ब्राह्मणीमध्ये महिलेच्या धर्म परिवर्तनाचा डाव हाणून पाडला पोलीस आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या मध्यस्थीने वादावर पडदा
नायक वृत्तसेवा, राहुरी
तालुक्यातील ब्राह्मणीमध्ये महिलेचे पंजाब येथील धर्मगुरु धर्म परिवर्तन करण्याचा प्रयत्न करताना स्थानिक नागरिकांनी हाणून पाडला. त्या महिलेचे बळजबरीने धर्मांतर होत असल्याने नागरिकांचा संताप अनावर होऊन तेथे काहीकाळ तणाव निर्माण झाला. या धर्मगुरूने विनयभंग केल्याचा आरोपही पीडित महिलेने केला आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याची चर्चा आहे.
ब्राह्मणी येथे रविवारच्या दिवशी बाजारतळावर अनेक नागरिक जमा झाले होते. त्याठिकाणी एक प्रार्थना सुरू होती. मोठा आवाज येत असल्याने स्थानिक गावकर्यांचे त्याकडे लक्ष वेधले. आवाज कमी करण्याच्या कारणावरून दोन गटांत चांगलीच बाचाबाची होऊन हुज्जत झाली. काहीकाळ वाद मिटला असता त्यानंतर तुम्ही आमच्या गावात येऊन याठिकाणी अंधश्रद्धेसारखा प्रकार का करत आहात? याचा जाब मोबाईलमध्ये शूटिंग घेऊन विचारण्यात आला. हा प्रकार सुरू असताना काही जागरूक नागरिकांनी तत्काळ पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनेच्या ठिकाणी येऊन नागरिकांना आवाहन करत गर्दी पांगवली.
पोलीस आल्यानंतर त्या वादावर पडदा पडला. मात्र, दुसर्या दिवशी अचानक एका महिलेने राहुरी पोलीस ठाण्यात येऊन मलाही एका धर्मगुरूने धर्म परिवर्तन करण्यासाठी काही रुपये देऊन तुम्ही आमच्या धर्मात या, असे आमिष दाखविले असल्याचे महिलेने तक्रार केल्याची चर्चा झाली. या घटनेची माहिती काही सामाजिक संघटनेच्या पदाधिकार्यांना मिळाली असता अनेकांनी पोलिसांत धाव घेतली. त्यानंतर हा वाद मिटविण्यात पोलीस निरीक्षक व सामाजिक कार्यकर्त्यांना यश आल्याने अनेकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. हा वाद येथेच मिटवण्यासाठी पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, तालुकाध्यक्ष विलास साळवे, भारतीय जनता पक्षाचे विक्रम तांबे, पंचायत समितीचे सदस्य सुरेश बानकर आदिंसह सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येत या वादावर पडदा पाडला.