तालुक्याच्या रुग्णवाढीला लागलेला ब्रेक आजही कायम..! शहरातील दोघांसह तालुक्यातील 13 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्याच्या रुग्णवाढीला विजयादशमीच्या निमित्ताने लागलेला ब्रेक आजही कायम असून आज केवळ रॅपिड अँटीजेन चाचण्यांचे अहवाल समोर आले आहेत. त्यातून शहरातील अवघ्या दोघांसह तालुक्यातील एकूण 13 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्यामुळे तालुक्याची रुग्णसंख्या आता 4 हजार 117 वर पोहोचली आहे. रविवारी खासगी व शासकीय प्रयोगशाळेकडून रुग्णांचे स्राव स्विकारले जात नसल्याने आजच्या अहवालात या दोन्ही ठिकाणाहून आलेल्या बाधितांची नोंद नसल्याने आजची रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात खालावली आहे.
एक ऑक्टोबरपासून कोविडच्या संक्रमणातून संगमनेरकरांना काहीसा दिलासा मिळत आहे. त्यामुळे तालुक्यातील संक्रमणाचा वेग नियंत्रित झाल्याने त्याचा परिणाम रुग्ण संख्येवर होताना दिसत आहे. गेल्या 26 दिवसात तालुक्यात सरासरी 35 रुग्ण दररोज या गतीने रुग्ण समोर आले आहेत. तर गेल्या महिन्यात हीच सरासरी तब्बल 52 रुग्ण प्रति दिवस इतकी होती. त्यामुळे या महिन्यात तालुक्यातील कोविड संक्रमणात घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. याच श्रृंखलेत आज रॅपिड अँटीजेन चाचणीतून 13 जणांचे अहवाल समोर आले असून त्यात शहरातील केवळ दोघांचा समावेश आहे.
आज प्राप्त झालेल्या अहवालातून शहरातील साईनगर परिसरात राहणाऱ्या 55 वर्षीय महिलेसह सूर्यनगर या अनोळखी ठिकाणाहून 39 वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव आला आहे. त्यासोबतच ग्रामीण भागातील निमगाव बुद्रुक येथील 45 वर्षीय तरुण, वरुडी पठार येथील 29 वर्षीय महिला, आश्वी बुद्रुक मधील 27 वर्षीय तरुण, घुलेवाडी येथील 23 वर्षीय महिला, मनोली येथील 35 व 18 वर्षीय महिलेसह 13 वर्षीय बालिका व खांडगाव शिवारातील 57 वर्षीय इसमाला कोविडचे संक्रमण झाले आहे. आजच्या रुग्ण संख्येने तालुक्यातील बाधितांचा आकडा 4 हजार 117 वर पोहोचला आहे.