‘आधार’ची शशीकला झाली बीई इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर पुणे येथील नामांकित कंपनीत मिळाले 8.5 लाखांचे पॅकेज
नायक वृत्तसेवा, संगमनेर
आईवडील दुर्धर आजाराने वारले… भाऊ वेठबिगार.. रोजंदारीवर हॉटेलमध्ये काम करून घर चालवायचा. वयोवृद्ध आजी भाजीपाला विकायची अशा संकटात शिक्षण थांबण्याची परिस्थिती आली. परंतु, अशा परिस्थितीत संगमनेरातील आधार फाऊंडेशन धाऊन आले अन् उच्च शिक्षण घ्यायला बळ मिळाले. त्यातूनच शशीकला एरंडे ही बीई इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर होवून पुणे येथील अॅसेंचर सोल्युशन लिमिटेड कंपनीत तब्बल 8.5 लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज मिळाले आहे.
संगमनेर शहरातील रहाणे मळा येथे शशीकला छोट्याशा घरात आजीसह राहते. चौथीला असताना वडिलांचे दुर्धर आजाराने तिचे छत्र हरवले. त्यामुळे परिस्थिती हलाखीची झाली. प्राथमिक शिक्षण पेटीट विद्यालयात तर माध्यमिक आंबरे पाटील विद्यालयात झाले. पण परिस्थितीमुळे वही आहे तर पेन नाही अशी परिस्थिती झाली. आईही नेहमी आजारी असायची, दोन भाऊ कुवत नसल्याने शाळा सोडून मजुरी करू लागले. आजी भाजीपाला विकून चार पैसे आणायची अन् कुटुंब चालायचे. ‘तू खूप शीक शशीकला, इंजिनिअर हो मी मदत करीन’ असा आशीर्वाद आजीकडून मिळायचा. त्यातूनच शिकायला बळ मिळाले.
बारावीनंतर आईचेही दीर्घ आजाराने निधन झाले. परंतु, शशीकलाने जिद्द सोडली नाही. अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजला नंबर लागला. पण फी भरायची पंचायत झाली. आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी फीसाठी मदत केली. तेथेच आधारचे सुखदेव इल्हे यांची ओळख झाली. अन् पुढचं शिक्षण सोपं झालं. शैक्षणिक दत्तक पालक योजनेतून दरवर्षी वह्या-पुस्तके, शूज, सॅकची मदत झाली. यातून खूप मोठा आधार मिळाला. आधारनं दरवर्षी 5-10 हजारांची मदत केली. वेळेला झालेली ही मदत लाखमोलाची होती. अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ती टॉपर राहून दोन वर्षांपूर्वी शिक्षण पूर्ण केले. दरम्यान, कोरोना काळात अनेकांच्या नोकर्या गेल्या. मात्र, शशीकलाला टाटा कम्युनिकेशन लिमिटेड पुणे या कंपनीत 3.2 लाखांचे पॅकेज मिळाले. तो तिच्या जीवनातील अत्युच्च क्षण होता.
त्यानंतर आजीचे स्वप्न साकार झाल्याने तिचाही आनंद गगनाला भिडला होता. ती मनोमन जीवनात उभं करणार्या आधार फाऊंडेशनचे आभार मानत होते. आता ती अॅसेंचर सोल्युशन लिमिटेड कंपनीत क्लाऊड अॅनालिस्ट या पदावर काम करत असून 8.5 लाखांचे पॅकेज मिळाले आहे. परंतु, हे पाहण्यासाठी तिची आयडॉल राधाआजी या जगात नसल्याचे दु:ख तिला होत आहे. ही आनंदाची बातमी इल्हे सरांना सांगून शशीकलाने तत्काळ 5 हजार रुपये आधार संस्थेसाठी ऑनलाईन पाठविले.
‘आधार’नं मला उभं केलं. माझ्यासारखी अनेक भावंडं आजही शिक्षणाच्या मदतीसाठी आधारच्या दारात मोठ्या आशेनं उभी आहेत. मी मोठी बहीण म्हणून त्यांच्यासाठी पहिला मदतीचा हात दिला आहे. यापुढेही देत राहील.
– शशीकला एरंडे (इंजिनिअर)