वाचनासाठीचे वातावरण निर्माण करण्याची गरज : भडकमकर संदीप वाकचौरे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

नायक वृत्तसेवा, संगमनेर
वाचन संस्कृती नाही, तर वाचनाचे वातावरण कमी झाले आहे. लेखक लिहीत आहेत, वाचक वाचत आहेत मात्र आता वाचनाचे वातावरण निर्माण करण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे.भाषा हा शिक्षण तज्ज्ञांचा विषय आहे. आज दुर्दैवाने तो राजकीय झाला असल्याची खंत ज्येष्ठ नाट्य लेखक, अभिनेते अभिराम भडकमकर यांनी व्यक्त केली. चपराक प्रकाशनाचे वतीने संदीप वाकचौरे यांनी लिहिलेल्या भाषा व शिक्षण, शिक्षणरंग या पुस्तक प्रकाशन समारंभात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नामवंत निर्माते व अभिनेते अरुण नलावडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर ऊर्जा उद्योग समूहाचे राम कुतवळ होते.

अरुण नलावडे म्हणाले की, समाजासाठी कोणी लिहीत असेल तर आपणच त्याचा पाया बनायची आवश्यकता आहे. वाचलेलं आणि ऐकलेलं जो आचरणात आणतो तो खरा नागरिक. सध्याच्या परिस्थितीमध्ये साक्षर माणूस उभा करण्यासाठी मोठे कष्ट घ्यावे लागत आहेत. पुस्तकच समाज व देशाला जगवणार आहेत.

यावेळी घनश्याम पाटील यांचे बेधडक, गिरीश गोखले यांचे अरे सरकार सरकार, चंद्रलेखा बेलसरे यांचे ओव्हरटेक, दिपाली जोगदंड यांचे विनफन या पुस्तकांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. प्रास्ताविक आणि प्रकाशित होणाऱ्या पुस्तकांच्या संदर्भातील विवेचन प्रकाशक घनश्याम पाटील यांनी केले. सूत्रसंचालन गिरे यांनी केले. आभार संदीप वाकचौरे यांनी मानले. कार्यक्रमास सहसंचालक डॉ. कमला आवटे,सेवानिवृत्त सहसंचालक एम. के. गोंधळी,अरुण कमलापूरकर, अरूण सांगोलकर, अरुण जाधव, रवींद्र कामठे, शुभांगी गिरमे, ज्योती घनश्याम, प्रमोद येवले, प्रशांत केंदळे, अजय रावत, मयूर बागुल आदींसह मोठ्या प्रमाणावर वाचक, रसिक उपस्थित होते.

Visits: 97 Today: 2 Total: 1102191
