आंबीखालसा येथून मालवाहू ट्रकच्या चाकांची चोरी
नायक वृत्तसेवा, घारगाव
पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या आंबीखालसा (ता.संगमनेर) येथील कोहिनूर गॅरेजमध्ये उभ्या असलेल्या मालवाहू ट्रकची चार चाके, बॅटरीसह इतर साहित्य चोरुन नेल्याची घटना शुक्रवारी (ता.30) पहाटे घडली आहे.
याबाबत घारगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, आंबीखालसा येथील कोहिनूर मोटार गॅरेजमध्ये दिलीप रंगनाथ घुले (रा. जांबुत बु.) यांनी आपला मालवाहू ट्रक (क्र.एमएच.14, एएस.8795) हा कामानिमित्त उभा केला होता. दरम्यान, शुक्रवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी जॅक लावून चारही चाके, बॅटरी व इतर साहित्य चोरुन पोबारा केला. सकाळी हा प्रकार गॅरेज चालकाच्या निदर्शनास आला. त्यांनी तत्काळ ही माहिती ट्रकमालक घुले यांना दिली. त्यानंतर थेट घारगाव पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. माहिती समजताच पोलीस नाईक राजेंद्र लांघे यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. यापूर्वी देखील अशाच घटना घडल्या आहेत. त्याचा तपास बाकी असतानाच पुन्हा घटना घडल्याने वाहनमालकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.