खेळ पैठणीचा कार्यक्रमाला महिलांचा उदंड प्रतिसाद!
आय लव संगमनेरच्या वतीने नवरात्रीनिमित्त दर्जेदार कार्यक्रमाचे आयोजन

नायक वृत्तसेवा, संगमनेर
आ.सत्यजित तांबे यांच्या संकल्पनेतून तालुक्यातील नागरिकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सुरू झालेल्या आय लव संगमनेर चळवळीच्या वतीने आयोजित खेळ पैठणीचा या कार्यक्रमाला संगमनेर शहरातील महिलांचा उदंड प्रतिसाद मिळाला असून नवरात्रीनिमित्त होणाऱ्या या कार्यक्रमाला महिलांची पहिली पसंती मिळाली आहे.

शहरातील गणेशनगर,महाराणा प्रताप चौक, आदर्श कॉलनी, मालदाड रोड,ऑरेंज कॉर्नर, आझाद चौक या ठिकाणी हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, डॉ. मैथिली तांबे, डॉ. जयश्री थोरात यांच्यासह संगमनेर मधील आय लव संगमनेर चळवळीच्या महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
टीव्हीवरील लाईव्ह कॉन्सर्ट प्रमाणे या कार्यक्रमाचे दर्जेदार आयोजन करण्यात आले असून यामध्ये राज्यस्तरीय निवेदक राजेश मंचरे,ईश्वरी खैरे, अमोल पानसरे व लयभारीची टीम गोकुळ राहाणे आणि वंदना राहाणे यांनी सहभाग घेतला. यामध्ये प्रत्येक ठिकाणी १८ महिलांना विविध बक्षिसे देण्यात आली. राजेशाही पैठणी, कुकर, कढई तर उपस्थित सर्व महिलांना शुगर फ्री डबा देण्यात आला.

या खेळामध्ये नवऱ्याचे नाव घेणे, गाण्यांच्या भेंड्या, जनरल नॉलेज विषयीचे प्रश्न, महिलांच्या आवडीनिवडी, हास्यविनोद, खेळ पैठणीचा अशा मनोरंजनात्मक खेळाने सर्वांची मने जिंकली. उपस्थित महिलांचा उदंड प्रतिसाद आणि आयोजन हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य राहिले. जिंकलेल्या प्रत्येक महिलेल्या राजेशाही पैठणी देण्यात आली.
यावेळी दुर्गा तांबे म्हणाल्या की, नवरात्र उत्सव हा नारीशक्तीच्या सन्मान करण्याचा उत्सव आहे. महिलांसाठी हे मोठे आनंदाचे पर्व आहे. या काळात सर्व महिला उपवास करतात. भक्ती आणि शक्तीचा एकत्र संगम म्हणजे नवरात्री असे सांगताना या काळामध्ये आय लव संगमनेर चळवळीच्या वतीने महिलांसाठी राबवलेला खेळ पैठणीचा हा कार्यक्रम अत्यंत आनंददायी ठरत असल्याचे त्या म्हणाल्या.

डॉ.मैथिली तांबे म्हणाल्या की, संगमनेर शहरांमधील युवक व युवतींच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी आय लव संगमनेर हे व्यासपीठ निर्माण करून देण्यात आले आहे. या माध्यमातून सातत्याने विविध उपक्रमांचे आयोजन केले जात असून पैठणीचा खेळ या मनोरंजनात्मक कार्यक्रमांमधून महिलांमधील असलेल्या सुप्त कलागुणांना संधी मिळणार आहे. हे सामाजिक व सांस्कृतिक व्यासपीठ असून यामध्ये युवक व युवतींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.

डॉ.जयश्री थोरात म्हणाल्या, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर शहर व तालुका हा वैभवशाली ठरला आहे. एक तालुका एक परिवार ही संकल्पना राबवताना सातत्याने विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन हे संगमनेर शहराचे वैशिष्ट्य राहिले आहे. महिलांसाठी आनंदाचा काळ असून सर्व महिलांनी मोठ्या संख्येने आय लव संगमनेरच्या खेळ पैठणीच्या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले. चारही ठिकाणी झालेल्या कार्यक्रमांना महिलांची मोठी उपस्थिती होती.

Visits: 79 Today: 4 Total: 1114869
