अखेर भंडारदरा धरण तांत्रिकदृष्ट्या भरले! धरणातून प्रवरापात्रात २० हजार ७६३ क्यूसेक्सने विसर्ग सुरू

नायक वृत्तसेवा, राजुर
उत्तर आहिल्यानगर जिल्ह्यासाठी वरदान असलेले भंडारदरा धरण बुधवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास तांत्रिकदृष्ट्या भरले. त्यामुळे बुधवारी सकाळी ६ वाजताधरणाच्या स्लीपवे मधून ११ हजार ४१० क्युसेक तर वीज निर्मितीसाठी ८५० क्युसेक असा १२ हजार २३१ क्यूसेक्सने विसर्ग सुरू होता. त्यानंतर सकाळी ८ वाजता विसर्ग वाढवण्यात येऊन २०७६३ क्यूसेक्स करण्यात आला आहे. भंडारदरा धरणात १०७६३ द.ल.घ.फू पाणीसाठा ठेऊन धरणात जमा होणारे उर्वरित पाणी सोडून देण्यात येणार असल्याची माहिती धरणाचे शाखा अभियंता प्रविण भांगरे यांनी दिली.

धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गत दोन दिवसात धुव्वाधार पाऊस कोसळत असून धरणाचा पाणीसाठा पुन्हा एकदा ९८ टक्क्यावर पोहोचला आहे. पाणलोात जोरदार पाऊस सुरू असल्याने ओढे नाले खळखळून वाहू लागले आहेत. परिसरात मोठ्या प्रमाणात धबधबेही वाहू लागले असून हे सर्व पाणी निळवंडे धरणाला जाऊन मिळत आहे. त्यामुळे निळवंडेच्या पाण्यातही झपाट्याने वाढ सुरू आहे. निळवंडे धरणाच्या पाणलोटातही पाऊस पडत असून भंडारदरा धरणाच्या खालील भागात पडणाऱ्या पावसाचे पाणी निळवंडे धरणात जमा होत आहे. त्यामुळे निळवंडे धरणाचा पाणीसाठा ही ८७ टक्क्यापर्यंत पोहोचला.

मंगळवारी भंडारदरा परिसरात १०५ मी.मी., घाटघर येथे १६० मि.मी., पांजरे १०५ मि.मी., रतनवाडी १७० मि.मी.पाऊस पडला. भंडारदरा धरणात एकूण पाणीसाठा १० हजार ९९६ दशलक्ष घनफूट म्हणजेच ९८ टक्के झाला आहे तर निळवंडे धरणात एकूण पाणीसाठा सात हजार ७१८९ दशलक्ष घनफूट झाला असून निळवंडे धरण ही जवळपास ८७ टक्क्यापर्यंत भरले आहे.
भंडारदरा धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडल्याने नदीकाठच्या ग्रामस्थांनी काळजी घ्यावे असे शाखा अभियंता प्रवीण भांगरे यांनी सांगितले आहे. तसेच भांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी वसंत भालेराव, प्रकाश चव्हाण, रमेश सोनवणे, बाळू भागरे, चंदू भगत,चंद्रभान शिंदे आदी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

यंदाचा मुहूर्त टाळला!
गेली अनेक वर्ष भंडारदरा धरण १५ ऑगस्टच्या मुहूर्तावर भरत होते.यंदा लवकर पाऊस सुरू झाल्याने १५ ऑगस्टला धरण भरेल असा लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांचा अंदाज होता मात्र पावसाने विश्रांती घेतल्याने गेले अनेक वर्षांची धरण भरण्याची परंपरा मोडीत निघाली. परंतु मुहूर्ताच्या पाच दिवस उशिरा का होईना धरणाच्या सांडव्यातून पाणी बाहेर आल्याने उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

Visits: 190 Today: 2 Total: 1108922
