राष्ट्रपित्याचा जयंती दिन ठरला ‘आंदोलन’ दिवस!

राष्ट्रपित्याचा जयंती दिन ठरला ‘आंदोलन’ दिवस!
महसूल मंत्र्यांच्या निवासस्थानासमोर मराठा क्रांती मोर्चाचा ठिय्या तर अनेकांनी उपोषण करुन वेधले सरकारचे लक्ष
नायक वृत्तसेवा, संगमनेर
अहिंसेचे पुरस्कर्ते, संविधानिक आंदोलनाचे प्रणेते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 151 व्या जयंतीदिनीच संगमनेरात विविध मोर्चे, उपोषण आणि आंदोलने पहावयास मिळाली. मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मराठा क्रांती मोर्चाच्या राज्य समन्वयकांच्या शनिवारी (26 सप्टेंबर) रोजी नाशिकमध्ये झालेल्या बैठकीत खासदार, आमदार यांच्या निवासस्थानासमोर निदर्शन करण्याच्या घेतलेल्या निर्णयानुसार आज महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेरातील निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यामध्ये त्यांच्या भगिनी नगराध्यक्षा दुर्गा तांबे आणि पती आमदार डॉ.सुधीर तांबे सहभागी झाले होते. त्याचबरोबर शहरातील पालिका संचलित श्रमिकनगर येथील उर्दू शाळा व बालवाडीमध्ये अभ्यासिका व ग्रंथालय पालिकेच्या सहकार्याने चालविण्याच्या मागणीसाठी एकता सामाजिक सेवाभावी संस्थेने एकदिवसीय धरणे आंदोलन करुन प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. तर साकूर येथील शासकीय जमिनीवरील अतिक्रमणास प्रतिबंध न झाल्याने ओ. एस. आर. फौंडेशनचे पदाधिकारी प्रांत कार्यालयाबाहेर उपोषणास बसले आहे. यामुळे आजचा संपूर्ण दिवस हा आंदोलनांनी गाजल्याचे अधोरेखित होत आहे.


महात्मा गांधींच्या विचारांनी प्रेरित होऊन आज अनेकजण आपले सनदशीर मार्गाने प्रश्न सोडवून घेत आहे. त्यानुसारच आज संगमनेरात महात्माजींच्या जयंतीदिनी मराठा क्रांती मोर्चा, एकता सेवाभावी संस्था, ओ. एस. आर. फौंडेशन, भारतीय जनसंसद यांनी मोर्चे, उपोषण आणि आंदोलन करुन सरकारचे लक्ष वेधले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रेंगाळत असलेला मराठा समाज आरक्षणाचा प्रश्न सोडवून बहिणीला भावाने ओवाळणी द्यावी, अशी विनवणी नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांनी ठिय्यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली. यामध्ये आमदार डॉ.सुधीर तांबे, इंद्रजीत थोरात, अजय फटांगरे, अमोल खताळ, शरद थोरात, अमोल कवडे, किरण घोटेकर, अर्चना बालोडे, निर्मला कहांडळ आदी सहभागी झाले होते. शहरातील श्रमिकनगर येथील उर्दू शाळा व बालवाडीमध्ये अभ्यासिका व ग्रंथालय पालिकेच्या सहकार्याने चालविण्याच्या मागणीसाठी एकता सामाजिक सेवाभावी संस्थेने एकदिवसीय धरणे आंदोलन केले.


साकूर शासकीय जमिनीवरील अतिक्रमणास प्रतिबंध न झाल्याने ओ. एस. आर. फौंडेशनचे पदाधिकारी असीफ शेख यांच्या नेतृत्वाखाली इतर पदाधिकारी प्रांत कार्यालयाबाहेर उपोषणास बसले आहे. तसेच तालुक्यातील गुंजाळवाडी, वेल्हाळे, सायखिंडी, कर्‍हे आणि संगमनेर खुर्द येथील शेत जमिनीची शासनाचा महसूल बुडवून पुर्नविक्री करणार्‍यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी भारतीय जनसंसदेचे पदाधिकारी सचिन साळुंके, संजय देशमुख आणि दीपक साळुंके आदिंसह पदाधिकारी उपोषणास बसले आहे. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अविनाश भोर यांनी गळ्यामध्ये कुलूपबंद साखळी घालून रस्त्यांचे श्वास मोकळे करण्याची मागणी पालिका प्रशासनाकडे केली आहे. यावरुन आजचा संपूर्ण दिवस हा आंदोलनांनी गाजल्याचे संगमनेरकरांस पहावयास मिळाले.

Visits: 219 Today: 1 Total: 2126172

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *