विटंबनेच्या प्रकरणातून ‘वक्फ’च्या मनमानीवर प्रकाश! श्री बुवासिद्धबाबा मंदिराचे प्रकरण; राहुरी तालुक्यात कडकडीत बंद..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
बुधवारी दुपारी राहुरी शहरातील श्री बुवासिद्धबाबा मंदिरालगत असलेल्या व्यायामशाळेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली. त्यावरुन सध्या राहुरीत तणावपूर्ण शांतता असून विविध हिंदुत्त्ववादी संघटना आणि सकल हिंदू समाजाच्या आवाहनावरुन संपूर्ण तालुक्यात आज कडकडीत बंद पाळला जात आहे. सोलापूरकर, कोरटकर या वाचळवीरांच्या तोंडातून निघालेल्या अवमानकारक शब्दांनी राज्यात शिवप्रेमींचा संताप अनावर झालेला असताना राहुरीत छत्रपतींच्या प्रतिमेचीच विटंबना झाल्याने राज्यभर त्याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. प्रथमदर्शनी या विटंबना प्रकरणाला वेगळी पार्श्‍वभूमी असल्याचेही समोर आले असून ‘महाराष्ट्र वक्फ बोर्डाने’ या मंदिराच्या इनामी जमीनींवर दावा ठोकल्यानेच आंदोलनाचे स्वरुप व्यापक झाल्याची चर्चा आहे. त्यामुळेच विटंबनेच्या प्रकरणावरुन आता मंदिरालगतचे अनधिकृत बांधकाम हटवण्यासह ‘वक्फ’च्या मनमानीवरही प्रकाश टाकण्यात आला आहे.


राहुरी शहरातील कोळीवाडा भागात श्री बुवासिद्धबाबा यांचे मंदिर असून राहुरीकर ग्रामदैवत म्हणून त्याची पूजा करतात. तर, मुस्लिमांनी सदरची समाधी ‘हजरत सय्यद अहमद चिस्ती’ यांची असल्याचा दावा करीत मंदिराच्या आसपास मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम करुन आपला दावा अधिक प्रबळ करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. गेल्या तीन-चार वर्षात अशा प्रकारच्या प्रयत्नांमध्ये सातत्याने वाढ होत गेल्याने दुसर्‍या बाजूच्या समाजामध्ये त्याबाबत खद्खद् साचत गेली. त्यातच सन 2022 मध्ये या मंदिराला इनामी मिळालेल्या जमीनींच्या इतर हक्कात ‘महाराष्ट्र वक्फ बोर्ड’च्या नोंदीही केल्या गेल्याने गुह्यानंतर राहुरीतील देवस्थानाचा वाद पेटण्याची चिन्हे दिसू लागली होती. बुधवारच्या घटनेने या विषालाही हवा मिळाली आणि छत्रपतींच्या पुतळ्याची विटंबणा करणार्‍यांना अटक करण्यासोबतच मंदिराच्या इनामी जमीनींसह अनधिकृत बांधकामाचा विषयही समोर आणण्यात आला.


श्री बुवासिद्धबाबा यांच्या मंदिरालगतच व्यायामशाळा आहे. अन्य ठिकाणच्या व्यायामशाळांप्रमाणेच येथेही महाबलि हनुमानाची मूर्ती आहे व त्या शेजारीच छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धाकृती पुतळा बसवण्यात आला आहे. शहरातील अनेक तरुण दररोज सकाळ-संध्याकाळ इथे जातात आणि पारंपरिक पद्धतीने व्यायामही करतात. त्यामुळे राहुरीचे वातावरण अशांत करण्याचे षडयंत्र करणार्‍याने दुपारची वेळ निवडली आणि सध्या राज्यात तापत असलेल्या विषयालाच स्पर्श करीत तालमीत असलेल्या बजरंगबलीची मूर्ती सोडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची विटंबणा केली. विशेष म्हणजे हा प्रकारही दुपारीच लक्षात आला आणि लागलीच शेकडों तरुणांनी एकत्रित येत जोरदार घोषणाबाजी आणि नंतर अहिल्यानगर-मनामाड महामार्गावर रास्तारोको केला.


राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले बैठक सोडून राहुरीत धावले आणि त्यांनी विटंबनेचा निषेध करीत येथील हिंदू समाजाच्या मनातील सगळी खद्खद् बोलून टाकली. तेव्हाच या प्रकरणाला पार्श्‍वभूमी असल्याचे दिसून आले होते. त्याचा प्रत्यय राहुरीतील सकल हिंदू समाजाच्यावतीने पोलीस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनातही दिसून आला आहे. या निवेदनात शहरातील श्री बुवासिद्धबाबा समाधीबाबत राहुरीकरांच्या मनात असलेली श्रद्धा, दररोज दर्शनासाठी होणारी भाविकांची गर्दी आदी गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. याच निवेदनात मंदिराच्या दिवाबत्तीसाठी मिळालेल्या स्थावर मालमत्तेवर डोळा ठेवून त्या गिळंकृत करण्याचे पद्धतशीर षडयंत्र राबवले जात असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे.


राहुरीकरांचे ग्रामदैवत असलेल्या या मंदिराला दर्गा असल्याचे भासवले जात असून त्याचे मूळस्वरुप बदलण्याचे प्रकार सुरु आहेत. त्यासाठी मंदिराच्यालगतच अतिक्रमण करुन मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम करण्यात आले असून मंदिरावर लावलेला ‘श्री बुवासिद्धबाबा मंदिर’ असा फलक हटवून त्याजागी ‘हजरत सय्यद अहमद चिस्ती’ असा फलक लावला गेल्याचाही दावा करण्यात आला आहे. संबंधितांनी नगरपालिकेत चुकीची कागदपत्रे सादर करुन नावात केलेला बदल ‘खरा’ असल्याचे भासवले जात असल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला आहे. या मंदिराच्या नावे असलेल्या सर्व इनामी जमीनींच्या इतर हक्कात 2022 साली ‘महाराष्ट्र वक्फ बोर्ड’ या नावाच्या नोंदी घेण्यात आल्या असून सदर देवस्थानच मुस्लिम धर्मियांचे असल्याची नोंद ‘वक्फ’ने नोंदवली आहे.


या षडयंत्राचा परदाफार्श करणार्‍या तरुणांना वेगवेगळ्या प्रकरणात फसवून त्रास देण्याचे प्रयत्नही केले जात असल्याचे निदर्शनास आणून देताना सदरचे मंदिर आणि त्याच्या इनामी जमीनी श्री बुवासिद्धबाबा यांच्याच असून मंदिरालगत बेकायदा करण्यात आलेले बांधकाम तत्काळ हटवण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे गुह्यानंतर आता राहुरीतील देवस्थानाचा वाद पेटण्याची चिन्हे दिसू लागली असून छत्रपतींच्या पुतळ्याची विटंबणा करण्याच्या प्रकरणावरुन हा संपूर्ण वाद राज्यात चर्चीला जाण्याची शक्यता आहे. विटंबणेच्या प्रकरणातून ‘वक्फ’ची मनमानी उघड झाल्याने पोलिसांचाही संभ्रम होण्याची शक्यता असून या प्रकरणाचा दोन्ही एँगलने तपास करावा लागणार आहे.


शहरातील श्री बुवासिद्धबाबा तालमीतील पुतळा विटंबणा प्रकरणाची माहिती आमदार शिवाजी कर्डिले यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचल्याने राहुरी प्रकरण यापूर्वीच राज्याच्या पटलावर आले आहे. या प्रकरणावरुन आज संपूर्ण राहुरी तालुक्यात कडकडीत बंदही पाळला जात असल्याने संपूर्ण प्रकरणाचे गांभीर्यही वाढले आहे. त्यातच विटंबणा प्रकरणातून राहुरीतील ‘वक्फ बोर्डा’ची मनमानीही समोर आल्याने आगामी काळात श्री बुवासिद्धबाबा मंदिराचा आणि त्यांच्या स्थावर मालमत्तांचा विषय दीर्घकाळ चर्चेत राहण्याची शक्यता आहे.

Visits: 33 Today: 1 Total: 392632

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *