नगर अर्बन बँक फसवणूक प्रकरण; आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास कर्जदार खातेदारांचे धाबे दणाणले; कायदेशीर सल्लामसलतीसाठी धावपळ

नायक वृत्तसेवा, शेवगाव
नगर अर्बन बँकेच्या येथील शाखेत बनावट सोने तारण ठेवून केलेल्या फसवणूक प्रकरणी गोल्ड व्हॅल्युअरसह 159 कर्जदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी बँकेच्या शाखेत जाऊन मंगळवारी (ता. 3) घटनास्थळाचा पंचनामा केला. फसवणुकीची रक्कम 50 लाखांपेक्षा जास्त असल्याने हा गुन्हा नगर येथील आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. यामुळे कर्जदारांचे धाबे दणाणले आहेत.

नगर अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेत सन 2017 ते 2021 या कालावधीत गोल्ड व्हॅल्युअर व कर्जदार यांनी संगनमत करून बनावट दागिने गहाण ठेवून बँकेकडून तब्बल 5 कोटी 30 लाख 13 हजार रुपयांचे कर्ज घेतले. त्यामध्ये 159 कर्जदारांचा समावेश आहे. त्यातही एकाच घरातील पती-पत्नी, पिता-पुत्रांचा समावेश आहे. मंगळवारी (ता.3) पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांनी बँकेच्या शाखेत जाऊन घटनास्थळाचा पंचनामा केला. या संदर्भातील चौकशीसाठी लागणारे कागदपत्रे शाखेतून हस्तगत केली. गैरव्यवहारातील रक्कम 50 लाखांपेक्षा जास्त असल्याने हा गुन्हा नगर येथील आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

दरम्यान मंगळवारपासून कर्जदार खातेदारांचे धाबे दणाणले आहेत. अनेकजण नॉट रिचेबल झाले असून, या कटकटीतून सुटका करून घेण्यासाठी कायदेशीर सल्लामसलती सुरू झाल्या आहेत. शाखा व्यवस्थापक गोरक्षनाथ शिंदे यांच्या आत्महत्या प्रकरणाची शेवगाव शाखेचे व्यवस्थापक अनिल आहुजा, बँक बचाव समितीचे अध्यक्ष राजेंद्र गांधी, मनोज गुंदेचा यांच्याकडे पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे यांनी प्राथमिक चौकशी केली. अर्बन बँकेच्या नगर मुख्य शाखेतील सहाय्यक व्यवस्थापक व चौकशी अधिकारी मनोज फिरोदिया चौकशीस उपस्थित राहिले नाहीत.

Visits: 40 Today: 1 Total: 427462

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *