कोंढवड-पिंप्री रस्ता खुला करताना शेतकर्यांचे होणार नुकसान शेतकर्यांचे नुकसान टाळण्यासाठी नवीन रस्ता करण्याची मागणी

नायक वृत्तसेवा, राहुरी
तालुक्यातील पानंद रस्ते, शीवरस्ते खुले करताना किती शेतकर्यांना रस्त्यांचा फायदा होईल हे न पाहता रस्ते खुले करण्यात येत आहे. तरी कोंढवड ते जुना पिंप्री रस्ता खुला करताना अल्पभूधारक शेतकर्यांचे नुकसान होणार नाही, याची दक्षता घेत रस्त्याचा पर्याय निवडला जावा अशी मागणी येथील शेतकर्यांनी तहसीलदारांकडे निवेदनातून केली आहे.

सदर निवेदनात म्हटले आहे की, भूमि अभिलेखकडील नकाशाप्रमाणे तहसीलदार फसियोद्दीन शेख यांनी जो निर्णय घेतला आहे, तरी त्याप्रमाणे रस्ता केल्यास शेतकर्यांची सोयीपेक्षा गैरसोय होण्याची शक्यता आहे. सदर कोंढवड ते जुना पिंप्री रस्ता खुला करताना अल्पभूधारक शेतकर्यांच्या जमिनीचे लहान लहान तुकडे होऊन अनेकांची घरे, शेड उद्धवस्त होणार आहे. गेली पन्नास वर्षांपासून या भागात शेतकरी वास्तव्य करत आहेत. त्यांनी आपल्या सोयीनुसार शेतात जाण्यासाठी रस्ते केले आहेत. नकाशाप्रमाणे रस्ता होण्यास अनेकांचा विरोध असून त्याऐवजी तहसीलदार शेख यांनी समक्ष पाहणी करून जास्त शेतकर्यांना फायदा होईल व मोठ्या प्रमाणात शेतकर्यांचे नुकसान होणार नाही, अशा योग्य मार्गाने नवीन रस्ता करावा, अशा मागणीचे निवेदन देण्यात आले आहे.

शेतकर्यांचे नुकसान टाळून जास्तीत जास्त शेतकर्यांना रस्त्याचा फायदा व्हावा, अशा पद्धतीने रस्ता खुला करून शेतकर्यांना न्याय द्यावा, अशी मागणी छावा युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब भोसले, प्रहार जनशक्ती पक्षाचे सुरेश लांबे, क्रांतीसेनेचे मधुकर म्हसे, संदीप ओहोळ, श्री संत सावता माळी युवक संघाचे दीपक साखरे, जयहिंद सैनिक सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष शिवाजी पालवे, छावा क्रांतीवीर सेनेचे अध्यक्ष आशिष कानवडे आदिंसह शेतकर्यांनी केली आहे. सदर मागणीचे निवेदन देताना विष्णू म्हसे, लक्ष्मण म्हसे, बाबासाहेब म्हसे, प्रवीण म्हसे, रंगनाथ म्हसे, संभाजी म्हसे, सुरेश म्हसे, अनिल पिसाळ, ऋषीकेश भोंगळ, विकास म्हसे, बाबासाहेब मकासरे, सुनील पोटे आदिंसह शेतकरी उपस्थित होते.
