स्वातंत्र्य लढ्यात आदिवासींचे मोठे योगदान : माजी मंत्री थोरात

नायक वृत्तसेवा, संगमनेर 
बुद्धिमत्ता ही एका समाजाची मक्तेदारी नसून शिक्षणातून सर्वांना प्रगती करता येते. आदिवासी बांधवांनी मुलांच्या शिक्षणावर अधिक लक्ष देऊन त्यांना चांगले शिक्षण दिल्याने त्या विद्यार्थ्यांबरोबर समाजाची मोठी प्रगती होणार आहे. या भूमीचा मूळ मालक असलेल्या आदिवासी बांधवांचे भारतीय स्वातंत्र्यलढ्यात मोठे योगदान असल्याचे गौरवोद्गार माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले.

संगमनेर बस स्थानक ते यशोधन कार्यालया दरम्यान आदिवासी विद्यार्थ्यांनी वेगवेगळी वेशभूषा करून भव्य रॅली काढली. याचबरोबर यशोधन कार्यालयाच्या प्रांगणात आदिवासी नृत्य सादर केले. यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात बोलत होते. यावेळी माजी आ.डॉ.सुधीर तांबे,आदिवासी सेवक प्रा.बाबा खरात, अजय फटांगरे, आदिवासी तालुकाध्यक्ष बाळकृष्ण गांडाळ  उपस्थित होते.
डॉ.सुधीर तांबे म्हणाले की, ९ ऑगस्ट क्रांती दिन हा भारत छोडो आंदोलनामुळे इतिहासामध्ये नोंदला गेला. याच दिवशी आदिवासी गौरव दिन आहे. आदिवासी हे जंगलाचे राजे आहेत परंतु आता ते शहरांचे राजे झाले पाहिजे. यासाठी शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी अधिक काम केले पाहिजे.स्वकर्तृत्वातून पुढे या असे आवाहन त्यांनी केले.

आदिवासी सेवक प्रा. बाबा खरात म्हणाले की, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आदिवासी समाजाच्या विकासाकरता सातत्याने मोठमोठ्या योजना राबवल्या आहेत. जयहिंद आदिवासी आश्रम शाळा, त्याचबरोबर घुलेवाडी येथे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेलची निर्मिती केली आहे. यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणाची मोठी संधी निर्माण झाली असल्याचे ते म्हणाले.यावेळी आदिवासी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या आदिवासी नृत्याला उपस्थित कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी मोठी दाद दिली. आदिवासी समाजातील बाळकृष्ण गांडाळ, धनश्री माळी यांसह गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
Visits: 115 Today: 1 Total: 1103975

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *