पंधरा कार्यकर्त्यांच्या मागणीवर निर्णय होत नाही : सरपंच गुंजाळ गुंजाळवाडी ग्रामपंचायत ‘प्रतिमा’ प्रकरण; सत्तेच्या नादात मनमानी सुरु असल्याचाही घणाघात..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
लोकशाही व्यवस्थेचा अवलंब न करता दहा-पंधराजणांनी एकत्र येवून एखाद्या गोष्टीची तत्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी करणं अवाजवी आहे. इतरवेळी किरकोळ गोष्टींचे कागद घेवून मिरवणार्या विरोधकांनी लोकप्रतिनिधींच्या प्रतिमांबाबत मात्र कोणताही अर्ज अथवा निवेदनही दिले नाही. थेट हातात प्रतिमा घेवून लगेच कार्यालयात लावण्यासाठी आग्रह सत्तेचा माज असून कोणत्याही स्थितीत तो मान्य होणार नाही. गांवकर्यांनी विश्वासाने गावकीचा कारभार आमच्या हाती दिला आहे, गांवकरी म्हणून विरोधकांची काही मागणी असेल तर नियमानुसार त्यांनी केली पाहिजे. पदाधिकार्यांकडून अन्याय झाला असे वाटल्यास ग्रामसभा सर्वोच्च आहे, असे असतानाही त्याचा अवलंब न करता परस्पर दहा-पंधराजणांनी एकत्र येवून एखादी मागणी करणं आणि लगेच निर्णयाची अपेक्षा ठेवणं व्यवस्थेला अनुसरून नसल्याने ते मान्य करणार नसल्याची ठाम भूमिका गुंजाळवाडीचे सरपंच नरेंद्र गुंजाळ यांनी घेतली आहे.

स्वातंत्र्यदिनी गावातील महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील व आमदार अमोल खताळ यांच्या प्रतिमा घेवून गुंजाळवाडी ग्रामपंचायत कार्यालय गाठले होते. कार्यालयात विद्यमान लोकप्रतिनिधींच्या प्रतिमा लावाव्यात अशी त्यांची मागणी होती. मात्र विरोधक
आले त्यावेळी कार्यालयाला टाळे असल्याने त्याला राजकीय कलाटणी मिळाली. ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या देत गावातील विरोधकांनी ग्रामसेवकांनाही पाचारण केले, त्यांनी धावाधाव करीत अखेर दोन तासांनी कार्यालयाची चावी सरपंचाच्या खिशात भंडारदर्याला गेल्याचे सांगताच आंदोलनाला धार चढली. घोषणाबाजी, मागणी, आग्रह अशी वळणं घेत गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे आणि पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी मध्यस्थी करीत सोमवारपर्यंत यावर निर्णय घेण्याची लेखी हमी देत आंदोलन संपवले.

स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहणानंतर भंडारदरा पर्यटनाला गेलेल्या सरपंच नरेंद्र गुंजाळ यांनी रात्री उशिराने याबाबत आपली बाजू मांडली असून विरोधकांकडून मनमानी पद्धतीने सुरु असलेल्या राजकारणाबाबत कठोर भाष्य केले आहे. याबाबत त्यांनी आपली प्रतिक्रीया देताना ग्रामपंचायत कार्यालयात लोकप्रतिनिधींच्या प्रतिमा लावू दिल्या नाहीत म्हणून काहीजणांकडून दिशाभूल केली जात असल्याचे सांगतांना दोन्ही लोकप्रतिनिधींचा
सर्वांनाच आदर आहे, त्यांच्या प्रतिमा लावण्याची मागणी योग्य की अयोग्य हा नंतरचा भाग. त्या मागणीबाबत हरकत असण्याचेही कारण नव्हते, मात्र ती प्रक्रिया बाजूला ठेवून मनमानी पद्धतीने थेट प्रतिमा घेवूनच यायचे आणि तत्काळ त्या कार्यालयात लावण्याची मागणी करणे ही मनमानी असून व्यवस्थेने ठरवून दिलेल्या नियमांच्या विरोधात असल्याचे सरपंच गुंजाळ यांनी ठामपणे नमूद केले आहे.

गावातील ठराविक विरोधक इतरवेळी कागदं घेवून मिरवत असतात, मग यावेळी त्यांनी त्याची मागणी ग्रामपंचायतीला का कळवली नाही? असा सवाल उपस्थित करताना त्यांनी सत्तेच्या जोरावर आपण काही करु शकतो असा समज काहींनी करुन घेतला असून दहा-पंधराजणांना एकत्र करुन
मनातील हेतू साधण्याचा हा डाव कदापि पूर्ण होवू देणार नसल्याचे त्यांनी ठणकावले. उद्या कोणीही उठून सत्तेच्या जोरावर तसं करण्याचा दबाव आणतं असतील तर, अशा गोष्टी अजिबात मान्य होणार नाहीत. गावकीचा कारभार पाहण्यासाठी लोकांनी पदाधिकारी व सदस्यांना निवडले आहे. लोकशाही व्यवस्थेत त्यांनीच गावातला निर्णय घ्यायचा असतो, ग्रमपंचायतीचा निर्णय मान्य नसल्यास ग्रामस्थ पंचायतीचे मालक आहेत, ग्रामसभेत त्यावर निर्णय होवू शकतो, दहा-पंधराजण म्हणतात म्हणून तसे घडू शकत नाही याचा पुनरुच्चारही सरपंच गुंजाळ यांनी केला आहे.

सत्ता असेल तरीही कायदेशीर मार्गाने केल्या जाणार्या मागणीवरच गुंजाळवाडी ग्रामपंचायत कारवाई करेल. नियमानुसार असेल त्याप्रमाणे त्यावर निर्णय आणि अंमलबजावणीही होईल, त्यावर कोणाचीही हरकत असणार नाही. मात्र कोणी हुकूमशाही पद्धतीने असाप्रकार करणार असेल तर, तो कदापि सहन करणार नाही. गावातील वातावरण सौहार्दाचे आहे, त्याला गालबोट लागणार नाही याची जबाबदारी ग्रामस्थांची आहे, त्यामुळे ग्रामस्थांचा निर्णय सगळ्यांसाठी मान्य असेल असेही सरपंच नरेंद्र गुंजाळ यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हंटले आहे.

शहरालगतच मोठ्या लोकसंख्येच्या गुंजाळवाडी ग्रामपंचायतीवर माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या गटाचे निर्विवाद वर्चस्व असून सर्व 18 सदस्य त्यांच्याच पक्षाचे आहेत. मात्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या सत्ता बदलानंतर तालुक्यातील काही ठिकाणी ग्रामपंचायत स्तरावरही त्याचे प्रतिबिंब उमटताना दिसत आहेत. मध्यंतरी पेमगिरी ग्रामपंचायतीत घडलेल्या राजकीय नाट्यानंतर आता गुंजाळवाडी प्रकरणातही ‘लोकप्रतिनिधींच्या प्रतिमांचा’ विषय समोर आल्याने त्यावरुन तालुक्याचे राजकारण तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

