केंद्र सरकारची भूमिका राज्याला सापत्न भावाची वागूणक देणारी ः थोरात विविध मुद्द्यांवरुन केंद्र सरकार व राज्य भाजपवर साधला जोरदार निशाणा

नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्यात अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे शेतकर्‍यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले असताना केंद्र सरकारने मदतीचा हात पुढे करणे गरजेचे होते. शेतकर्‍यांचे झालेले नुकसान पाहून महाविकास आघाडी सरकारने तातडीने 10 हजार कोटी रुपयांचे पॅकेज दिले. परंतु केंद्राने अजूनही मदत केलेली नाही. दोन महिने झाले तरी अद्याप नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथकही आले नाही. केंद्राची ही भूमिका राज्याला सापत्न भावाची वागणूक देणारी आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.

भाजपच्या सूडबुद्धीच्या राजकारणाचा समाचार घेताना मंत्री थोरात पुढे म्हणाले, कोरोना संकटामुळे महसूल घटला आहे तर दुसरीकडे संकटांची मालिकाच सुरू आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने राज्याला मदतीचा हात दिला पाहिजे, पण दुर्देवाने तसे होताना दिसत नाही. उलट जीएसटी परतावा व राज्याच्या हक्काचे पैसेही दिले जात नाहीत. विरोधी पक्षांच्या सरकारांची कोंडी करण्याचा केंद्रातील भाजप सरकारचा प्रयत्न आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईवर बोलताना ते म्हणाले, ही कारवाई दुर्दैवी आणि आक्षेपार्ह आहे. केंद्रातील भाजप सरकार सूडबुद्धीने कारवाई करत असून भाजपविरोधात बोलणार्‍यांचा आवाज दाबवण्याचा प्रयत्न केला जात आहे. ईडी, सीबीआय सारख्या केंद्राच्या तपास यंत्रणांचा राजकीय कारणांसाठी वापर करुन विरोधकांना धमकावण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, अशी कारवाई भाजपशासित राज्यात झाल्याचे दिसत नाही.

वीजबिलावरुन भाजपने केलेल्या आंदोलनाचा समाचार घेताना महसूल मंत्री थोरात म्हणाले, वीजबिलात सवलत मिळाली पाहिजे ही काँग्रेसचीही भावना आहे. परंतु केंद्र सरकार जनतेची दररोज लूट करत आहे. जागतिक पातळीवर क्रूड ऑईलचे भाव कमी असताना देशात मात्र पेट्रोल, डिझेल महाग विकून केंद्र सरकार जनतेची लुटमार करत आहे. विजबिलाविरोधात आंदोलन करणार्‍यांनी या लुटमारीविरोधातही आंदोलन करावे. महाविकास आघाडीचे सरकार पडेल असे दिवास्वप्न भाजपचे नेते पाहत आहेत. त्यांनी ही स्वप्ने पाहत रहावीत, असा टोलाही थोरात यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना लगावला. तसेच ‘मी पुन्हा येणार’ असे म्हणणार्‍यांचे काय झाले हे आपण पाहतच आहोत. महाराष्ट्रात भाजपचे कोणतेही ‘ऑपरेशन’ यशस्वी होणार नाही. महाविकास आघाडी सरकारने एक वर्षाचा कार्यकाल पूर्ण केला असून पुढील चार वर्षांचा कार्यकाळही पूर्ण करू असा विश्वासही थोरात यांनी व्यक्त केला आहे.

 

Visits: 83 Today: 1 Total: 1105281

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *