डॉ. सागर हासेंनी राजापूरसह तालुक्याचे नाव उज्ज्वल केले ः आ. डॉ. तांबे राजापूर येथे प्रा. आनंदा हासे व डॉ. सागर हासे यांचा नागरी सत्कार
नायक वृत्तसेवा, संगमनेर
सध्याचे जग हे सुपरस्पेशालिस्टिचे युग आहे. त्यामुळे माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये डॉ. सागर हासे यांनी केवळ गुणवत्तेच्या जोरावर वैद्यकीय क्षेत्रातील एम. बी. बी. एस. आणि एम. डी. मेडिसीन ही उच्चतम पदवी मिळवली. यामुळे राजापूरचे नव्हे तर संगमनेर तालुक्याचे नाव उज्ज्वल केले असल्याचे गौरवोद्गार नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी काढले.
संगमनेर तालुक्यातील राजापूर येथील नूतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे इंग्रजी विषयाचे प्रा. आनंदा हासे व वडगाव लांडगा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका नंदा हासे (वलवे) यांचे सुपुत्र डॉ. सागर हासे यांनी पुणे येथील नामांकित बी. जे. मेडिकल कॉलेजमधून एम. बी. बी. एसची पदवी प्राप्त केली. तसेच प्रवरा मेडिकल ट्रस्टमधून एम. डी. मेडिसीन ही वैद्यकीय क्षेत्रातील पदवीत्तर पदवी मिळविली. तसेच नूतन उच्च माध्यमिक विद्यालयाच्या 35 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाल्याबद्दल प्रा. आनंदा हासे या पिता-पुत्रांचा राजापूर ग्रामस्थांच्यावतीने नागरी सत्कार करण्यात आला. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण समितीच्या सभापती मीरा शेटे, जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे, मिलिंद कानवडे, अजय फटांगरे, उपसभापती नवनाथ अरगडे, पंचायत समिती सदस्य विष्णूपंत रहाटळ, संगमनेर दूध संघाचे संचालक अॅड. बाबासाहेब गायकर, थोरात साखर कारखान्याचे उपाध्यक्ष संतोष हासे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष माधव हासे, म्हाळुंगेश्वर दूध संस्थेचे उपाध्यक्ष पी. डी. हासे, तंटामुक्ती समितीचे गणपत सोनवणे, सेवानिवृत्त प्राचार्य अशोक जाधव, सत्कार समितीचे अध्यक्ष शरद हासे, आर. डी. हासे, बाळासाहेब सोनवणे, सुनील हासे, भारत हासे, भाऊसाहेब हासे, बाळासाहेब हासे, सोमनाथ सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना आमदार डॉ. तांबे म्हणाले, शिक्षण संस्था नुसत्या इमारतीवर मोठ्या होत नाही, तर त्या शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना शिक्षक कसे शिकवितात त्यावरच खर्या अर्थाने त्या शिक्षण संस्थेचे भवितव्य अवलंबून असते. अशा या प्रागतिक शिक्षण संस्थेत प्रा. आनंद हासे यांच्या सारख्या शिक्षकांनी अध्यापनाचे काम केले आहे म्हणून या संस्थेचे तालुक्यातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देणार्या शिक्षण संस्थेत नाव घेतले जाते. याचबरोबर पुण्याच्या नामांकित असणार्या बी. जे. मेडीकल कॉलेजमध्ये पुणे, मुंबई, नाशिक यांसारख्या मोठ्या शहरातील डॉक्टर, इंजिनियर यांच्याच मुलांचा नंबर लागतो. मात्र डॉ. सागर हासे यांच्या सारख्या ग्रामीण भागातील एका शिक्षकाच्या मुलाचा केवळ गुणवत्तेच्या जोरावरच ही गावाच्या नव्हे तर तालुक्याच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे. त्यामुळे डॉ. सागर हासे यांनी आपला वैद्यकीय व्यवसाय संगमनेर सारख्या शहरामध्ये न करता नाशिक, पुणे व मुंबई यांसारख्या मोठ्या शहरात करावा असा सल्लाही डॉ. तांबे यांनी दिला.
सत्काराला उत्तर देताना प्रा. आनंदा हासे म्हणाले, माझ्या पस्तीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेत मला ज्यांनी मार्गदर्शन करत साथ दिली. तसेच ज्या प्रागतिक शिक्षण संस्थेत मी अध्यापनाचे काम केले त्या संस्थेबद्दल कृतज्ञ आहे. तर वैद्यकीय क्षेत्रातील सुपरस्पेशालिस्ट अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा मनोदय डॉ. सागर हासे यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केला. सूत्रसंचालन माधव हासे यांनी केले. प्रास्ताविक माजी सेवानिवृत्त प्राचार्य अशोक जाधव यांनी केले तर आभार डॉ. भाऊसाहेब हासे यांनी मानले.