रहिमपूर आणि परिसरात लंम्पीचा प्रादुर्भाव! तीन जनावरे दगावली; शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान

नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यातील रहिमपूर आणि परिसरात सध्या लंम्पींचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढला असून या आजाराने एका शेतकऱ्याच्या तीन गाई मृत्युमुखी पडल्याने शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. असे असताना तालुका पशुसंवर्धन अधिकाऱ्यांचे मात्र याकडे सपशेल दुर्लक्ष होत असल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

रहिमपुर आणि परिसरातील शेतकऱ्यांनी लंम्पी येऊ नये म्हणून त्यावर असलेल्या प्रतिबंधक लसी ही आपापल्या जनावरांना टोचून घेतलेल्या आहेत. तरीही या परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या गोठ्यातील जनावरांना लंम्पीचा प्रादुर्भाव झाला आहे. या रोगाने रहिमपूर येथील शेतकरी शिवाजी आप्पाजी शिंदे यांच्या दोन गाभण गाई आणि एक कालवड दगावली आहे. त्यामुळे या शेतकऱ्याचे तब्बल दोन लाखाचे नुकसान झाले असून या शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. रहिमपूर येथे पशुसंवर्धन दवाखाना असून या दवाखान्या अंतर्गत परिसरातील आठ गावे येतात.

या संपूर्ण गावामध्ये तब्बल १५ ते १६ जनावरांना लंम्पीचा प्रादुर्भाव झाला आहे. एकट्या रहिमपूर मध्ये पाच जनावरे या आजाराने ग्रस्त आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गातून चिंता व्यक्त केली जात आहे. या सर्व जनावरांवर पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नवले हे प्राथमिक उपचार करत असले तरी त्यांचे वरिष्ठ असणारे तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ. पुंडलिक येवले मात्र निवांत पंचायत समितीतील दालनात आपली खुर्ची उबवण्यात व्यस्त आहेत. तालुक्यात लंम्पीचा प्रादुर्भाव वाढत असताना तालुका पशुसंवर्धन अधिकारी असलेले डॉ. पुंडलिक येवले यांना त्याचे काहीही घेणे देणे नाही. डॉ. येवले यांनी तालुका पशुसंवर्धन अधिकाऱ्याचा पदभार स्वीकारल्यापासून तालुक्यातील अनेक दवाखान्यांमध्ये जनावरांसाठी आवश्यक असणाऱ्या विविध लसी, औषधे आदी वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या असून अशा निष्क्रिय अधिकाऱ्याची त्या पदावरून बदली करावी अशी मागणी संतप्त शेतकऱ्यांनी केली आहे.

लंम्पीचा प्रसार डास, माशा, गोचीड आणि या आजाराने बाधित प्राण्यांच्या संपर्कातून होतो. या आजारात जनावरांना अगोदर उच्च ताप येतो, जो या रोगाचे सुरुवातीचे लक्षण आहे. त्यानंतर शरीरावर, डोक्यावर, मान, पायांवर, जननेंद्रिये आणि कासेवर २ ते ५ सेमी व्यासाच्या घट्ट गाठी तयार होतात. त्यानंतर जनावरे लंगडतात आणि त्यांच्या अंतर्गत अवयवांवर सूज येते. दरम्यानच्या काळात जनावरे चारा आणि पाणी घेत नाहीत. त्यामुळे जनावरे दगावण्याचा धोका असतो.

Visits: 482 Today: 3 Total: 1108457
