हिंदूत्वावर बोलणार्‍यांना गप्प करण्याचे काँग्रेसी षडयंत्र : भोसले घुलेवाडी प्रकरणी संगमनेरात आंदोलन; आमदार अमोल खताळांकडूनही टीकास्त्र..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री राहिलेल्या बाळासाहेब थोरात यांना अद्यापही सत्य पचनी पडले नसून सामान्य शेतकर्‍याच्या मुलाकडून झालेला पराभव त्याच्या जिव्हारी लागला आहे. वारकरी संप्रदायाने केलेल्या हिंदू जागरणातून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अशी उदाहरणं उभी राहीली असून पराभवाची मीमांसा करण्यासाठी काँग्रेसने नेमलेल्या एजन्सीकडून तसा अहवालही राहुल गांधी यांना सोपवण्यात आला आहे. त्यामुळे काँग्रेसकडून राज्यातील संतांचे विचार वाहणार्‍या कीर्तनकारांना लक्ष्य करण्याची योजना आखण्यात आली असून प्रायोगिक तत्वावर घुलेवाडीत घडलेल्या प्रकाराकडे बघितले जात आहे. मात्र काँग्रेसचा हा कुटील डाव येथील जागृत हिंदूत्त्ववादी कार्यकर्त्यांनी हाणून पाडल्याने आपल्या राजकीय स्वार्थासाठी धर्माशी गद्दारी करणारे ‘धर्मद्रोही’ म्हणून उघड झाल्याची घणाघाती टीका भारतीय जनता पक्षाच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांनी केली.


घुलेवाडीतील मारुती मंदिरात सुरु असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमात शनिवारी (ता.16) राजगुरुनगर येथील कीर्तनकार संग्रामबापू महाराज भंडारे यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. तुकोबारायांच्या अभंगाने सुरु झालेल्या कीर्तनात महाराजांनी बराचवेळ अन्य गोष्टींवरच बोलण्यास सुरुवात केल्याचा आरोप करीत कार्यक्रमात असलेल्या काहींनी गोंधळ घातला, त्यातून कीर्तनकार आणि संबंधितांमध्ये शाब्दीत चकमक होवून महाराजांच्या अंगावर धावून जाण्यापर्यंतचा प्रसंग घडल्याने त्याचे पडसाद उमटले. संगमनेरातील विविध हिंदूत्त्ववादी संघटनांनी सकल हिंदू समाजाच्या बॅनरखाली आज (ता.18) सकाळी बसस्थानकासमोर रास्तारोको आंदोलन करीत घुलेवाडी प्रकरणाचा निषेध केला. यावेळी भोसले यांच्यासह संगमनेरचे आमदार अमोल खताळ, तपस्वी छावणीचे पीठाधिश्‍वर परमहंस आचार्य यांचे उत्तराधिकारी महंत एकनाथ महाराज (अयोध्या), राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, भाजपचे तालुकाध्यक्ष गुलाबराजे भोसले, शहराध्यक्ष पायल ताजणे, शिवसेनेचे जिल्हा संघटक विठ्ठल घोरपडे, तालुका प्रमुख रामभाऊ रहाणे, शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.


यावेळी भोसले यांनी माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर चौफेर टीका करताना परकीय स्त्रीची गुलामी करताना स्वार्थी राजकारणासाठी आणि नेत्याच्या गुलामीसाठी धर्माशी गद्दारी करणं हिंदूद्रोहच असल्याची बोचरी टीका केली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, दोनवेळा महसूलमंत्री अनेकवेळा मंत्री राहिलेल्या व घराणेशाही आणि सरंजामशाहीचे प्रतिक असलेल्या बाळासाहेब थोरात यांना एका सामान्य शेतकर्‍याच्या मुलाकडून पराभव झाल्याचे सत्य अद्यापही पचनी पडले नसल्याचे सांगत भोसले यांनी सुकलेली जखम पुन्हा भळभळवण्याचा प्रयत्न केला. स्वतःला मतदारसंघाचे मालक समजणार्‍या अशा अनेक दिग्गजांना जनतेने पराभव दाखवल्याचे सांगत त्यामागील कारणांचा शोध घेण्यासाठी काँग्रेसने एका खासगी एजन्सीची नियुक्तिही केली होती असा गौप्यस्फोट त्यांनी केला.


या एजन्सीने राहुल गांधी यांना सोपवलेल्या अहवालात महाराष्ट्रातील साधु-संत, महंत व वारकर्‍यांनी हिंदू धर्मात जागृती निर्माण केल्याने महाराष्ट्रात काँग्रेसचा दारुण पराभव झाल्याचा निष्कर्ष काढला. म्हणून राहुल गांधींनी थोरात यांच्यासह काँग्रेसच्या सर्व बड्या नेत्यांना बोलावून हिंदू धर्माचे गुणगान गाणार्‍या वारकरी संप्रदायातील संतांची व कीर्तनकारांची तोंडे बंद करण्यासाठी त्यांच्याविरोधात षडयंत्र रचले असून प्रायोगिक तत्वावर घुलेवाडीत त्याचा प्रयोग झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. मात्र संगमनेरकरांनी हा कुटील डाव मोडून काढल्याचे सांगत हा प्रकार धर्मद्रोह असल्याची पृष्टीही त्यांनी जोडली.


आमदार अमोल खताळ यांनी अफजलखान अथवा औरंगजेबाविरोधात छत्रपती शिवाजी महाराजांनी गाजवलेला पराक्रम सांगणे म्हणजे राजकारण असतं का? असा सवाल करीत माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. धर्म जागरणाचे काम करणार्‍या वारकरी संप्रदायाला लक्ष्य करण्याचे हे कुटील षडयंत्र धर्मसत्ताच नष्ट करेल असा इशाराही त्यांनी दिला. धर्मकार्य करणार्‍यांना पगारी माणसं पाठवून त्रास देण्याचा प्रकार कदापी सहन करणार नसल्याचे सांगताऊ त्यांनी ज्यांनी यापूर्वी कधीही तीथीनुसार किंवा तारखेनुसार शिवजयंती उत्सव केला नाही त्यांना आता आमचा उत्सव पाहून पोटशूळ उठल्याची घणाघाती टीकाही आमदार खताळ यांनी केली.


आमदार सत्यजीत तांबे यांचा ‘भाचा’ असा उल्लेख करीत आमदार खताळ यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासोबतच्या त्यांच्या छायाचित्रांवरही कोटी चढवली. ‘साहेब पडले तरीही भाचा आहे’ असा समज करुन घेणार्‍यांचा बगलबच्चे असा नामोल्लेख करीत त्यांनी नाव न घेता आमदार तांबे यांच्यावरही जहरी टीका केली. धर्मावर, साधु-संतांवर हात उचलणार्‍यांना जनता कधीही माफ करणार नाही असेही आमदार खताळ यांनी शेवटी बजावले.


यावेळी मोठ्या संख्येने जमलेल्या कार्यकर्त्यांनी पुणे-नाशिक महामार्गावरच ठिय्या दिल्याने वाहतूक दीर्घकाळ अडखळली होती. यावेळी विविध पक्ष व संघटनांच्या पदाधिकार्‍यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यकर्त्यांच्या मोठ्या उपस्थितीत वारंवार होणाऱ्या घोषणाबाजीने वातावरणही चांगलेच तापले होते. पोलिसांनी घुलेवाडी, अकोले बायपास, पिंपरणे व समनापूर चौफुलीपासून पुणे, नाशिक व अहिल्यानगरची वाहतूक वळवून काहीप्रमाणात रहदारी कमी करण्याचा प्रयत्न केला.

सुसंस्कृत संस्कृती टीकवण्याची जबाबदारी आपली : थोरात
 घुलेवाडीच्या हरिनाम सप्ताहात घडलेला प्रकार समजून घेण्याची गरज आहे. संगमनेर तालुका बंधुभाव आणि शांतता जोपसणारा, विकासाकडे सातत्याने वाटचाल करणारा तालुका आहे. हरिनाम सप्ताहात संतांचे विचार मांडण्याची, समाजाला व्यसनांपासून दूर नेणार्‍या विचारांची अपेक्षा असते. या व्यासपीठावर राजकारण करायचे नसते. या ठिकाणी सगळ्याच पक्षाची माणसं येत असल्याने त्यापासून दूर राहीले पाहिजे, तरच बंधुभाव टीकून राहील.


मात्र घुलेवाडीत तथाकथित महाराजांनी राजकारणावरच भाषण द्यायला सुरुवात केली. त्याला नागरिकांमधून विरोध झाला. अतिशय शांततेत काहींनी महाराजांना अभंगावर बोलण्याची विनंती केली. मात्र या प्रकरणाला वेगळी हवा देवून खोट्या केसेस, त्रास देण्याचा प्रकार दिसतोय, त्यातून दहशत निर्माण केली जात आहे. माणसांमध्ये भेद निर्माण करुन तालुक्यातील शांतता बिघडवण्याचे प्रकार सुरु आहेत. संगमनेर तालुका अत्यंत सुजलाम्-सुफलाम् आहे, शांत आहे. त्याचा विकास मोडण्यासाठी काही ‘शक्ति’ प्रयत्न करीत आहेत, त्याचाच हा भाग आहे.


विधानसभा निवडणूकीपूर्वीही असाच मोर्चा काढण्यात आला होता. निवडणुका आल्यात की, असा मोर्चा काढायचा, भाषणं करायची आणि वातावरण खराब करायचे. आता पुन्हा निवडणुका आल्याने घुलेवाडीत जे घडलं त्यामागील सत्य न पाहता मोर्चा काढून तालुक्याचे वातावरण बिघडवले जात आहे, त्यातून तालुक्याचा विकास कसा थांबवता येईल याचे प्रयत्न सुरु आहेत. संगमनेरची वेगळी राजकीय सुसंस्कृत अशी संस्कृती आहे, बंधुभाव आणि विकासाकडे वाटचाल सुरु आहे. ती टीकवण्याची जबाबदारी आपली सगळ्यांची आहे. सध्या जे काही घडतंय त्याकडे काळजीपूर्वक पाहून अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.
बाळासाहेब थोरात
माजीमंत्री, महाराष्ट्र राज्य

Visits: 143 Today: 2 Total: 1109330

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *