ब्राह्मणवाडा येथील शासकीय वसतिगृहात निकृष्ट जेवण स्थानिक ग्रामस्थांनी उघडकीस आणला धक्कादायक प्रकार
नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यातील ब्राम्हणवाडा येथील शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निकृष्ट आणि अपुरे जेवण मिळत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याची संबंधित ठेकेदार आणि प्रशासनाने दखल घेऊन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
आदिवासी विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे दर्जेदार सोयी-सुविधा मिळाव्यात म्हणून शासनाने आदिवासी वसतिगृहांची निर्मिती केली आहे. यासाठी शासन करोडो रुपये खर्च देखील करत आहे. मात्र, विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणारे जेवण, अपुर्या भौतिक सुविधा आणि शैक्षणिक साहित्य याबाबत वारंवार प्रश्न उपस्थित होत आहे. ब्राह्मणवाडा येथेही असाच प्रकार उघडकीस आला आहे. येथील वसतिगृहाच्या जेवणाचा ठेका औरंगाबाद येथील शगुण गृह उद्योगाने घेतलेला आहे. मात्र, त्यांनी हा ठेका दुसर्या ठेकेदाराला दिलेला असल्याचे समोर आले आहे.
उपसरपंच सुभाष गायकर, सदस्य शिवाजी आरोटे आणि इतर नागरिक शहानिशा करण्यासाठी वसतिगृहात गेले असता त्यांना दिवसभर आम्हांला जेवण भेटले नाही आणि रात्री सुद्धा जेवण आले नाही, अशी धक्कादायक हकीगत विद्यार्थ्यांनी सांगितली. त्यावर रात्री नऊ वाजेच्या सुमारास अधीक्षक विजय भारती यांनी विद्यार्थ्यांच्या जेवणाची सोय केली. दरम्यान, याबाबत प्रकल्प अधिकारी आणि तहसीलदार यांना कळविण्यात आले असून, लक्ष घालण्याची मागणी केली आहे. तसेच विद्यार्थ्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचेही उपसरपंच गायकर यांनी सांगितले.
शगुण गृह उद्योगाचे संचालक अशोक बंडगर यांच्याशी एका तरुणाने संपर्क केला असता त्यांनी ही जबाबदारीच झटकून टाकली. याशिवाय अर्वाच्च भाषेत बोलून अपशब्द वापरले. त्यामुळे संबंधिताची चौकशी करुन कारवाई करावी, अशी मागणी ‘त्या’ तरुणाने केली आहे.