संगमनेरच्या शांतता समितीच्या बैठकीतच अशांतता! संगमनेरच्या गणेशोत्सवालाही गालबोटं; माजी नगराध्यक्षांसह दोघांविरोधात गुन्हा..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
सार्वजनिक उत्सवांदरम्यान अव्यवस्थेचा फटका बसू नये यासाठी प्रशासनाकडून राज्यभर घेतल्या जात असलेल्या शांतता समितीच्या बैठकीला संगमनेरात गालबोटं लागले. अपर पोलीस अधिक्षक सोमनाथ वाघचौरे व प्रांताधिकारी अरुण उंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सार्वजनिक मंडळांचे पदाधिकारी शहरातील समस्या सांगत असतानाच चैतन्यनगरमधील एकाने माजी नगराध्यक्ष विश्वास मुर्तडक यांच्याकडे रोख करीत मांडवाच्या आकारावर प्रश्न उपस्थित केला. त्यावर त्यांनीही प्रत्यूत्तर देण्याचा प्रयत्न केला असता संबंधिताने थेट खासगी आणि भावनात्मक विषयाला हात घालून वातावरण चिघळवले. त्यातून दोन्ही बाजूने एकमेकांवर धावाधाव व शाब्दीक खडाजंगी होवून उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांततेसाठी बोलावलेली बैठकच अशांततेत परावर्तीत झाली. अपर अधिक्षकांच्या शिष्टाईनंतर वातावरण शांत झाले. या प्रकरणी रात्री उशिराने पोलिसांनी स्वतःहून वरीष्ठ अधिकार्यांच्या आदेशाकडे दुर्लक्ष करुन सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी माजी नगराध्यक्षांसह त्यांचा पुतण्या वैष्णव मुर्तडक याच्याविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. माजीमंत्री बाळासाहेब थोरात धमकी प्रकरणानंतर निघालेल्या शांती मोर्चाच्या मंचावरुनही खोट्या फौजदारी गुन्ह्यांवरुन राळ उठली होती, त्यानंतर लागलीच थोरात समर्थक माजीनगराध्यक्षांवरही गुन्हा दाखल झाल्याने ऐन उत्सवाच्या काळात संगमनेरचे राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

शुक्रवारी (ता.22) शहर पोलिसांनी अपर अधिक्षक सोमनाथ वाघचौरे, प्रांताधिकारी अरुण उंडे, मुख्याधिकारी रामदास कोकरे आणि वीज कंपनी व जलसंपदा विभागाच्या अधिकार्यांसह शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांचा समावेश असलेली शांतता समितीची बैठक बोलावली होती. नवीन नगर
रस्त्यावरील प्रशासकीय भवनात ही बैठक सुरु असताना काही मंडळांच्या पदाधिकार्यांकडून रस्ते, खड्डे, अखंडीत वीज पुरवठा, नदीपात्रातील पाणी, देखावे, वाहतूक, विसर्जन मिरवणुकीतील उशीर अशा सामान्यपणे दरवर्षीच्या समस्यांवर प्रश्न उपस्थित होत होते. या दरम्यान चैतन्यनगर परिसरातील शिवाजी अभंग यांनी तेथील गणेश मंडळाच्या मांडवाचा मुद्दा उपस्थित करुन पाठीमागील बाजूला राहणार्या रहिवाशांना जाण्यासाठी रस्ताच नसल्याची जाहीर तक्रार करण्याचा प्रयत्न केला.

सदर मंडळाला माजी नगराध्यक्ष विश्वास मुर्तडक यांचे पाठबळ असल्याने अभंग यांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना मुर्तडक यांनी 1990 पासूनच्या आपल्या मंडळाचा दाखला दिला. गेली दोन वर्ष परिसरात घडलेल्या दुखःद घटनांमुळे मांडवाचा आकार कमी करुन साध्या पद्धतीने उत्सव
केल्याची पृष्टीही त्यांनी जोडली. त्यावर प्रत्यूत्तर देताना अभंग यांनी ‘मग यावेळी तुमच्या घरातील मुलाचे निधन नाही का झाले?, त्याचे तुम्हाला दुःख नाही का?’ असा थेट खासगी आणि भावनात्मक सवाल उपस्थित केल्याने बैठकीचा माहौलचा बदलला. या गदारोळात अंभग यांनी ‘तुम्हाला राजकारण करायचंय का?’ असे सांगत गणेशोत्सवातही राजकारणाचा फूगा आपटल्याने एकशेतीस वर्षांचा मोठा इतिहास असलेल्या संगमनेरच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला गालबोटंही लागले.

हा प्रकार सुरु असताना माजी नगराध्यक्ष मुर्तडक यांचा पुतण्या वैष्णव प्रशासकीय भवनाच्या परिसरातच अन्यत्र उपस्थित होता. गल्लीतील कोणीतरी घरात काही महिन्यांपूर्वी घडलेल्या दुःखद् प्रसंगावर भाष्य केल्याने वाद झाल्याची माहिती त्याला मिळाल्यानंतर त्यानेही तत्काळ सभागृहात जावून
आपला रोष व्यक्त केला. या दरम्यान अपर अधिक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी मध्यस्थी करीत दोन्ही बाजू शांत केल्या. पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी शिवाजी अभंग यांना माईकवरुन बाजूला करीत त्यावर ताबा घेतला आणि काही वेळच्या गदारोळानंतर बैठकीचे कामकाज पूर्ववत सुरु होवून त्याची शांततेत सांगताही झाली.

मात्र प्रशासनाने बोलावलेल्या शांतता समितीच्या बैठकीत अपर अधिक्षक, प्रांताधिकार्यांसारख्या वरीष्ठ अधिकार्यांच्या उपस्थितीत घडलेला प्रकार प्रशासनाची नाचक्की करणारा असल्याने या प्रकरणात कारवाई होणार हे निश्चित होते. मात्र प्रत्यक्षात रात्री उशिराने दाखल झालेल्या अदखलपात्र
गुन्ह्यात पोलिसांनी स्वतः फिर्यादी होवूनही एकतर्फी तक्रार दाखल केल्याचा आरोप होवू लागल्याने या घटनेच्या माध्यमातून संगमनेरचे राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता असून आगामी गणेशोत्सवात त्याचे ठळक प्रतिबिंब दिसणार हे निश्चित आहे.

शुक्रवारी (ता.22) सायंकाळी घडलेल्या या घटनेप्रकरणी पोलिसांकडून कॉन्स्टेबल संजय बढे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वरीष्ठ अधिकार्यांच्या उपस्थितीत शांतता समितीची बैठक सुरु असताना विश्वास रतन मुर्तडक व वैष्णव मुर्तडक या दोघांनी अधिकार्यांचे आदेश न मानता, सार्वजनिक ठिकाणी मोठमोठ्याने आरडाओरड करुन सार्वजनिक शांततेचा भंग केल्याचे म्हंटले आहे. त्यावरुन पोलिसांनी दोघांवरही भारतीय न्यायसंहितेच्या
कलम 112, 117 प्रमाणे अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. या प्रकरणात पोलीस स्वतः फिर्यादी असतानाही घडल्या वादाला तोंड फोडणार्यांचा तक्रारीत साधा उल्लेखही नसल्याने यात राजकारण असल्याचा आरोप होवू लागला असून नुकत्याच झालेल्या शांतीमोर्चातील खोट्या गुन्ह्यांच्या आरोपानंतर लागलीच शांतता समिती प्रकरण घडल्याने येणार्या कालावधीत त्यावरुन संगमनेरचे राजकारण रंगण्याची चिन्हे दिसत आहेत.

चैतन्यनगर परिसरात मी राहण्यासाठी येण्यापूर्वीपासून या ठिकाणी गणपती मंडळ असून दरवर्षी अशाच मोठ्या पद्धतीने परिसरातील तरुण हा उत्सव साजरा करीत आले आहेत. जवळजवळ 1990 पासून त्याच ठिकाणी, त्याच आकाराचा मांडव घालून श्रींची स्थापना, देखावा व धार्मिक कार्यक्रम होत असतात. मात्र मागील दोन वर्ष आमच्या परिसरातील दोन ठिकाणी दुर्दैवी घटना घडल्याने उत्सवाचे स्वरुप साधारण करुन आम्ही त्या कुटुंबांच्या सांत्त्वनात
सहभागी झालो. यावर्षी आमच्याही घरात तसाच दुखःद् प्रसंग घडला, मात्र दहा दिवसांच्या उत्सवात दरवर्षी सलग अडचणींचा अडथळा नको म्हणून मुलांनी पूर्वीप्रमाणेच उत्सवाची आखणी करुन मांडव घातला, रहिवाशांचा राबता विचारात घेवून दरवर्षीप्रमाणे आठ फूट रस्ताही मोकळा ठेवला आहे. मात्र काहीजण नाहक त्यातही वाद निर्माण करुन उत्सवाला, सामाजिक एकोप्याला नख लावण्याचा प्रयत्न करीत आहेत हे दुर्दैवी आहे.
विश्वास मुर्तडक
माजी नगराध्यक्ष, संगमनेर नगरपरिषद

शांतता समितीतील अशांततेचा ‘पहिलाच’ गुन्हा!
पोलीस आणि समाज यांच्यातील सुसंवाद वाढवण्यासाठी अर्थात ‘कम्युनिटी पोलिसिंग’च्या हेतूने देशाला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळीच ‘शांतता समिती’ची गरज निर्माण झाली होती. अर्थात ब्रिटीश राजवटीतच 1861 सालच्या कायद्यातंर्गत पोलिसांना अशा प्रकारची व्यवस्था निर्माण करण्याचे अधिकार देण्यात आले होते. त्याचा प्रभावी वापर स्वातंत्र्यानंतर देशात उसळलेल्या जातीय हिंसाचाराला थोपवण्यासाठी
करण्यात आला. तेव्हापासूनच शांतता व सुव्यवस्थेत लोकांमधील प्रतिष्ठीतांचे महत्त्व अधोरेखीत होवून देशात प्रत्येक मोठ्या धार्मिक उत्सवांच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या समित्यांद्वारा सामाजिक सलोखा कायम राखला जातो. संगमनेर शहर पोलीस ठाण्याला जसा खूप मोठा इतिहास आहे, तसा येथील जातीय अशांततेच्या घटनांची संख्याही काही कमी नाही. कधीकाळी जातीय हिंसाचाराच्या मोजक्या शहरांमध्ये संगमनेरची गणना होत असे. मात्र आजवर प्रशासनाने बोलावलेल्या अशाप्रकारच्या बैठकांमध्ये झालेल्या वादाच्या बदल्यात थेट गुन्हा दाखल होण्याचा प्रकार तसा खूप विरळ आहे, त्यातून शांततेच्या नावाखाली वरीष्ठ अधिकार्यांच्या उपस्थितीत बोलावलेल्या बैठकीतही गुन्हा दाखल होण्याइतपत अशांतता निर्माण होवू शकते अशा आशयाचा इतिहासही अनाहूतपणे नोंदवला गेला आहे. हा प्रकार महाराजा शहाजी, राष्ट्रामाता जिजाऊसाहेब आणि युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्श लाभलेल्या शहरासाठी नक्कीच भूषणावह नाही.

