शेती महामंडळाच्या जमिनीची मोजणी बंद पाडल्याने संताप प्रशासनाकडून दखल; पोलीस बंदोबस्तात मोजणी करण्याचे आश्वासन
नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
रीतसर नोटिसा काढून सुरू असलेली शेती महामंडळाच्या जमिनीची मोजणी बुधवारी (ता.14) पढेगाव येथील गाव पुढार्याने गर्दी जमवून निम्म्यावरच बंद पाडली. विशेष म्हणजे भूमि अभिलेख, महसूल, पोलीस विभागाचे कर्मचारी हजर असताना ही मोजणी पूर्ण करण्यात सरकारी यंत्रणा अपयशी ठरली. मोजणी बंद पाडूनही या गाव पुढार्यावर कोणतीच कारवाई झाली नाही. संबंधितावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंदविण्याची मागणी खंडकरी शेतकर्यांनी केली आहे. मात्र प्रशासनाने दखल घेतली असून पोलीस बंदोबस्तात मोजणी करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार प्रशांत पाटील यांनी दिली आहे.
श्रीरामपूर तालुक्यातील काही खंडकर्यांनी उच्च न्यायालयात केलेली केस मागे घेतल्याने न्यायालयाने या शेतकर्यांना 50 टक्के जमीन शहरालगत आणि 50 टक्के जमीन तालुक्यात देण्याचे आदेश दिले. त्यानुसार 2-2 एकर शेती येणार्या खंडकर्यांना शेती महामंडळाने वाटपास काढलेल्या क्षेत्रापैकी पढेगाव येथे 1-1 एकर शेती मिळणार आहे. त्यासाठीची सर्व सरकारी पूर्तता पूर्ण होऊन या जमिनीचा नमुना 3 ही जिल्हाधिकार्यांच्या आदेशान्वये पूर्ण झाल्याने उपअधीक्षक भूमि अभिलेख श्रीरामपूर यांच्या नोटिशीनुसार पढेगाव येथे शेती महामंडळाच्या जमिनीची मोजणी होती. याबाबत प्रांत, तहसीलदार यांना नोटिशीच्या प्रति पाठविण्यात आल्या होत्या.
त्यानुसार भूमि अभिलेखचे कर्मचारी, खंडकरी शेतकरी आणि त्यांचे नातेवाईक पढेगाव येथे मोजणीच्या ठिकाणी गेले. मोजणी सुरूही झाली, निम्मी अर्धी मोजणी झाल्यानंतर गावातील एक पुढारी त्याठिकाणी येत मोजणी मशीनच्या पुढे उभे राहून आदिवासींच्या स्मशानभूमीचा मुद्दा पुढे करत मोजणी करण्यास मज्जाव केला. खंडकर्यांच्या नातेवाईकांनी ही माहिती महसूल अधिकारी, पोलीस अधिकारी यांना मोबाईलवर कळवली. त्यांनी लगेच लक्ष घालतो, असे आश्वासन दिले. परंतु दुपारी 1 ते 1.30 च्या दरम्यान बंद पडलेली मोजणी दुपारी 4 पर्यंत सुरू झालीच नाही. महसूलचे तलाठी व मंडलाधिकारी त्याठिकाणी आले. एक पोलीस कर्मचारी तेथे आला. परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. पुढार्याला बाजूला सारुन मोजणीची प्रक्रिया पूर्ण करण्यास उपस्थित सरकारी कर्मचार्यांनी हतबलता दाखविली.
त्यानंतर दुपारी 4.30 नंतर मोजणीच्या ठिकाणी चिखल असल्याने मोजणी गुरुवारी (ता.15) ठेवण्यात येईल, असे लेखी लिहून देण्यात येवून मोजणी अर्धवट सोडून सरकारी कर्मचार्यांना परतावे लागले. नोटिसा काढून रीतसर काम सुरू असताना ते अडवणार्यांविरोधात कारवाई करण्याची हिंमत यंत्रणेला दाखविता आली नाही. याबाबत खंडकरी शेतकर्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून या पुढार्यावर गुन्हा दाखल न केल्यास खंडकरी शेतकरी तीव्र आंदोलन करतील, असा इशारा देण्यात आला आहे.
शेती महामंडळाच्या जमिनीची मोजणी गुरुवारी करण्यात येणार असून यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त मागविला आहे. यात कोणी अडथळे आणण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात येतील. त्यामुळे या शेती महामंडळाच्या जमिनीची मोजदात करताना नागरिकांनी सहकार्य करावे.
– प्रशांत पाटील, तहसीलदार
आदिवासींच्या स्मशानभूमीचा मुद्दा पुढे करण्यात आला. मात्र, गोरगरीब खंडकर्यांना जमिनी मिळाल्या पाहिजे. आदिवासींच्या स्मशानभूमीच्या आडून कुणी राजकारण करत असेल तर ते चुकीचे आहे. येथे खंडकर्यांना जमीन देवूनही जमीन उरते, अशी माहिती मिळाली आहे. त्यामुळे आदिवासी समाजावर अन्याय होणार नाही.
– शिवाजी ढवळे (राज्य नेते-भिल्ल संघटना)