‘गोल्डनसिटी’तील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा! इमारतीच्या गच्चीत सुरु होता प्रकार; साठ हजारांच्या मुद्देमालासह सहाजणांवर कारवाई..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
मागील काही दिवसांत शहर पोलीस ठाण्याच्या हद्दितील अवैध व्यवसायांविरोधात राळ उठली होती. त्यामुळे पोलिसांनी कठोर भूमिका घेत शहरातील बहुतेक अशा ठिकाणांवर नियंत्रण मिळवल्याचे सध्या दिसत आहे. मात्र पोलिसांच्या या कारवाईला अवैध व्यावसायिकांनी पर्याय शोधायला सुरुवात केली असून मटक्या पाठोपाठ आता जुगाराचे अड्डेही शहराच्या आसपासच्या भागात सुरु होत असल्याचे समोर आले आहे. गुरुवारी मध्यरात्री पोलीस उपअधिक्षकांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर पोलिसांनी गोल्डनसिटीत घातलेल्या छाप्यात सहा जुगार्‍यांना पकडण्यात आले. या कारवाईत त्यांच्या ताब्यातून एका दुचाकी वाहनासह 22 हजार रुपयांची रोकडही जप्त करण्यात आली. धक्कादायक म्हणजे पोलिसांना या अड्ड्याची माहिती मिळू नये यासाठी जुगार्‍यांनी कृष्णा इस्टेट नावाच्या एका उंच इमारतीच्या गच्चीवर आपला अड्डा थाटला होता. त्यावरुन गुन्हेगारी वृत्तींकडून शहरालगतच्या उपनगरांमध्ये बस्तान बांधण्याचे कारस्थान सुरु असल्याचेही ठळकपणे समोर आले आहे.


याबाबत पोलीस नाईक बापूसाहेब हांडे यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलीस उपअधिक्षक कुणाल सोनवणे यांना अकोले बायपास रस्त्यावरील श्रमिकनगरच्या समोरील बाजूला काहीजण जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी आपल्या पथकातील हेड कॉन्स्टेबल कडलग यांच्यासह पोलीस नाईक हांडे, पटेकर व कॉन्स्टेबल सारबंदे यांना बोलावून सदर माहितीची खातरजमा करुन तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पथकाने शासकीय वाहनाऐवजी खासगी वाहनाचा वापर करुन गुरुवारी (ता.11) मध्यरात्रीच्या सुमारास गोल्डनसिटी गाठली.


पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर श्रमिकनगरच्या समोरील बाजूस गोल्डनसिटीतील कृष्णा इस्टेट नावाची इमारत दिसून आली. त्या इमारतीच्या माडीवर लाईट सुरु असल्याचे व काहीजणांच्या गोंगाटाचा आवाज कानावर येत असल्याचे पोलिसांना जाणवले. इमारतीवर जाण्यासाठी एकच जीना असल्याने संशयीत पळून जाण्याची शक्यता जवळजवळ अशक्य होती. त्यामुळे पोलीस पथकाने इमारतीच्या जीन्या समोरच आपले वाहन उभे करुन एकाचवेळी धावा करीत या इमारतीची गच्ची गाठली. यावेळी अचानक पोहोचलेल्या पोलिसांना बघून गच्चीवरील ट्यूबलाईटच्या उजेडात गोलाकार कोंडाळे करुन तिरट नावाचा जुगार खेळणार्‍या सहाजणांची एकच तारांबळ उडाली.


छापा घालताच पोलिसांनी ‘जैसे थे’ स्थिती ठेवण्याचे आदेश देत जुगार खेळणार्‍या एकेकाची ओळख परेड करुन त्यांच्या ताब्यातील मुद्देमालाची नोंद करण्यास सुरुवात केली. त्यानुसार शहबाज फिरोज शेख (वय 36) याच्या ताब्यातून 2 हजार 870 रुपये, समीर सईद पठाण (वय 40, दोघेही रा.श्रमिकनगर) याच्या ताब्यातून 2 हजार 760 रुपये, संकेत जिजाराम झावरे (वय 21, रा.मंगळापूर) याच्याकडून 2 हजार 670 रुपये, श्रीनाथ उर्फ पप्पू हिरालाल बडांगे (वय 39, रा.इंदिरानगर) याच्याकडून 2 हजार 650 रुपये, दिनेश पी.टी (वय 40, रा.नवघरगल्ली) याच्या ताब्यातून 3 हजार 250 रुपये व शुभम दत्तात्रय काळे (वय 30, रा.रंगारगल्ली) याच्याकडून 3 हजार 390 रुपये याशिवाय सहाजणांमध्ये सुरु असलेल्या तिरट नावाच्या जुगारासाठी डावात टाकण्यात आलेले 4 हजार 500 रुपये अशी एकूण 22 हजार 90 रुपयांची रोकड आणि 40 हजारांची एक दुचाकी (क्र.एम.एच.17/बी.क्यू.5353) असा एकूण 62 हजार 90 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.


काही दिवसांपूर्वी संगमनेर शहर पोलिसांच्या हद्दित अवैध व्यवसाय वाढल्याचे एकामागून एक आरोप होवू लागल्यानंतर पोलिसांनी कठोर भूमिका घेत आपल्या हद्दितील व्यवसायांवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवले आहे. त्याचा परिणाम मोठ्या काळापासून धंदे बंद राहिल्याने अवैध व्यावसायिकांनी शहर पोलीस ठाण्याची हद्द सोडून अथवा आसपासच्या उपनगरांमध्ये आडवाटेला आपले बस्तान बसवण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वी शहरात राजरोस चालणारा मटकाही आता तालुका हद्दितून सुरु झाल्याचे समोर येत असतानाच शहरालगतच्या गुंजाळवाडी शिवारातील गोल्डनसिटीत पोलीस उपअधिक्षकांच्या पथकाने कारवाई केल्याने अवैध व्यावसायिक शहरालगतच्या उपनगरांनाही लक्ष्य करीत असल्याचे दिसून आले आहे.


शहरालगतचा विस्तीर्ण परिसर असल्याने गेल्याकाही वर्षात गुंजाळवाडी शिवारातील लोकसंख्या झपाट्याने वाढली असून विविध उपनगरांमुळे तालुक्यातील श्रीमंत ग्रामपंचायत म्हणूनही गुंजाळवाडीचा लौकीक वाढला आहे. मात्र त्याचवेळी या भागातील गुन्हेगारी घटना आणि प्रवृत्तींमध्येही सातत्याने वाढ होत असल्याचे वेळोवेळी समोर आल्यानंतर गुंजाळवाडीसाठी स्वतंत्र पोलीस चौकीची मागणी पुढे आली होती. आता शहरातील गुन्हेगारी पिटाळल्यानंतर ती आसपासच्या उपनगरांमध्ये आणि खास करुन गुंजाळवाडीत विसावत असल्याचेही समोर येवू लागल्याने जवळपास 35 हजारांच्या आसपास लोकसंख्या असलेल्या गुंजाळवाडीसाठी स्वतंत्र पोलीस ठाण्याचीच गरज निर्माण झाली आहे.

Visits: 316 Today: 3 Total: 1101863

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *