‘सुरत-चेन्नई’ एक्सप्रेस महामार्ग ठरणार जिल्ह्यासाठी ‘गेमचेंजर’! दक्षिणेसह उत्तरेचेही प्रवेशद्वार उघडणार; संगमनेर तालुक्यातील तिनशे हेक्टर जमीनीचे संपादन..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
पायाभूत सुविधांच्या माध्यमातून देशाचा आर्थिक विकास साधण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतमाला ही महत्त्वकांक्षी योजना जाहीर केली होती. तब्बल सात लाख कोटी रुपये खर्चाच्या या योजनेत महाराष्ट्रालाही 11 महामार्ग मिळाले आहेत. त्यातील ‘सुरत ते चेन्नई’ या देशातील दुसर्या सर्वात जास्त लांबीच्या एक्सप्रेस महामार्गाला केंद्रीय अर्थ मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. पुढील पंधरा दिवसांत केंद्रीय मंत्रीमंडळाच्या अंतिम मंजुरीनंतर पहिल्या टप्प्यात नाशिकच्या आंबेगाव ते सोलापूर या 413 किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी भूसंपादन आणि आडगाव ते सोलापूरपर्यंतच्या 383 किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे बांधकाम सुरु होणार आहे. जिल्ह्यातील चार तालुक्यांमधून शंभर किलोमीटर जाणार्या या महामार्गाच्या कामात संगमनेर तालुक्यातील 18 गावांमधील 282 हेक्टर जमीनीचे संपादन होणार आहे. या ग्रीनफिल्ड प्रकल्पामुळे दक्षिण भारतासह उत्तर भारताचेही प्रवेशद्वार उघडणार असल्याने हा महामार्ग अहिल्यानगर जिल्ह्याच्या विकासात ‘गेमचेंजर’ ठरण्याची शक्यता आहे.

देशाची चारही टोकं महामार्गाच्या माध्यमातून एकमेकांना जोडून आर्थिक विकासाच्या चक्राला गती देण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2021 मध्ये ‘भारतमाला’ या अतिशय महत्त्वकांक्षी योजनेची घोषणा केली होती. केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाच्या माध्यमातून देशाच्या विविध भागात
महामार्गांचे जाळे निर्माण करणे हा या योजनेमागील मूळ हेतू आहे. या योजनेतून देशात 44 आर्थिक कॉरिडोर साकारले जात असून त्यात मुंबई-कोलकाता, मुंबई-आग्रा आणि सुरत-नागपूर या उत्तर महाराष्ट्रातील तीन कॉरिडोरचा समावेश आहे. त्याच श्रृंखलेत आता सुरत ते चेन्नई या 1271 किलोमीटर अंतराच्या ग्रीन कॉरिडोरमधील नाशिक ते सोलापूर या पहिल्या टप्प्यातील 383 किलोमीटरच्या कामाला केंद्रीय अर्थ मंत्रालयाची मंजुरी मिळाली आहे.

सुमारे 50 हजार कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाचे दोन भाग असून पहिल्या भागात सुरत ते सोलापूर हा 564 किलोमीटरचा व सोलापूर ते चेन्नई हा 707 किलोमीटर अंतराचा दुसरा टप्पा आहे. यातील चेन्नई ते सोलापूर (अक्कलकोट) पर्यंतच्या रस्त्याचे काम पूर्ण झाले असून आता सोलापूर ते नाशिक (आडगाव) पर्यंतच्या रस्त्याचे प्रत्यक्ष बांधकाम आणि आडगाव ते आंबेगाव (जि.नाशिक) पर्यंतच्या अंतराचे भूसंपादन होणार आहे. अर्थ मंत्रालयाच्या मंजुरीनंतर आता या प्रकल्पाला केंद्रीय मंत्रीमंडळाच्या मंजुरीची प्रतिक्षा असून येत्या पंधरवड्यातच हा विषय मार्गी लागणार असल्याचे राज्य शासनातील सूत्रांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे येत्या महिनाभरातच बहुचर्चीत, सुरुवातीला शेतकर्यांचा प्रचंड विरोध झालेल्या या एक्सप्रेस महामार्गाचे काम प्रत्यक्षात सुरु होणार आहे.

गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगाणा आणि तामीळनाडू अशा पाच राज्यातून जाणार्या या महामार्गाला तिरुपती, कडप्पा, कर्नुल, कलबुर्गी, सोलापूर व सुरत ही शहरे एकमेकांना थेट जोडली जाणार आहेत. सुरत ते चेन्नई या दोन टोकाच्या शहरांमधील आजचे रस्ते अंतर 1600 किलोमीटर असून प्रवासाचा कालावधी 35 तासांहून अधिक आहे. मात्र नव्या महामार्गामुळे जवळपास तिनशे किलोमीटर अंतर कमी होवून प्रवासाचा
कालावधीही निम्म्याने कमी होणार आहे. सुरत ते सोलापूर या 564 किलोमीटर अंतरासाठी 30 हजार कोटी रुपये खर्च होण्याची अपेक्षा असून सोलापूर ते चेन्नई या 707 किलोमीटर अंतरासाठी 15 हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. सध्या चेन्नई ते अक्कलकोट (सोलापूर) पर्यंतचा महामार्ग तयार झाला आहे.

महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, बीड, धाराशिव व सोलापूर या पाच जिल्ह्यातून जाणार्या सुरत-चेन्नई या ग्रीनफिल्ड महामार्गाची रुंदी 70 मीटर असणार आहे, त्यासाठी 100 मीटर रुंद जमीनीचे अधिग्रहण होणार आहे. नाशिक जिल्ह्यातून 122 किलोमीटर तर, अहिल्यानगर जिल्ह्यातील
संगमनेर, राहाता, राहुरी व अहिल्यानगर तालुक्यातील 49 गावांमधून 98.5 किलोमीटर अंतरकापून हा महामार्ग पुढे बीड जिल्ह्यात जाणार आहे. संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव, तळेगाव, वडझरी, कासारे, लोहारे, गोगलगाव, सादतपूर, हसनापूर अशा अठरा गांवामधून तो सोनगावमधून राहुरी तालुक्यात प्रवेश करेल. त्यासाठी जिल्ह्यातील एकूण एक हजार हेक्टर तर, संगमनेर तालुक्यातील 282 हेक्टर जमीनीचे संपादन होणार आहे. वांबोरी घाटातून हा महामार्ग 30 ते 40 मीटर उंचीच्या पिलर्सवरुन जाणार असल्याचे सांगण्यात आले.

कोणत्याही देशाची सक्षम दळणवळण व्यवस्था त्या देशाच्या विकासाचे मूळ असते. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जल, वायू आणि जमीनीवर रस्त्यांचे जाळे विणण्याची योजना आखली असून भारतमाला योजनेतंर्गत सुरत ते चेन्नई हा ‘मुंबई-पुणे’ एक्सप्रेस महामार्गानंतरचा देशातील सर्वात मोठ्या लांबीचा महामार्ग पूर्ण करुन लवकरात लवकर तो जनतेसाठी खुला करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. सिन्नरजवळील वावीत हा महामार्ग समृद्धीला तर, नाशिकमध्ये मुंबई-आग्रा महामार्गाला जोडला जाणार आहे. त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातून उत्तर व दक्षिण भारतात जाण्यासाठी वेगवान महामार्ग उभे राहणार असल्याने चेन्नई-सुरत हा भारतमालेतील महत्वपूर्ण प्रकल्प अहिल्यानगर जिल्ह्यासाठी गेमचेंजर ठरणार आहे.

सुरत ते चेन्नई या 1271 किलोमीटर लांबीच्या या महत्त्वकांक्षी प्रकल्पातील चेन्नई ते अक्कलकोट (सोलापूर) पर्यंतच्या महामार्गाचे काम पूर्ण झाले असून केंद्रीय मंत्रीमंडळाच्या मंजुरीनंतर अक्कलकोट ते आडगाव या 383 किलोमीटरच्या रस्त्याचे बांधकाम सुरु होईल. आडगाव ते सुरत या अंतरात पर्यावरण विषयक मंजुर्या असल्याने 290.70 किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे हे काम शेवटच्या टप्प्यात होईल. या संपूर्ण महामार्गामुळे चेन्नई ते सुरत हे सध्याचे 35 तासांचे अंतर अवघ्या 18 तासांवर येणार आहे.

