संगमनेरचे परिचय संमेलन म्हणजे माहेश्वरी समाजाला वरदान : डॉ. वसंत बंग वधु-वर परिचय संमेलनाची अकरा वर्ष; राजस्थान युवक मंडळ व मालपाणी उद्योग समूहाचा उपक्रम

नायक वृत्तसेवा, संगमनेर
राजस्थान युवक मंडळ आणि मालपाणी परिवाराच्या पुढाकाराने व महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभा आणि संगमनेरमधील माहेश्वरी समाज यांच्या सहकार्याने आयोजित केले जाणारे विवाहयोग्य युवक-युवती परिचय संमेलन मागील दहा वर्षांपासून माहेश्वरी समाजाला वरदान ठरले आहे. हे संमेलन म्हणजे व्यवस्थापन कौशल्याचे सर्वोत्कृष्ट उदाहरण असल्याचे गौरवोद्गार प्रसिध्द व्यवस्थापन गुरु डॉ. वसंत बंग यांनी काढले.

अखिल भारतीय माहेश्वरी विवाहयोग्य युवक-युवती परिचय संमेलनाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते. राजस्थान मंडळाचे अध्यक्ष मनीष मालपाणी, स्वागताध्यक्ष राजेश मालपाणी, उद्योजक विजय आसावा, अजय लाहोटी, मंडळाचे कार्याध्यक्ष रोहित मणियार, प्रकल्पप्रमुख ओम इंदाणी, उपाध्यक्ष सम्राट भंडारी, संगमनेर तालुका माहेश्वरी सभेचे अध्यक्ष अतुल झंवर, कोषाध्यक्ष उमेश कासट, सचिव आशीष राठी, प्रकल्पप्रमुख सागर मणियार आदी यावेळी मंचावर उपस्थित होते. संमेलनासाठी महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपर्यातून युवक-युवतींसह तीन हजारांहून अधिक समाज बांधव उपस्थित होते.

डॉ. बंग यांनी आपल्या भाषणात विवाह संबंधित विविध मुद्द्यांचा प्रभावीरीतीने परामर्श घेतला. आजकाल विवाह जमविताना पॅकेज या गोष्टीला नको इतके जास्त महत्त्व दिले जात आहे. उद्योग, व्यवसायात अग्रेसर असलेला माहेश्वरी समाज प्रगतीशील आचार व विचारांचा समाज म्हणून नावलौकिक राखून आहे. त्यामुळे वैवाहिक नाती जुळविताना देखील नवीन दृष्टीकोन रुजविण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. विवाह ही अतिशय मंगल गोष्ट असताना आजकाल विवाह जमविणे ही समस्या का होऊन बसली याचा समाजाने गांभीर्याने विचार केला पाहिजे. मनीष मालपाणी यांच्या संकल्पनेतून होणारे संमेलन उपवरांसाठी आशेचा किरण आहे. प्रत्येक वर्षी या संमेलनाला मिळणारा वाढता प्रतिसाद ही यशस्वीतेची मोठी पावती असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

मनीष मालपाणी यांनी यावेळी बदलत्या सामाजिक स्थितीचा आढावा घेतला. पती हवा तर पुण्याचाच असा हट्ट केल्यामुळे अनेक मुलींच्या लग्नाचे वयं निघून जात आहे. संगमनेरसारख्या तालुका पातळीवर देखील जीवनमान सुखवस्तू आहे. मोठ्या शहरांचे विनाकारण आकर्षण बाळगणे बरोबर नाही. समंजसपणा हा संसाराचा पाया आहे. त्यामुळे आयुष्याचा जोडीदार शोधताना मुले-मुली दोघांनीही अपेक्षांच्या सीमारेषा आखून घेतल्या पाहिजेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. विवाह जमविण्याच्या समस्येची तीव्रता काही प्रमाणात तरी कमी करण्यात मागील दहा वर्षात आम्हांला यश आले आहे याचे खूप सामाधान असल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

स्वागताध्यक्ष राजेश मालपाणी यांनी आपल्या भाषणात येथील संमेलनात विवाह जुळण्यामागे ‘संगमनेर’ या नावाचाही महिमा असावा अशी मिश्किल टिप्पणी केली. त्यामुळेच येथे दोन परिवारांचा संगम होण्याचे योग येत असावेत असे ते म्हणाले. प्रमुख अतिथी उद्योजक विजयकुमार आसावा यांनी राजस्थान युवक मंडळाचे परिचय संमेलन म्हणजे जगन्नाथाचा रथ ओढण्याचे अथवा गोपालांनी गोवर्धन उचलावा असे कार्य असल्याचे सांगितले. यावेळी प्रिया लोहे, प्रियंका पोफळे, रश्मी करवा, मनीषा मणियार यांनी महेश वंदना सादर केली. रोहित मणियार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. रचना मालपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या परिचय पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान उपक्रमासाठी परिश्रम घेणार्या सुमित अट्टल, उमेश कासट, कैलास असावा, कल्याण कासट, द्वारकानाथ राठी, सुरेशचंद्र जाजू, चंद्रकलाबाई राठी, शालिनी मालपाणी, शांताबाई बजाज, मंगला आसावा, रामचंद्र जाजू, नंदकिशोर जाजू, कैलास राठी, मनोज साकी इत्यादी कार्यकर्त्यांचा सन्मानही यावेळी करण्यात आला. कृष्णा आसावा यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला, सूत्रसंचालन आदित्य मालपाणी, महेश झंवर व व्यंकटेश लाहोटी यांनी केले तर सम्राट भंडारी यांनी आभार मानले.
