अश्लील व्हिडीओ दाखवून शिक्षकांचे मुलींशी गैरवर्तन शिर्डीतील दोघा शिक्षकांना पोलिसांनी केले गजाआड

नायक वृत्तसेवा, शिर्डी
येथील जिल्हा परिषद शाळेतील अनेक अल्पवयीन मुलींना मोबाईलवरून दोन शिक्षक अश्लील व्हिडीओ दाखवत त्यांच्याशी गैरवर्तन करत असल्याचा प्रकार सोमवारी (ता.19) उघडकीस आल्याने शिर्डीसह राज्यात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान सदर विद्यार्थिनींच्या महिला पालकांनी शाळेत जाऊन या शिक्षकांना जाब विचारत चांगलाच चोप दिला.

विद्यार्थी ज्यांना गुरू मानतात त्याच शिक्षकरूपी गुरूंच्या या कृत्यामुळे शिर्डीत असंतोषाची लाट उसळली असून जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या शेकडो संतप्त पालकांनी संबंधित शिक्षकांना चांगलाच चोप दिला. या बातमीची माहिती मिळताच शिर्डी पोलिसांची फौज शाळेत दाखल होऊन शिक्षक संजय सखाहरी थोरात व राजेंद्र माधव थोरात यांना ताब्यात घेतले. अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सदर मुलींप्रमाणे अन्य 10 ते 12 अल्पवयीन मुली सुद्धा या शिक्षकांच्या शिकार झाल्या आहेत. हे शिक्षक मुलींना मोबाईलवरून अश्लील व्हिडीओ दाखवून त्यांच्यासोबत अश्लील चाळे करत होते, असे मुलींनी पोलिसांना सांगितले. हा प्रकार अनेक दिवसांपासून सुरू होता. मात्र हे शिक्षक मुलींना तुम्ही याची वाच्यता कुठे केल्यास तुमचा दाखला रद्द करण्याची धमकी देत होते. गरीब कुटुंबातील या मुली भीतीपोटी हा प्रकार सहन करत होत्या. एका मुलीने तर शाळेत जाणेच सोडले. तिचे शाळेत न जाण्याचे कारण जेव्हा तिच्या आईने विचारले तेव्हा या मुलीने रडत रडत सर्व हकीगत आईला सांगितली.

मुलीच्या आईने या गंभीर प्रकाराची माहिती इतर पालकांना सांगितली. तेव्हा अनेक पालकांनी आपल्या मुलींना विश्वासात घेत विचारणा केली असता अनेक मुलींनी हे शिक्षक आम्हांला अश्लील फोटो दाखवत होते, असे सांगितल्याने हा प्रकार समोर आला. त्यानंतर पालकांचा राग अनावर झाला आणि त्यांनी थेट शाळेत जाऊन या शिक्षकांना जाब विचारला. मात्र त्यांंचे उद्धट बोलणे आणि खोटं सोंग घेणे हे सर्वांच्या लक्षात आल्यावर पालकांनी या शिक्षकांना चांगलाच चोप दिला.

या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस उपअधीक्षक संजय सातव यांनी पोस्को कायद्यांतर्गत भादंवि कलम 8 व 12 यासह अनुसूचित जाती-जमाती कायद्यानुसार संजय सखाहरी थोरात आणि राजेंद्र माधव थोरात या दान्ही शिक्षकांना अटक केली आहे. याचबरोबर इतर अल्पवयीन मुलींचे जबाब नोंदवून आणखी कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी दिली. या घटनेची माहिती जिल्हाभर वार्‍यासारखी पसरल्याने अनेक संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी व मुलींच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.

साईबाबांच्या या पावनभूमीतील जिल्हा परिषद शाळेला दीडशेहून जास्त वर्ष झाली आहे. सन 1881 साली या शाळेची स्थापना झाली होती. शिर्डीतील अनेक दिग्गज नागरिक या शाळेचे विद्यार्थी आहेत. त्यामुळे शिर्डी ग्रामस्थांचे या शाळेविषयी जिव्हाळ्याचे नाते आहे. परंतु आजवरच्या इतिहासात प्रथमच याच शाळेत असा गंभीर प्रकार घडल्याने शिर्डीत संतापाची लाट पसरली आहे. नागरिकांनी या शिक्षकांना कठोर शिक्षा तसेच यांना कायमस्वरूपी बडतर्फ करण्याची मागणी केली आहे.

Visits: 126 Today: 1 Total: 1424109

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *