अनैतिक संबंधातून विवाहित महिलेचा खून? तालुक्यातील जाखुरीत घडला प्रकार; संशयीत आरोपी पोलिसांच्या रडारवर..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
मूळच्या छत्रपती संभाजीनगरच्या मात्र गेल्या आठ-दहा दिवसांपासून आपल्या नवर्यासह जाखुरीत मुक्कामी असलेल्या एका चाळीस वर्षीय महिलेचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. सदर महिलेचा खून झाल्याचा पोलिसांना संशय असून प्राथमिक तपासातून रविवारी तिला भेटण्यासाठी आलेल्या तिच्या प्रियकराकडूनच तिचा खून झाल्याचा प्राथमिक संशय आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून सर्व शक्यता पडताळल्या जात असून संशयीत आरोपी पोलिसांच्या रडारवर आल्याने त्याच्या मागावर तपास पथकेही रवाना करण्यात आली आहेत. त्यासोबतच पोलिसांना मयतेच्या पतीवरही संशय असल्याने त्याला ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी मयतेचा मृतदेह लोणीच्या प्रवरा ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. सदरचा प्रकार समोर आल्यानंतर ठसे तज्ञांसह न्यायवैद्यक तपास पथकालाही पाचारण करण्यात आले आहे. संगिता भारत मोरे असे या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे.

याबाबत संगमनेर तालुका पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार आज (ता.11) सकाळी तालुक्यातील जाखुरी शिवारात असलेल्या मांडेमळा परिसरातून सदरचा प्रकार समोर आला. मूळच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नागमटण (ता.वैजापूर) येथील रहिवाशी असलेली
संगिता भारत मोरे (वय 40) ही महिला आठ दिवसांपूर्वी संगमनेर तालुक्यातील जाखुरीत राहणार्या आपल्या पतीसह मुलीकडे आली होती. या दरम्यान रविवारी (ता.10) रात्री तिचा संभाजीनगर जिल्ह्यातील पूर्वाश्रमीचा प्रियकरही तिला भेटण्यासाठी जाखुरीत आला होता. त्यानंतर आज (ता.11) सकाळी सदर महिलेचा मृतदेह तिच्या नवर्याच्या घरापासून काही अंतरावर आढल्याने एकच खळबळ उडाली. याबाबत पोलीस पाटलांमार्फत तालुका पोलिसांना घटनेची माहिती कळवण्यात आल्यानंतर पोलीस उपअधिक्षक कुणाल सोनवणे, तालुका निरीक्षक प्रवीण साळुंखे आदींसह पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांच्या प्राथमिक पाहणीत मयत महिलेच्या गळ्याभोवती आवळल्याचा खुणा आढळून आल्याने सदर महिलेचा खून झाल्याचा दाट संशय आहे. त्या अनुषंगाने पोलिसांनी न्यायवैद्यक तपास पथकासह ठसे तज्ञांनाही घटनास्थळी पाचारण केले असून मयतेच्या प्रियकरावर संशय ठेवून त्याच्या
शोधासाठी तपास पथके रवाना करण्यात आली आहेत. शिवाय या प्रकरणात तिच्या पतीवरही संशयाची सुई असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. प्राथमिक तपासातून पोलिसांसमोर उभ्या राहिलेल्या संशयीत आरोपीच्या मागावर पोलीस पथकं रवाना झाली असली तरीही त्याचा कोणताही ठावठिकाणा लागत नसल्याने मयतेच्या प्रियकरावरील संशय अधिक बळावला असून तो हाती लागल्यानंतरच या प्रकरणाचे रहस्य उलगडणार आहे. मात्र या घटनेने संपूर्ण जाखुरी पंचक्रोशीसह तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

निष्क्रिय कारकीर्दीची अखंड मालिका अनुभवणार्या संगमनेर तालुका पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी शहराचा पुर्वानुभव
असलेल्या प्रवीण साळुंखे यांची नियुक्ति झाल्यानंतर दोनच दिवसांत घडलेल्या या घटनेचा तपास लावण्याचे आव्हान त्यांच्यासमोर उभे राहीले आहे. खुनाच्या या प्रकरणात सुरुवातीच्या तपासात रविवारी तिला भेटण्यासाठी आलेल्या तिच्या प्रियकरावर संशयाची सुई असून तिच्या नवर्याकडेही संशयीत म्हणून बघितले जात आहे. मात्र सध्या त्याचे ‘लोकेशन’ सापडत नसल्याने पथकाचे हात अद्यापही रिकामेच आहेत. सदरचा संशयीत हाती लागल्याशिवाय या प्रकरणाचे रहस्य उलगडण्याची शक्यता नाही.

