साखळीचोराचा पोलीस कोठडीतच आत्महत्येचा प्रयत्न! कारागृह रक्षकाचा सावधपणा; अनर्थ टळला; गुन्हा दाखल..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
नगर व नाशिक जिल्ह्यातील पोलिसांची दमछाक करणार्या आणि सध्या संगमनेरच्या कारागृहात कैद असलेल्या दरोडेखोराने मध्यरात्री कारागृहातच आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र कोठडीतील अन्य कैद्यांसह कर्तव्यावरील सुरक्षारक्षकाच्या सावधानतेमुळे त्याचा हा प्रयत्न फसला. सध्या त्याच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. संगमनेर शहरातील सोनसाखळी चोरीतील विविध घटनांत सहभाग असल्याने गेल्या दोन महिन्यांपासून तो कारागृहात कैद आहे. नैराश्यातून त्याने हे कृत्य केले असण्याची शक्यता असून पोलिसांनी गुन्हा दाखल करीत तपासही सुरु केला आहे.
याबाबत समजलेल्या माहितीनुसार सदरचा प्रकार आज (ता.16) मध्यरात्री सव्वाबाराच्या सुमारास शहर पोलीस ठाण्याच्या कारागृहातील पहिल्या क्रमांकाच्या कोठडीत घडला. या कोठडीत संगमनेरातील सोनसाखळी चोरीच्या अर्धा डझन गुन्ह्यात हात असलेल्या वडाळा महादेव (ता.श्रीरामपूर) येथील दोघांसह अन्य 20 आरोपी कैद आहेत. आत्महत्येचा प्रयत्न करणारा सोनसाखळी चोर योगेश सीताराम पाटेकर (वय 20) हा गेल्या सुमारे दोन महिन्यापासून कारागृहात आहे. त्यांच्या टोळीच्या म्होरक्याचा पोलिसांना अद्यापही तपास लागलेला नसल्याने त्याचा जामीन अर्ज मंजूर झाला नाही. त्यातून तो नैराश्यात गेला असण्याची शक्यता आहे.
आज (ता.16) मध्यरात्री सव्वाबाराच्या सुमारास बराकीतील अन्य कैदी झोपी गेल्याचे पाहून तो कोठडीतील शौचालयाजवळ गेला व त्याने कोणत्यातरी टोकदार वस्तूने स्वतःच्या मानेवर वार करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही गोष्ट अन्य कैद्यांच्या लक्षात येताच त्यांनी त्याला त्यापासून रोखण्यासह सुरक्षेवरील कर्मचार्यांना याची माहिती दिली. त्यांनीही तत्काळ याबाबतच वरीष्ठांना कळवून कोठडीची दारे उघडीत जखमी झालेल्या सोनसाखळी चोराला घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.
या प्रकरणी कारागृह रक्षक पो.हे.कॉ.आनंदा भांगरे (घारगाव पो.स्टे) यांच्या फिर्यादीवरुन संगमनेर शहर पोलिसांनी योगेश सीताराम पाटेकर (वय 20, रा.वडाळा महादेव) याच्या विरोधात भा.दं.वि. 309 नुसार गुन्हा दाखल करुन पुढील तपास उपनिरीक्षक निकीता महाले यांच्याकडे सोपविला आहे. गेल्या काही कालावधीत विविध कारणांवरुन संगमनेरचे कारागृह चर्चेत आहे. कारागृहात नव्याने आलेल्या कैद्याला मारहाण, कैद्याकडून चक्क कर्तव्यावरील पोलीस कर्मचार्यांच्या श्रीमुखात. कोठडीत कैद्याकडे मोबाईल आणि चार्जर आणि आता थेट टोकदार वस्तुने वार करीत कैद्याचा आत्महत्येचा प्रयत्न यामुळे शहराच्या सामाजिक सुरक्षेसह खुद्द पोलीस ठाण्यातील सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.