गणेश विसर्जनाच्या निम्म्या ‘ट्रिमिक्स’ मार्गाचे पालिकेकडूनच ‘विसर्जन’! पालिका प्रवेशद्वार ते तेलीखुंटापर्यंत डांबरीकरणासाठी निविदा निघाल्याने झाले स्पष्ट
नायक वृत्तसेवा, संगमनेर
साडेतीन वर्षांपूर्वी ठराव झालेल्या संगमनेरच्या गणेश विसर्जन मिरवणूकीच्या निम्म्या ‘ट्रिमिक्स’ मार्गाचेच विसर्जन झाल्याचे समोर आले आहे. पालिकेच्या सर्वसाधारण बैठकीत हा विषय चर्चेत येवून संपूर्ण विसर्जनमार्गाच्या दरवर्षीच्या दुरुस्तीपेक्षा एकदाच त्याचे काँक्रिटीकरण करण्यात यावे असा ठराव सर्वानुमते मंजूर झाला होता. मात्र प्रत्यक्षात एक कोटी रुपये खर्च करुन केवळ रंगारगल्ली ते गवंडीपुरा मशिदीपर्यंतचाच मार्ग तयार करण्यात आला असून पालिकेच्या मुखी या मार्गालाच विसर्जनाचा ‘मुख्य मार्ग’ म्हणून एकप्रकारे मान्यता मिळाल्याचे त्यावरुन सिद्ध होत आहे.
संगमनेरच्या गणेशोत्सवास सव्वाशेहून अधिक वर्षांची मोठी परंपरा आहे. दरवर्षी मानाचा पहिला गणपती असलेल्या सोमेश्वर रंगारगल्ली मंडळाच्या गणरायापासून मुख्य विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होते. रंगारगल्ली, चंद्रशेखर चौक, नेहरु चौक, तेलीखुंट, सय्यदबाबा चौक, नवघर गल्ली, मेनरोड, महात्मा फुले चौक, नगरपालिका आणि पुढे प्रवरा नदीपात्रापर्यंतचा मार्ग विसर्जनाचा मुख्य मार्ग म्हणून ओळखला जातो. दरवर्षी गणेशोत्सवापूर्वी पालिकेकडून या मार्गावरील खड्डे बुजविले जातात. त्यासाठी दरवर्षी पालिकेला आर्थिक तरतूद करावी लागत. अनेकदा विसर्जन मार्गावरील खड्डे तसेच राहिल्याने शहरात पालिकेबाबत असंतोष निर्माण झाल्याचेही दाखले आहेत.
यावर कायमस्वरुपी तोडगा म्हणून 10 ऑक्टोबर 2017 साली झालेल्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत एक कोटी रुपये खर्च करुन गणेश विसर्जन मिरवणुकीच्या मार्गाचे ट्रिमिक्स पद्धतीने काँक्रिटीकरण करण्याचा ठराव मांडण्यात आला. संगमनेरातील विसर्जन मिरवणुकीला ऐतिहासिक वारसा असल्याने शहर विकास आराखड्यात सदरचा मार्ग रहिवास क्षेत्रात असल्याबाबत नगर अभियंत्याची खात्री पटवून सदर कामाचे अंदाजपत्रक तयार करुन त्यास सक्षम प्राधिकरणाची तांत्रिक मंजुरी घेवून निधीच्या उपलब्धतेनुसार पालिका फंडातून अथवा शासकीय निधीतून करण्यास सभेने एकमुखी मंजुरी दिली होती.
प्रत्यक्षात संगमनेरच्या मुख्य गणेश विसर्जन मिरवणुकीचा मार्ग रंगारगल्लीतून सुरु होवून रंगारगल्लीतच संपतो. त्यामुळे या मार्गाचा आराखडा मंजूर करताना पालिकेने सन 2017 मधील सर्वसाधारण बैठकीत भडंगबुवा मशिद ते गवंडीपुरा मशिद आणि महात्मा फुले चौक ते रंगारगल्ली असा करणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात मात्र पालिकेने केवळ गवंडीपुरा मशिदीपर्यंतच्या मार्गालाच विसर्जन मार्गाचा दर्जा देवून या भागात ट्रिमिक्स पद्धतीचा रस्ता गेल्या वर्षी पूर्ण केला. पुढील राहिलेला रस्ता लवकरच पूर्ण होईल अशी संगमनेरकरांना अपेक्षा असतांना त्या अपेक्षांचा आता भंग झाल्याचे समोर आले आहे.
पालिकेच्या 31 जानेवारी, 2020 रोजी झालेल्या सर्वसाधारण बैठकीत ठराव क्रमांक 245 अन्वये शहरातील विविध सहा ठिकाणच्या रस्त्यांचे डांबरीकरण करण्याच्या प्रस्तावाला मंजूरी दिली. त्या ठरावात विसर्जन मिरवणुकीचाच भाग असलेल्या महात्मा फुले चौक (पालिका प्रवेशद्वार) ते तेलीखुंट या मार्गाच्या डांबरीकरणाच्या कामासाठी 12 लाख 23 हजार 843 रुपयांची निविदा काढण्यात आली. दोन दिवसांपूर्वी प्रत्यक्ष या कामाचा शुभारंभही झाला. मात्र दोन नगरसेवकांच्या मतभेदामुळे प्रत्यक्षात काम सुरू होवू शकले नसल्याची चर्चा आहे. यावरुन पालिकेने संगमनेरच्या गणेश विसर्जन मिरवणुकीच्या निम्म्या ‘ट्रिमिक्स’ रस्ताचेच विसर्जन केल्याचे स्पष्ट झाले आहे.
पालिका प्रवेशद्वार (म.फुले चौक) ते तेलीखुंट या मार्गावर पालिकेचा सत्कार स्वीकारुन मानाचा रंगारगल्ली मंडळाचा गणपती गांधी चौकापर्यंत जावून नंतर खालच्या बाजूला वळतो. तर राजस्थान युवक मंडळ, विवेकानंद मंडळ या मानाच्या गणरायांसह काही अन्य मंडळे याच मार्गाने विसर्जन मिरवणुकीत सहभागी होतात. मात्र आता या मार्गाच्या काँक्रिटीकरणाचीच निविदा निघाल्याने दोन नगरसेवकांमध्ये त्यावरुन मोठे मतभेद झाल्याची चर्चा कानावर आली असून एका नगरसेवकाने या मार्गाचे काँक्रिटीकरणच व्हावे असा पवित्रा घेतल्याची माहिती मिळत आहे. अनेक नागरिकांनीही या मार्गाचे काँक्रिटीकरणच करण्यात यावे असा सूरही लावला आहे.