धावणार्‍या तरुणीचा हृदयविकाराने मृत्यू वनरक्षकपदी झाली होती नेमणूक; चाचणीपूर्वीच झाला घात..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
स्पर्धा परिक्षेसाठी धावण्याचा सराव करणारी 25 वर्षीय विवाहित तरुणी अचानक अत्यवस्थ होवून हृदयविकाराच्या धक्क्याचे मृत्यू पावल्याची धक्कादायक घटना संगमनेरातून समोर आली आहे. वेदनादायक म्हणजे सदर तरुणीची वनरक्षकपदी निवडही झाली होती, पुढील आठवड्यात होणार्‍या शारीरिक चाचणीची तयारी करीत असताना काळाने तिचा घात केला. मनीषा दीपक कढणे (वय 25, रा.चंदनापूरी) असे मृत तरुणीचे नाव असून तिला सहा वर्षांचा मुलगाही आहे. या घटनेने संपूर्ण तालुक्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे.


याबाबत मिळालेल्या माहितीुनसार सदरची घटना आज सकाळी सातच्या सुमारास सह्याद्री करिअर अकादमीच्या गोल्डनसिटी परिसरात असलेल्या मैदानावर घडली. या अकादमीच्या माध्यमातून स्पर्धा परिक्षेची तयारी करणार्‍या मनीषा दीपक कढणे या तरुणीची राज्याच्या वनविभागात वनरक्षक म्हणून निवडही झाली होती. त्यांना लेखी परिक्षेत 92 गुण प्राप्त झाले होते. पुढील आठवड्यात त्यांची शारीरिक चाचणी होणार होती, त्यानंतर प्रशिक्षण आणि नियुक्ति असा त्यांचा प्रवास ठरलेला होता.


शारीरिक चाचणीत कोठेही कमी पडता कामा नये यासाठी ही तरुणी परिश्रम घेत होती. आज सकाळी नेहमीप्रमाणे तिने मैदानावर दोन राऊंड पूर्ण केले, तिसरा राऊंड मारण्यासाठी धावत असतानाच अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने ती जमिनीवर कोसळली. यावेळी अकादमीतील अन्य विद्यार्थी व प्रशिक्षकही तेथे असल्याने त्यांनी तत्काळ मनीषा कढणेकडे धावत जावून विचारणा करण्याचा प्रयत्न केला असता त्या अत्यवस्थ असल्याचे लक्षात आले. तातडीने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तत्पूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.


शवविच्छेदनातून त्यांचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष समोर आला आहे. मयत मनीषा कढणे अतिशय मेहनती आणि हुशार होत्या. शासकीय खात्यात अधिकारी होण्याचे त्यांचे स्वप्न होते. त्यासाठी लग्नानंतरही त्यांनी प्रयत्न सोडले नाही. त्यात त्यांना यश मिळालेले असतांना नियुक्तिपूर्वीच काळाने घाव घातल्याने तालुक्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे. मयत कढणे यांच्यावर चंदनापूरीत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले, यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

Visits: 218 Today: 1 Total: 1116743

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *