कोविडच्या नियमांचे पालन करा असे सांगणाऱ्या पोलिसांवरच संगमनेरात गुंडांचा हल्ला..! बॅरिकेट्स तोडून, तंबू उखडून पोलिसांसह खासगी वाहनांवरही तुफान दगडफेक..

नायक वृत्तसेवा संगमनेर

रोजा सुटण्याच्या वेळी मोठी गर्दी उसळल्याने ती रोखण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच जमावाने हल्ला करण्याची संतापजनक घटना आज सायंकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास संगमनेरातील तीनबत्ती चौकात घडली. याप्रकरणी सहा निष्पन्न आरोपींसह अज्ञात दहा ते पंधराजणांवर सरकारी कामात अडथळा आणण्याच्या कलमासह भादवीच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत अहमदनगर येथील राज्य राखीव पोलीस दलातील काही कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली. यावेळी जमावाने तुफान दगडफेक करून काही खाजगी वाहनांचेही नुकसान केले आहे. या घटनेने सायंकाळच्या सुमारास संगमनेर शहरातील वातावरण काही काळ तणावपूर्ण बनले होते. मात्र पोलिस उपअधीक्षक राहुल मदने व पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला आहे. या प्रकरणी अद्यापपर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

कोविडच्या काळात जिथे सुख संपन्न आणि सामान्य असे दोन्ही नागरिक आपल्या घरात राहून सुखाचे जीवन जगत असताना आपले घरदार सोडून त्यांच्या सुरक्षेसाठी दिवस-रात्र रस्त्यावर उभे राहून नागरिकांची सुरक्षा करणाऱ्या पोलिसांवरच हल्ला झाल्याने संगमनेरातून प्रचंड संताप व्यक्त होत आहे. या हल्ल्याला जबाबदार असलेल्या सर्व गुंडांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी संगमनेरकरांमधून व्यक्त होत आहे.
याबाबत प्राप्त झालेल्या माहितीनुसार, सध्या रमजानचा पवित्र महिना सुरू आहे. आज (ता.6) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास उपवास सुटण्याच्या वेळी लखमीपूरा परिसरात मोठी गर्दी झाली होती. यावेळी गस्तीवर असलेली अहमदनगर येथील राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी त्याठिकाणी पोहोचली. यावेळी परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी करणाऱ्या बहुतेक कोणत्याही नागरिकाने मास्कही घातलेला नव्हता आणि त्यांच्याकडून सामाजिक अंतर नावाच्या नियमांची उघड पायमल्ली सुरु होती. त्यामुळे गस्ती पथकातील राज्य राखीव दलाच्या जवानांंनी तेथे जमलेली गर्दी हटवण्याचे प्रयत्न सुरू केले. यावेळी अनेकांनी पोलिसांच्या अस्तित्वाकडेच दुर्लक्ष करुन आपली मनमानी सुरु केल्याने जवानांनी जमावाला पांगवण्यासाठी हातातील काठ्यांचा धाक दाखवण्याचा प्रयत्न केला.
त्यामुळे जमावातील काही असंवेदनशील तत्त्वांचा आपले ‘मनसुबे’ पूर्ण करण्याची आयती संधी मिळाली. त्यांनी जमलेल्या गर्दीतील तरुणांना भरकटवून पोलिसांविरोधात भडकावण्यास सुरुवात केली. तो पर्यंत राखीव दलाचे जवान तेथून निघून तीनबत्तीकडे निघाले. दरम्यानच्या काळात काहीजणांनी काहीजणांची माती भडकवल्याने संतप्त झालेले जमावातील काही तरुण पुणे महामार्गावर आले. तेथील बॅरिकेड्स फेकून देत हा जमाव तीनबत्ती चौकाच्या दिशेने पुढे सरकू लागला.
रस्त्यात येईल तो सरकारी अडथळा फेकून देत हा जमाव चौकात पोहोचला. यावेळी राज्य राखीव पोलीस दलातील एका निधड्या छातीच्या जवानाने साठ ते सत्तर जणांचा जमाव एकट्याने रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र डोक्यात दगडं भरलेल्या जमावातील काहींनी त्यालाच धक्काबुक्की करीत मारहाण करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्या जवानाला आपला जीव वाचवण्यासाठी तेथून पलायन करावे लागले. त्यानंतरही जमावाने परिसरात दगडफेक करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यात काही खाजगी वाहनांचे नुकसानही झाले आहे.
 यावेळी जमावातील काही माथेफिरुंनी तिनबत्ती चौकातील लिंबाच्या झाडाखाली पोलिसांनी निवाऱ्यासाठी ठोकलेला तंबूही उखडून रस्त्यावर फेकून दिला. यावेळी तीनबत्ती चौकात सुमारे शंभर ते दिडशे जणांचा मोठा जमाव जमला होता. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सलमान शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलिसांनी जुबेर हॉटेलचा चालक, तेथील सर्व कर्मचारी, निसार खिचडीवाला, जाकीर खान, मोहम्मद हनीफ रशीद शेख, अरबाज शेख या निष्पन्न आरोपींसह अन्य दहा ते पंधरा जणांवर भारतीय दंड संहितेच्या कलम 353, 332, 337 यासह दंगलीचे कलम 143, 147 तसेच 188, 269 व क्रिमिनल अमेंडमेंट कायदा 1932 चे कलम 7 प्रमाणे वरील सर्वांवर गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर निष्पन्न आरोपींसह बहुतेकजण सर्व आरोपी पसार झाले आहेत. या घटनेने संगमनेर शहरातून प्रचंड संताप व्यक्त होत असून थेट पोलिसांवरच हल्ला करणाऱ्या जमावातील कोणाचाही मुलाहिजा सांभाळला जाऊ नये अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
सध्या संगमनेर तालुक्यात कोविडचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्यासह संगमनेरातही कठोर निर्बंध लागू आहेत. अशा स्थितीत सकाळी सहा वाजेपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत संगमनेरकरांच्या सुरक्षेसाठी ऊन, वारा, पाऊस झेलीत, विविध असुविधा सहन करीत पोलीस विभागातील कर्मचारी आपले कर्तव्य पूर्ण करीत आहेत. मात्र केवळ कोविड नियमांचे पालन करा असे सांगणार्‍या पोलिसांवरच झालेला हा हल्ला असंवेदनशीलतेचे मोठे उदाहरण ठरला आहे. या प्रकरणात ज्यांचा सहभाग असेल त्या सर्वांवर कठोर कारवाई करून त्यांच्यावर कायद्याचा धाक निर्माण करण्याची गरज संगमनेरकरांमधून व्यक्त होत आहे. काही वर्षांपूर्वी तत्कालीन पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे व त्यांच्या सहकाऱ्यांवरही तालुक्यातील कुरण येथे संतप्त जमावाने असाच हल्ला केला होता. आजच्या घटनेने त्याची पुनरावृत्ती झाली आहे.
Visits: 17 Today: 1 Total: 118879

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *