जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध : आ.खताळ

नायक वृत्तसेवा, संगमनेर
महायुती सरकारच्या माध्यमातून आपण तालुक्यातील सर्व गावांमध्ये विकासकामे करणार आहोत. सर्व रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण करण्यात येणार असून ठेकेदारांची मर्जी न राखता कामाच्या दर्जाकडे लक्ष दिले जाणार आहे. संगमनेरातील सर्वच गावांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला.

तालुक्यातील नांदुरी दुमाला येथे जिल्हा नियोजनमधून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या नांदुरी दुमाला ते ठाकरवाडी रस्ता मजबुतीकरण करणे २ लाख रुपये, जनसुविधा विशेष अनुदान योजनेमधून नांदुरी दुमाला येथे गाव अंतर्गत रस्ता करणे १० लाख रुपये, ग्रामपंचायत १५ वित्त आयोगातून जिल्हा परिषद शाळा भिंत बांधकाम करणे ३ लाख १८ हजार, कचरा विलगीकरण शेड बांधणे २ लाख रुपये, महालक्ष्मी मंदिर परिसरात शौचालय मुतारी बांधणे ३ लाख, भूमिगत गटार बांधणे ३ लाख रुपये रस्ता मजबुतीकरण करणे तसेच हनुमान मळा रस्ता मजबुतीकरण करणे २ लाख रुपये आणि शिवरस्ता मजबुती करण करणे दीड लाख रुपये अशा एकूण ६० लाख रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचा शुभारंभ आ. अमोल खताळ यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

अध्यक्षस्थानी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते माधव कवडे होते. यावेळी व्यासपीठावर सरपंच निखिल निळे, उपसरपंच सोनबा पथवे, शिवसेना तालुकाप्रमुख रामभाऊ राहाणे,भाजप राज्य परिषद सदस्य दादाभाऊ गुंजाळ, भाजपचे उपाध्यक्ष अशोक कानवडे, दिलीप कोल्हे, सुनील कानवडे,शिवसेनेचे ॲड. मिनानाथ शेळके, माजी सरपंच अर्चना शेळके, अर्चना शेटे,सुमन शेटे, सोमनाथ नेहे, संजय कवडे, संदीप शेटे,संपत कानवडे, किसन शेटे, सूर्यभान शेटे यांच्यासह नांदुरी दुमाला परिसरातील महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

आ.खताळ म्हणाले की, गेल्या चाळीस वर्षांपासून या तालुक्यात काहीनी केवळ स्वतःच्या तुंबड्या भरण्याचे काम केले आहे. त्यांनी गोरगरीब जनतेच्या जीवावर अन्यायकारक प्रथा रुजवल्या. पण आता हे सगळं बंद होणार आहे. नवीन विजेचे रोहित्र घेण्यासाठी कोणालाही एक रुपया ही देऊ नका, जर कोणी मागत असेल तर मला सांगा. त्यांनी पैसे घेण्याची वाईट प्रथा पाडून ज्या खुट्ट्या ठोकल्या आहेत, त्या खुट्ट्या काढण्यासाठी थोडा वेळ लागेल परंतु त्या शंभर टक्के काढल्या शिवाय आपण राहणार नाही असाही विश्वास आमदार खताळ यांनी व्यक्त केला.

तालुक्यातील कार्यकर्ते हे माझे कुटुंब आहे. त्यांच्याकडे कोणी वाकड्या नजरेने पाहिलं, तर गाठ माझ्याशी आहे हे लक्षात ठेवावे असा इशारा देत ते म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे त्रिदेव आपल्या मागे भक्कमपणे उभे आहेत. पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी तर माझे पालकत्व घेतले आहे, त्यामुळे विकास निधी आणण्यासाठी कुठलीही अडचण येणार नाही. त्यामुळे तुमच्या गावासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही असा ही विश्वास त्यांनी व्यक्त केला.

गावात काही लोक पुढारी होतील, त्यांच्याशी अजिबात स्पर्धा करू नका. त्यांनी जे केलं त्याचा आदर ठेवा, कोण काय बोलतो त्याकडे लक्ष देऊ नका. ते तुमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करतील. परंतु त्याकडे दुर्लक्ष करून आपले काम प्रमाणिकपणे करत रहा असा सल्लाही आमदार खताळ यांनी कार्यकर्त्यांना दिला.

प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची इमारत बांधून पूर्ण झाली आहे. मात्र ते अद्याप सुरू झालं नाही. माजी सरपंच मीनानाथ शेळके यांनी हा मुद्दा आपल्या निदर्शनास आणून दिला आहे. त्यावर आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समवेत मुंबईत बैठक घेतली. लवकरच कर्मचारी भरती करून हे आरोग्य उपकेंद्र सुरू केलं जाईल आणि त्याचा शुभारंभ देखील पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते केला जाईल. असेही आमदार खताळ यांनी सांगितले.

Visits: 90 Today: 2 Total: 1105713
