‘ध्रुव’च्या योगासनपट्टूंची कामगिरी अभिमानास्पद : आ. खताळ

नायक वृत्तसेवा, संगमनेर
योगासनांचा खेळांमध्ये समावेश झाल्यापासून देशभरात पार पडलेल्या विविध स्पर्धांमध्ये महाराष्ट्राच्या योगासनपटूंनी नेत्रदीपक कामगिरी केल्याचे दिसून येते. त्यातही राज्यसंघात खेळणार्या ‘ध्रुव’ ग्लोबल स्कूलच्या योगासनपटूंनी पटकावलेल्या पदकांची संख्या अभिमानास्पद असल्याचे गौरवोद्गार आ.अमोल खताळ यांनी काढले.

महाराष्ट्र योगासन स्पोर्ट् असोसिएशनने संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलच्या प्रांगणात आयोजित केलेल्या सहाव्या राज्यस्तरीय योगासन स्पर्धेचे उद्घाटन आ. खताळ यांच्या हस्ते झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी संगमनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे, महाराष्ट्र योगासन स्पोर्ट् असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.संजय मालपाणी, सेक्रेटरी राजेश पवार, कोषाध्यक्ष कुलदीप कागडे, स्पर्धेचे तांत्रिक संचालक महेश कुंभार व अहिल्यानगर जिल्हा असोसिएशनचे सचिव उमेश झोटींग उपस्थित होते.

आ. खताळ पुढे म्हणाले, भारतीय क्रीडा प्राधिकरणाद्वारे उभारण्यात येणारे योग प्रशिक्षण केंद्र संगमनेरात सुरु व्हावे यासाठी राज्यस्तरावर प्रयत्न करणार आहे. आजच्या जीवनात योगासन आवश्यक बाब बनली आहे. नियमित योगासन केल्यास निरामय आणि आनंदी जीवनाची प्राप्ती होते. त्याच्या प्रचार-प्रसारासाठी महाराष्ट्र योगासन स्पोर्ट् असोसिएशनद्वारा सुरु असलेले प्रयत्न प्रशंसनीय आहेत. सामान्य परिवारातील विद्यार्थ्यांना योगासनांकडे आकर्षित करण्यासाठी जिल्हास्तरीय स्पर्धांच्या आयोजनासाठी राज्यशासनाकडून कायमस्वरुपी निधीची तरतूद व्हावी यासाठी उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारकडून शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार दिला जात असल्याबद्दल समाधान व्यक्त करून आ. खताळ पुढे म्हणाले, या खेळात प्रतिभा निर्माण करणार्या योगासनपटूंसाठी अद्यापही शासकीय नोकर्यांमध्ये पाच टक्के आरक्षणाचा निर्णय झालेला नाही, त्यावर लवकरात लवकर निर्णय व्हावा यासाठी आपण शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. लहान वयापासूनच विद्यार्थ्यांना योगासनांची गोडी लागावी यासाठी जिल्हा पातळीवरील स्पर्धांना राज्य शासनाकडून अनुदान मिळाले पाहिजे. त्यामुळे सामान्य कुटुंबातील मुलांचा सहभाग वाढण्यास मदत होईल असेही त्यांनी सांगितले. चार दिवस चालणार्या या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या सर्व ३६ जिल्ह्यांमधून ६२० सुवर्णपदक विजेते योगासनपटू, त्यांचे प्रशिक्षक, पंच आणि जिल्हा संघटनांचे पदाधिकारी संगमनेरात दाखल झाले आहेत. १० ते १४ आणि १४ ते १८ अशा मुला-मुलींच्या दोन स्वतंत्र वयोगटात पारंपरिकसह कलात्मक आणि तालात्मक योगासन प्रकारांमध्ये होणार्या या स्पर्धेतून प्रत्येक प्रकार व वयोगटातील सुवर्णपदक विजेत्या प्रत्येकी बारा मुला-मुलींची महाराष्ट्र संघासाठी निवड केली जाणार आहे.रुचिता ठाकूर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

या स्पर्धेच्या उद्घाटनानिमित्त खेलो इंडिया युथ गेम्समध्ये विजयी झालेल्या खेळाडूंसह त्यांच्या प्रशिक्षकांचा विशेष सन्मान करण्यात आला. डॉ.संजय मालपाणी यांनी प्रास्तविकात गेल्या सहा वर्षांतील महाराष्ट्र संघाच्या यशाचा धावता आलेख मांडला.

Visits: 100 Today: 4 Total: 1110369
