तांत्रिक अडचणी लवकरच दूर होतील : आ.खताळ

नायक वृत्तसेवा, संगमनेर 
राज्य शासनाने मालमत्ता करावरील शास्तीमाफीसह अभययोजना राबविण्यास मान्यता दिली असली, तरी नगर परिषद प्रशासनाला तिची अंमलबजावणी करतांना अडचणी येत होत्या. या तांत्रिक अडचणी लवकरच दूर होतील असा विश्वास आ. अमोल खताळ यांनी व्यक्त केला.
विशेष म्हणजे ३१ मार्च २०२५अखेरची थकबाकी रक्कम Integrated Web Based Portal (IWBP) वर उपलब्ध नसल्यामुळे संगमनेर नगरपरिषदेपुढे शास्ती माफीचा लाभ नागरिकांना देणे अवघड बनले होते. या पार्श्वभूमीवर सकारात्मक हालचालींना आता सुरुवात झाली असून पुढील काही दिवसांत संगमनेरकरांना शास्तीमाफीचा प्रत्यक्ष फायदा मिळणार असल्याने करदात्यांना यातून मोठा दिलासा मिळणार आहे.
शहरात मालमत्ताकराशी संबंधित शास्ती माफीचा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. शास्तीची रक्कम करदात्यांसाठी अतिरिक्त ओझे ठरत होती. ‘अभय योजना’ ही शासनाची घोषणा झाल्यापासूनच नागरिकांमध्ये आशेचे वातावरण होते मात्र त्याच्या अंमलबजावणीतल्या तांत्रिक अडचणींमुळे योजना प्रत्यक्षात यायची बाकी होती. या गंभीर प्रश्नी आ. अमोल खताळ यांनी थेट उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधून नगरपरिषद प्रशासनासमोरील अडचणी, पोर्टलवर थकबाकीची अपूर्ण नोंद आणि नागरिकांना वेळेत दिलासा न मिळाल्यास निर्माण झालेल्या परिस्थितीची सविस्तर माहिती दिली. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी हा विषय गांभीर्याने ऐकून घेतला असून, पुढील १० ते १५ दिवसांमध्ये शास्तीकर माफीच्या अंमलबजावणीबाबत ठोस निर्णय घेण्यात येईल अशी ग्वाही दिली. यावेळी माजी उपनगराध्यक्ष जावेद जहागीरदार, शशांक नमन, राहुल भोईर उपस्थित होते.
Visits: 64 Today: 2 Total: 1098751

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *