केंद्र सरकार सहकार चळवळ मोडू पाहत आहे ः सिद्धरामय्या संगमनेरात जयंती महोत्सव; विविध मान्यवरांची मोठी उपस्थिती

नायक वृत्तसेवा, संगमनेर
भारत अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण आहे तो फक्त काँग्रेसमुळेच. सहकार चळवळ ही ग्रामीण भागाला सशक्त बनवते. मात्र केंद्र सरकार सहकार चळवळ मोडू पाहत आहे. राज्याचे सर्व अधिकार त्यांनी ताब्यात घेतले आहेत, अशी घणाघाती टीका कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली.

संगमनेर शहरातील जाणता राजा मैदान येथे जयंती महोत्सव समितीच्यावतीने पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते. तर व्यासपीठावर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला, कर्नाटकचे मंत्री एच. के. पाटील, माजी मंत्री, आमदार जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री, आमदार भास्कर जाधव, काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात, माजी मंत्री मधुकर चव्हाण, आमदार डॉ. विश्वजीत कदम, आमदार रवींद्र धंगेकर, झिशान सिद्दकी, सत्यजीत तांबे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार शिरीष चौधरी, आमदार राजेश राठोड, माजी आमदार मोहन जोशी, माजी आमदार नामदेव पवार, आमदार हिरामण खोसकर, आमदार लहू कानडे, कांचन थोरात, दुर्गा तांबे, बाजीराव खेमनर, रणजीतसिंह देशमुख, इंद्रजीत थोरात आदिंसह विविध मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन स्वातंत्र्यसेनानी, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात व डॉ. अण्णासाहेब शिंदे यांनी स्वातंत्र्यप्राप्तीसाठी व स्वातंत्र्यानंतर जीवनभर कार्य केले. सहकारातून शेतकर्यांच्या जीवनात समृद्धी निर्माण करणारे सहकारमहर्षी थोरात व डॉ. शिंदे यांचे सहकारासह देश उभारणीत मोठे योगदान असून, यामुळेच ग्रामीण भागात आर्थिक समृद्धी निर्माण झाली आहे. सध्या देशात काँग्रेसमय वातावरण असून भाजपची हुकूमशाही रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे, असे आवाहनही त्यांनी केले.

माजी मंत्री, आमदार भास्कर जाधव म्हणाले, संगमनेरच्या सहकार, शिक्षण, नम्रता ही राज्यासाठी दिशादर्शक आहे. भाऊसाहेब थोरात यांच्या संस्कारातून बाळासाहेब थोरात काम करत असून प्रगतिशील तालुका ही ओळख राज्यात नव्हे तर देशासाठी मार्गदर्शक आहे. स्वातंत्र्यसेनानी भाऊसाहेब थोरात व डॉ. अण्णासाहेब शिंदे या दोन विभूतींनी हा परिसर सुजलाम सुफलाम केला. थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर हे सहकाराची पंढरी ठरली आहे.

तर माजी मंत्री, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राम कृष्ण हरी म्हणत आपल्या भाषणाची सुरुवात केली. आपण कायम गांधीवादी विचार जपला असून जिवंत आहे तोपर्यंत हा विचार आपण सोडणार नाही. असे सांगताना देशाचा कोणताही पंतप्रधान दुसर्या देशात जातो तेव्हा महात्मा गांधी यांचेच नाव सांगतो. संगमनेरमध्ये शेतकर्यांसाठी अत्यंत चांगले काम सहकाराच्या माध्यमातून झाले असून येथे निष्ठा जपली आहे. मीही कायम निष्ठा जपली असून बापाला घरी बसा असे सांगणारे काही लोक आहेत, असा नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टोला लगावला. उत्कर्षा रुपवते, उल्हास लाटकर, जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे, बाबा ओहोळ, शंकर खेमनर, राजवर्धन थोरात, काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे, सचिन सावंत, राजू वाघमारे, डॉ. शोभा बच्छाव, संजय फड आदिंसह जिल्ह्यातील व संगमनेर तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. स्वागत माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले. प्रास्ताविक माजी मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले तर कर्करोगतज्ज्ञ डॉ. जयश्री थोरात यांनी आभार मानले.

उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मान..
साहित्य, सहकार, समाजकारण व पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ गांधीवादी नेते माजी आमदार उल्हास पवार यांना स्वातंत्र्यसैनिक भाऊसाहेब थोरात पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. तर कृषी संशोधन व शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दलचा हरितक्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्कार जैन उद्योग समूह जळगाव यांना देण्यात आला. अमृतवाहिनी शिक्षण संस्थेच्यावतीने एक लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. तर भाऊसाहेब थोरात सेवाभावी संस्थेच्यावतीने आमदार पी. एन. पाटील यांना गौरवण्यात आले.
