घारगावात दोन बिबट्यांनी पाडला चार मेंढ्यांचा फडशा

घारगावात दोन बिबट्यांनी पाडला चार मेंढ्यांचा फडशा
नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील घारगाव येथे योगेश बबन मोहिते या मेंढपाळाच्या मेंढ्यांवर दोन बिबट्यांनी हल्ला करून चार मेंढ्यांचा फडशा पाडला आहे. ही घटना नुकतीच घडली असून मेंढपाळाचे मोठे नुकसान झाले आहे.


याबाबतची अधिक माहिती अशी की, जांबूत येथील मेंढपाळ योगेश मोहिते हे आपल्या मेंढ्या चारण्यासाठी घेवून घारगाव येथील शिवाजी बाबुराव कचरे यांच्या शेतात आले होते. शुक्रवारी दिवसभर मेंढ्या चारून सायंकाळी त्यांनी सर्व मेंढ्या वाघुरीत बंद केल्या होत्या. दरम्यान, पहाटे अडीच वाजेच्या सुमारास दोन बिबट्यांनी थेट वाघुरीत प्रवेश करत चार मेंढ्यांचा फडशा पाडला. सकाळी मेंढ्यांना वाघुरीच्या बाहेर सोडण्यासाठी मेंढपाळ मोहिते वाघुरीत गेले असता त्यांना मेंढ्या मृतावस्थेत दिसून आल्या. त्यानंतर त्यांनी घटनेची माहिती वन विभागाचे वनरक्षक सुभाष धानापुणे, दिलीप बहिरट यांना दिली. त्यांनी घटनास्थळी धाव घेत मेंढ्यांचा पंचनामा केला. यामध्ये मोहिते यांचे जवळपास सत्तर ते पंचाहत्तर हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तर दुसरी घटना भोजदरी येथे घडली आहे. येथील अण्णासाहेब कारभारी डोंगरे या पशुपालकाच्या खिलारी बैलावर बिबट्याने हल्ला करुन जागीच ठार केले. यामध्ये त्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. दिवसेंदिवस या परिसरात बिबट्यांचे हल्ले वाढत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.

Visits: 161 Today: 1 Total: 2164918

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *