म्युच्युअल फंड उद्योग शंभर लाख कोटींच्या उंबरठ्यावर : कडलग 

थोरात साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी गिरविले अर्थसाक्षरतेचे धडे 

नायक वृत्तसेवा, संगमनेर  
असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया नुसार, ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत भारतीय म्युच्युअल फंड उद्योगाची मालमत्ता (ॲसेट्स अंडर मॅनेजमेंट एयुएम) ₹ ७५.१९ लाख कोटींवर पोहोचले आहे. त्यामध्ये महिन्याला एसआयपीद्वारे येणारी  रक्कम ₹ २८,२६५ कोटी असल्याने म्युच्युअल फंड  उद्योग हा जवळपास शंभर लाख कोटींच्या उंबरठ्यावर असल्याचे प्रतिपादन सुनील कडलग यांनी केले.
संयुक्त राष्ट्रांनी २०२५ हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केले आहे. ‘सहकारातून समृद्धी’ या अभियानाद्वारे गाव पातळीवरील सहकारी संस्थांना अधिक सक्षम करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात असून त्या पार्श्वभूमीवर सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्यातील कर्मचाऱ्यांसाठी  ‘चला अर्थसाक्षर होऊयात’ या उपक्रमाचे सोमवार  दि. २९ रोजी कारखाना गेस्ट हाऊसच्या कॉन्फरन्स हॉल येथे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी कडलग प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर तर प्रमुख अतिथी म्हणून एन.जे. वेल्थचे शुभम कोळी,  व्हाईट ओक असेट मॅनेजमेंटचे मार्तंड पंढरकर उपस्थित होते.
कडलग पुढे म्हणाले की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी घुलेवाडीच्या माळरानावर नंदनवन फुलवले म्हणून संगमनेर तालुक्याची अर्थव्यवस्था नगर जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रातही सक्षम आहे. सहकार चळवळीने महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या अर्थकारणाला बळकट केले आहे. त्यामुळेही इक्विटी मध्ये पैशांचा ओघ वाढत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची अर्थव्यवस्था ही अत्यंत मजबूत असल्याने  भारत जगासाठी आश्वासक असे गुंतवणूक केंद्र  बनले आहे. ब्रिटनला मागे टाकून भारत जपानला मागे टाकत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. हे यश २०२५ च्या मध्यात प्राप्त झाले, जेव्हा भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पादनाने (जीडीपी) ४ ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा ओलांडला आहे.
भारताचा जीडीपी वाढीचा वेग बघता २०४७ पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था जागतिक पातळीवर दुसऱ्या क्रमांकाची होईल असा आशावाद सुनील कडलग यांनी व्यक्त केला. म्युच्युअल फंड एसआयपी माध्यमातून संपत्ती निर्माण व स्वॅपच्या माध्यमातून नियमित उत्पन्न हा यशाचा मार्ग आहे. वाढत्या महागाईवर मात करण्यासाठी बँकेच्या मुदतठेवी अपयशी ठरल्या असून त्यांना सुरक्षित ऐवजी आता ऋण परतावा देत असल्याने धोकादायक सुरक्षित असे म्हणावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले. आणि म्हणूनच महागाईवर मात करण्यासाठी इक्विटी म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक योग्य ठरेल असा सल्ला त्यांनी दिला. कमी किंमतीत टर्म इन्शुरन्स, पुरेसा आरोग्य विमा,  वैयक्तिक अपघात विमा, वाहन विमा आणि इक्विटी म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून संपत्ती निर्माण  या विषयी त्यांनी मार्गदर्शन केले.
प्रास्ताविकात  कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी म्युच्युअल फंड गुंतवणूक करताना सल्लागारांचे मार्गदर्शन मोलाचे ठरते असे सांगितले. कर्मचारी व शेतकरी अर्थशाक्षर झाल्यास तर जीवन संपन्न होईल असे त्यांनी सांगितले.
अशोक कवडे, किशोर देशमुख,  शरद देशमुख, सतीश  मौर्य, अनिल पाटोळे,भारत  देशमुख, बापुसाहेब  शिंदे, महेश खैरे यांनी विचारलेल्या प्रश्नांना सुनील कडलग व जगन्नाथ घुगरकर यांनी उत्तरे दिली. याप्रसंगी कारखान्याचे सेक्रेटरी किरण कानवडे, अमोल दिघे, नवनाथ गडाख,अशोक मुटकुळे, संजय पाटील, भाऊसाहेब खर्डे आदी अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.सूत्रसंचालन किशोर  देशमुख  यांनी तर आभार अनिल पाटोळे यांनी मानले.
Visits: 51 Today: 3 Total: 1108449

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *