… तर कामगार आयुक्त कार्यालयात बैठा सत्याग्रह करू ः डॉ.घुले
… तर कामगार आयुक्त कार्यालयात बैठा सत्याग्रह करू ः डॉ.घुले
नायक वृत्तसेवा, नेवासा
समर्पण मजदूर संघाच्या दीर्घकालीन प्रलंबित मागण्या आठवडाभराच्या आत पूर्ण न केल्यास कोरोनाबाधित कामगारांना सोबत घेऊन सहाय्यक कामगार आयुक्त विभाग कार्यालयात बेमुदत बैठा सत्याग्रह करणार असल्याचा इशारा संघाचे नेते डॉ.करणसिह घुले यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन नुकतेच सहाय्यक कामगार आयुक्तांना देण्यात आले आहे.
सदर निवेदनात नोंदणी व नूतनीकरण प्रदीर्घ काळापासून बंद आहे ते सुरू करावे, बाद कामगारांचे नूतनीकरण त्वरीत करून त्यांना योजना लागू कराव्यात, रुपये 5000 अर्थसहाय्य पात्र लाभार्थी याला कागदपत्रांच्या अपूर्ततेमुळे तांत्रिकदृष्ट्या अपात्र केले होते त्याचा लाभ त्यांना त्वरीत द्यावा, ऑनलाईन नोंदणी करताना अडचणी येतात त्या सोडवाव्यात, ज्यांचे ऑनलाईन नूतनीकरण होत नाही त्यांची ऑफलाईन व्यवस्था करावी. तसेच सर्व योजनांची अंमलबजावणी करून लाभ वाटप करावे. मयत लाभ, प्रसूती लाभ, शिष्यवृत्ती, प्रशिक्षण विद्यावेतन, लग्नासाठीचे अनुदान याचे त्वरीत वितरण करावे वरील सर्व मागण्या या जुन्याच असून यावर वेळोवेळी चर्चा होऊन आश्वासने देण्यात आलेली आहेत असे निवेदनात म्हटले आहे. याबाबत सहाय्यक कामगार आयुक्तांनी गांभीर्याने न घेतल्यास कोरोनाबाधित कामगारांना बरोबर घेऊन आयुक्त कार्यालयात बैठा सत्याग्रह करू असा इशारा समर्पण मजदूर संघाचे नेते डॉ.करणसिंह घुले यांनी दिला आहे.