‘हिंदुत्त्वाचे’ गुणगान करणार्या कीर्तनकारावर घुलेवाडीत हल्ला! राजगुरुनगरचे संग्रामबापू महाराज भंडारे; चौदाजणांवर विविध कलमान्वये गुन्हा..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
घुलेवाडीच्या हनुमान मंदिरात सुरु असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमाला शनिवारी गालबोटं लागले. सप्ताहाच्या चौथ्या दिवशी राजगुरुनगर (जि.पुणे) येथील कीर्तनकार हभप संग्रामबापू महाराज भंडारे यांचे कीर्तन सुरु असताना परिसरात राहणार्या चौघा नागरिकांसह अज्ञात आठ ते दहा जणांनी महाराजांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करीत त्यांच्या अंगावर धावून जात हल्ला करण्याचा प्रयत्न केला. काही मिनिटांच्या या घटनेने शेकडों भाविक उपस्थित असलेल्या या कार्यक्रमात एकच गोंधळ उडाला आणि कीर्तनाचा कार्यक्रमही थांबवावा लागला. याप्रकरणी चौथ्या दिवसाच्या कार्यक्रमाचे यजमान असलेल्या स्वरुप राऊत यांच्या फिर्यादीवरुन 14 जणांवर भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी कीर्तनकाराच्या वाहनाचेही नुकसान केल्याचे दाखल तक्रारीत म्हटले आहे. या घटनेने संगमनेर तालुक्यासह संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात खळबळ उडाली असून महाराज ‘हिंदुत्त्वा’चे गुणगान करीत असल्यानेच काहीजणांनी ठरवून गोंधळ घातल्याची चर्चा या घटनेनंतर परिसरात सुरु आहे.

याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून समजलेल्या माहितीनुसार सदरचा प्रकार शनिवारी (ता.16) रात्री दहाच्या सुमारास घुलेवाडी गावठाणात असलेल्या हनुमान मंदिरात घडला. गेल्या बुधवारपासून (ता.13) मंदिरात हरिनाम सप्ताहाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून येत्या बुधवारी (ता.20) त्याची सांगता होणार आहे. या दरम्यान रोज रात्री 9 ते 11 यावेळेत मंदिरात विविध कीर्तकारांची कीर्तनसेवा होत असून शनिवारी (ता.16) सप्ताहाच्या चौथ्या दिवशी राजगुरुनगर (जि.पुणे) येथील कीर्तनकार तथा समाज प्रबोधनकार संग्रामबापू महाराज भंडारे यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम सुरु होता. परिसरातील शेकडो महिला, मुले, वृद्ध चार दिवसांपासून नियमितपणे मंदिरातील या धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित होते.

तुकोबारायांच्या अभंगाने सुरु झालेल्या शनिवारच्या कीर्तनात रात्री दहाच्या सुमारास अचानक गोंधळ उडाला. यावेळी श्रोत्यांमध्ये बसलेल्या नीलेश दगडू गायकवाड यांनी अचानक कीर्तन सुरु असताना उभे राहून महाराजांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्याला अनिल बबन राऊत, वैभव दगडू गायकवाड, तुळशीराम हरिश्चंद्र दिघे यांच्यासह अन्य आठ ते दहाजणांची साथ लाभल्याने त्यांनी शिवीगाळ करीत कीर्तनात गोंधळ घातला आणि महाराजांच्या अंगावर धावून जात त्यांच्यावर हल्ला करण्याचाही प्रयत्न केला. यावेळी वरील सर्वांनी चौथ्या दिवसाच्या कीर्तनसेवेचे यजमान स्वरुप गजानन राऊत यांना उद्देशून ‘तुम्ही हरिनाम सप्ताह कसा करता तेच बघतो..’ असे म्हणतं सुरु असलेला कीर्तनाचा कार्यक्रम बंद पाडला.

यावेळी या सर्वांनी मंदिराच्या परिसरात उभ्या असलेल्या संग्रामबापू महाराज यांच्या चारचाकी वाहनाची तोडफोड करीत त्याचेही नुकसान केल्याचे शहर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीत म्हटले आहे. त्यावरुन पोलिसांनी घुलेवाडीचे उपसरपंच अनिल बबन राऊत यांच्यासह नीलेश दगडू गायकवाड, वैभव दगडू गायकवाड व तुळशीराम हरिश्चंद्र दिघे या चौघांसह अज्ञात 8 ते 10 जणांविरोधात भारतीय न्यायसंहितेच्या कलम 131, 300, 189 (2), 190, 351 (2), 352, 324 (4) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत कीर्तनाचा कार्यक्रम सुरु असतांना कीर्तनकारालाच शिवीगाळ व हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप झाल्याने संपूर्ण तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली असून राज्यपातळीवर त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. या प्रकरणातील आरोपींचा राजकीय नेत्यांशीही संबंध जोडला जात असल्याने या प्रकरणाला राजकीय गंधही येत आहे.

या प्रकरणाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला असता रात्री नऊच्या सुमारास तुकोबारायांच्या अभंगाने कीर्तनाला सुरुवात झाली होती. मात्र सुरुवातीच्या अभंगानंतर कीर्तनकार संग्रामबापू यांनी देशातील विविध घडामोडींवर भाष्य करताना हिंदूत्वावर भर द्यायला सुरुवात केल्याने श्रोत्यांमध्ये बसलेल्या काहींना ते टोचले. त्यातून अभंगाचे निरुपण करा महाराज अशा काही जणांमध्ये सुरु असलेल्या दबक्या आवाजातील चर्चेला वाचा फोडीत नीलेश गायकवाड यांनी त्यावर उघड भाष्य केले. त्यातून महाराज आणि गायकवाड यांच्यात शाब्दीक फेकाफेक झाल्याने वातावरण तापले. त्यातूनच सप्ताहाचे आयोजक आणि गायकवाडांसह त्यांच्या आठ ते दहा समर्थकांमध्ये हमरीतुमरी होवून गोंधळ उडाला. त्यामुळे व्यथीत झालेले संग्रामबापू भंडारे महाराज आपल्या वाहनात बसून निघून गेल्याने शनिवारी अर्ध्यावरच कीर्तन खंडीत झाले.

या घटनेची चर्चा वेगवेगळ्या रंगछटांसह सादर होत असल्याने त्याचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली असून ‘कीर्तनकारावर भ्याड हल्ला’ अशा आशयाखालील निषेध फलकांचा आणि मजकूरांचा सोशल माध्यमातील प्रभाव वाढू लागला आहे. त्यातून या प्रकरणाला अधिक हवा मिळण्याची शक्यता असून राज्यपातळीवर त्याचे प्रतिध्वनी उमटू शकतात. तूर्त याप्रकरणी एकाबाजूने तक्रार दाखल झाली असून दुसर्या पक्षाकडूनही विरोधी फिर्याद दाखल होण्याची शक्यता आहे.

