कारवाडी शाळेचा लोकसहभागातून कायापालट! अयुष्यत संस्थेची मोलाची मदत; ई-लर्निंगचीही सुविधा
नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यातील रत्नागिरी देवीच्या पायथ्याशी असलेल्या गर्दणी गावच्या कारवाडी शाळेने अयुष्यत संस्थेच्या सहकार्यातून कात टाकली आहे. याचबरोबर अंतर्बाह्य भिंती बोलक्या झालेल्या आहेत. त्यामुळे खर्या अर्थाने विद्यार्थी आनंददायी शिक्षणाची अनुभूती घेणार आहे.
कारवाडी शाळेत पहिली ते चौथी पर्यंतचे अठ्ठावीस विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आदिवासी कुटुंबातील हे विद्यार्थी असल्याने पालकांची आर्थिक परिस्थितीही हलाखीची आहे. त्यामुळे पालकांकडून मदत मिळणे कठीणच होते. परंतु शाळेने या समस्येवर मात करत प्रयोगशील मुख्याध्यापिका सुनीता देशमुख यांनी ठाणे येथील अयुष्यत संस्थेची मदत घेत शाळेच्या कायापालट करण्याचा संकल्प केला. शाळेत आवश्यक कामांची सुरुवात केली. संस्थेशी चर्चा करत मुलांसाठी आवश्यक असणार्या आनंददायी अभ्यासपूर्वक वातावरण निर्मितीसाठी शाळेला रंगरंगोटी केली, बोलक्या भिंती निर्माण केल्या, ध्वजस्तंभ बांधला, मुलांच्या सुरक्षिततेसाठी पडवीला संरक्षक जाळी बसविली, आकर्षक प्रवेशद्वारही तयार केले अशा सर्वच सोयी-सुविधा अयुष्यत संस्थेच्या सहकार्यातून उपलब्ध करून घेतल्या.
याबरोबरच विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञानाची ओळख व्हावी म्हणून ई-लर्निंग अभ्यासक्रमाचे शैक्षणिक सॉफ्टवेअरही घेण्यात आले. यामुळे मुलांचे शिकणे अधिक गतिमान होणार आहे. कुतूहलामुळे संगणकावर शिकताना मुले आनंदी होणार आहे. नुकताच या शाळेत नूतनीकरण व रंगरंगोटी कामाचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला. यावेळी संस्थेचे पदाधिकारी डॉ. मिलिंद बागुल, दीपाली जाधव, किरण चौधरी, देवठाण बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी अनिल गायकवाड, केंद्रप्रमुख कोरडे, माजी जिल्हा परिषद सदस्य पर्बत नाईकवाडी, रामनाथ मुर्तडक, सरपंच लक्ष्मण दिघे, अशोक रावते, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब मधे, सदस्य रावसाहेब फोडसे, ग्रामस्थ यांसह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याध्यापिका सुनीता देशमुख यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत राजाराम बांबळे यांनी केले. सूत्रसंचालन गाडेकर यांनी केले तर आभार नितीन मडके यांनी मानले.
कारवाडी शाळेत शंभर टक्के आदिवासी समाजाची मुले शिक्षण घेत असून येथील पालकांची परिस्थितीही नाजूक आहे. त्यामुळे ठाणे येथील अयुष्यत संस्थेशी संपर्क करत त्यांची मदत मिळवली. शाळेची रंगरंगोटी आकर्षक झाल्याने मुलांची उपस्थिती वाढली आहे. यामुळे मुलांचं शिकणं अधिक आनंददायी होणार आहे.
– सुनीता देशमुख (मुख्याध्यापिका-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कारवाडी गर्दणी)