गुंड, लक्ष्मण गांजवे, भाऊसाहेब गुळवे व गणेश गुंड आदी शेतकरीही चोरट्यांनी एक गाय चोरुन नेल्याची तक्रार देण्यासाठी पोलीस ठाणे गाठले. मात्र साहेब निद्रीस्त असल्याने सकाळी या, असे अंमलदाराने बजावले. त्यानुसार वरील पाचही शेतकरी आज सकाळी ९ वाजल्यापासून घारगाव पोलीस ठाण्यात ताटकळत आहेत. मात्र दुपारी तीन वाजेपर्यंत कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता. यातून घारगावचे पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांचा मनमानी कारभार आणि निष्क्रीयता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.
४६ गावांचा व्याप असलेल्या घारगाव पोलीस ठाण्याची व्यवस्था सध्या पूर्णतः ढासळली आहे. अकार्यक्षम पोलीस निरीक्षक लाभल्याने खुनासारख्या प्रकरणांचा तपासही दुरापास्त झाला आहे. अशात आता शेतकर्यांच्या पशुधनाची चोरी होण्याच्या घटनाही सारख्या वाढत असताना त्यांना पायबंद घालण्याची नामी संधी मिळूनही निष्क्रीय घारगाव पोलिसांनी ती दवडली. याप उपरांतही शेतकर्यांनीच पोलीस ठाण्यात वाहन आणूनही गुन्हा दाखल करण्यास होत असलेली टाळाटाळ जिल्हा पोलीस प्रमुखांच्या वारंवार ‘अभय’ देण्याच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण करीत आहे. या सर्व घटनांमुळे पठारभागात असंतोष खदखदत असून केवळ राजकीय दबावात निष्क्रीय अधिकारी कितीकाळ सहन करावा अशा प्रतिक्रिया आता उमटू लागल्या आहेत.