माजी मंत्री थोरात यांच्या पाठपुराव्यातून मंजूर झालेली कामे आमदारांनी थांबवली : खेमनर यांचा आरोप

नायक वृत्तसेवा, संगमनेर
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सततच्या विकास कामांमधून संगमनेर तालुका राज्यात अग्रेसर बनवला. संगमनेर तालुका हा विस्ताराने मोठा आहे. या तालुक्यातील विविध आठ रस्त्यांना मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून ४० कोटी रुपयांचा निधी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मंजूर करून घेतला होता. मात्र नवीन लोकप्रतिनिधीने आठ महिन्यात एक रुपयाचा निधी न आणता राजकारणासाठी मंजूर रस्त्यांची कामे रद्द करून दुर्दैवी राजकारण केले असल्याची टीका सभापती शंकर खेमनर यांनी केली असून मर्जीतील ठेकेदारांना सांभाळण्यासाठी केलेल्या या उद्योगाने तालुक्यात संतापाची लाट निर्माण झाली आहे.

संगमनेर तालुका हा विस्ताराने मोठा आहे.प्रत्येक वाडी वस्तीवर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विकासाच्या योजना राबवल्या असून तालुका हा एक परिवार ठरला आहे. तालुक्यातील विविध गावांमधील रस्त्यांसाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी १३ मार्च २०२४ रोजी ग्रामविकास विभागाकडे संगमनेर तालुक्यातील विविध आठ रस्त्यांना मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत समावेश होऊन या रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण करावे याकरता मागणी केली होती. यानुसार शासन पत्र ४ ऑक्टोबर २०२४ नुसार टप्पा दोन (बॅच १) च्या निर्णयानुसार ४० कोटी ७३ लाख ८१ हजार रुपये निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. यामध्ये डिग्रस ते रणखांबवाडी २.५० किलोमीटरसाठी ३ कोटी ५३ लाख ९७ हजार, चिखली ते जवळेकडलग ४.६०० किलोमीटरसाठी ६ कोटी ३१ लाख ८९ हजार, खरशिंदे ते खांबे रस्ता दोन किलोमीटरसाठी २ कोटी ४५ लाख ९६ हजार रुपये, मिर्झापूर ते धांदरफळ खुर्द रस्ता ४.२६ किलोमीटरसाठी ५ कोटी ६६ लाख ६६ हजार रुपये, पारेगाव खुर्द ते तिगाव वडझरी रस्ता ५.०३० किलोमीटरसाठी ६ कोटी १ लाख ४२ हजार रुपये, साकुर ते बिरेवाडी रस्ता ३.८५० किलोमीटर लांबीसाठी ४ कोटी ८१ लाख ५७ हजार रुपये, शिंदोडी ते ठाकरवाडी रस्ता तीन किलोमीटर करता ४ कोटी १६ लाख ३ हजार रुपये, तासकरवाडी ते खंडेरायवाडी रस्ता ५.३१० किलोमीटरसाठी ७ कोटी ७६ लाख ३१ हजार रुपये या कामांचा समावेश होता. एकूण ३०.५७० किलोमीटर लांबीसाठी ४० कोटी ७३ लाख ८१ हजार रुपयांचा निधी मंजूर केला होता. मात्र ७ ऑगस्ट २०२५ च्या नव्या अध्यादेशानुसार ही सर्व कामे रद्द करण्याचा शासनाकडून दुर्दैवी निर्णय घेण्यात आला आहे.

मागील आठ महिन्यांमध्ये नवीन सरकार मधून एक रुपयाचा निधी न आणता जुन्याच निधीवर उद्घाटनाचे कार्यक्रम करणाऱ्या नवीन लोकप्रतिनिधीने आपल्या मर्जीतील ठेकेदारांना सांभाळण्यासाठी हे सर्व कामे रद्द करून आणली आहेत. जेणेकरून ही जुनीच कामे पुन्हा नव्याने टेंडर करता येतील आणि आपल्या मर्जीतील ठेकेदारांना काम देता येईल असा हा डाव आहे. याचबरोबर मागील आठ महिन्यांपासून संगमनेर शहर व तालुक्यामध्ये वातावरण खराब करण्याचे काम सुरू झाले आहे. यामुळे तालुक्यात नवीन लोकप्रतिनिधी विरोधात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून हा कुठला दडपशाहीचा प्रकार असा सवाल विचारला जात आहे.

याचबरोबर असे दुर्दैवाचे राजकारण संगमनेर तालुक्यामध्ये कधीही नव्हते अशी भावना तालुक्यामध्ये निर्माण झाली आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मंजूर केलेल्या या रस्त्यांची कामे रद्द झाल्याने डीग्रस, रणखांबवाडी, साकुर पठार, चिखली, जवळेकडलग, खरशिंदे ,खांबा ,मिर्जापुर , धांदरफळ खुर्द, पारेगाव खुर्द, तिगाव, साकुर, बिरेवाडी ,शिंदोडी ,ठाकरवाडी, तासकरवाडी खंडेरायवाडी या गावांमधील नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला असून या सर्वांनी या दुर्दैवी घटनेचा तीव्र निषेध केला आहे.

काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुक्याचे लोकप्रतिनिधित्व करतांना मागील ४० वर्षात दरवर्षी सरकारमधून सातत्याने निधी आणला गावोगावी विकास कामे, साखळी बंधारे पूर्ण केले.निळवंडे धरण व कालवे पूर्ण केले, सत्ता असो वा नसो माजी मंत्री थोरात यांच्या वैयक्तिक संबंधातून तालुक्याला कायम निधी मिळाला. मात्र प्रथमच निधी न आणता मंजूर कामे रद्द करण्याचा दुर्दैवी प्रकार तालुक्यात झाला असल्याची भावना जनतेमध्ये निर्माण झाली आहे. हा प्रकार निंदनीय असल्याचे माजी सभापती निशा कोकणे यांनी म्हटले आहे.

Visits: 156 Today: 2 Total: 1423877
