‘थोरात’च्या निमित्ताने राज्यातील बदलत्या राजकारणाचे दर्शन! मुख्यमंत्र्यांची संगमनेरात अप्रत्यक्ष ‘एण्ट्री’; ‘रणशंख’ फुंकूनही विरोधकांची पीछेहाट..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच भगवा फडकल्याने मनोबल वाढलेल्या संगमनेरातील विरोधकांनी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कारखान्याच्या माध्यमातून माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सहकारालाच आव्हान देण्याची तयारी सुरु केली होती. नूतन आमदार अमोल खताळ यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेत महायुती पूर्ण ताकदीने निवडणूक लढणार असल्याचे रणशंखही फुंकले होते. त्यामुळे दहा वर्षानंतर कारखान्याच्या निवडणुकीचा आखाडा रंगणार असे चित्र निर्माण होत असतानाच उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिनी ‘प्रक्रियेवर’ बोटं ठेवून विरोधकांनी आश्‍चर्यकारकरित्या संपूर्ण माघार घेतली. अचानक घडलेल्या यासर्व घडामोडींमागे आमदार सत्यजीत तांबे यांची शिष्टाई कारणी लागल्याचेही बोलले गेले. मुख्यमंत्र्यांच्या दबावामुळेच संगमनेरच्या विरोधकांना तोंडघशी पडावे लागल्याची जोरदार चर्चाही सुरु असून त्यातून राज्याच्या बदलत्या राजकाराचे दर्शन घडू लागले आहे.


अवघ्या पाच महिन्यांपूर्वी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत संगमनेरच्या मतदारांनी परिवर्तनाची कास धरुन माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या चार दशकांच्या सत्तेला सुरुंग लावला. या निवडणुकीत अपवाद वगळता मतदार संघातील बहुतेक गावांनी महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांना पाठबळ दिल्याचे दिसून आल्याने आगामी कालावधीत होणार्‍या सर्वच निवडणुकांमध्ये थोरातांना विरोधकांचा कडवा सामना करावा लागणार अशी स्थिती निर्माण झाली होती. महायुतीचे कार्यकर्तेही तोच मनसुबा बाळगून वावरत होते. मात्र प्रत्यक्षात समोर आलेल्या पहिल्याच निवडणुकीत ‘रणशंख’ फुंकूनही विरोधकांची ऐनवेळी पीछेहाट झाली. खरेतर माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांची संपूर्ण ताकद सहकारात आहे. कारखाना निवडणुकीच्या माध्यमातून तब्बल दहा वर्षांनी त्यांना आव्हान देण्याची संधी विरोधकांना प्राप्त झाली होती.


उत्साही कार्यकर्ते सोडून कोणतीही यंत्रणा, मनुष्यबळ आणि पैसा उपलब्ध नसलेल्या आमदार अमोल खताळ यांनी कारखाना पूर्ण ताकदीने लढवणार असल्याची जाहीर घोषणाही केली. त्यांची ही घोषणा विखे पिता-पुत्रांशी चर्चा केल्याशिवाय परस्पर झाली असेल असे कोणी म्हणेल तर हमखास शंका निर्माण होईल. मात्र असे असतानाही ऐनवेळी विरोधकांनी पत्रकार परिषद घेत सहकार चळवळीतील नियमांवर बोटं ठेवून सभासदांची रक्कम भरुन घेणे, मयतांची नावे कायम ठेवणे, वारसांच्या नोंदी टाळणे, अकोल्याच्या सभासदांना उमेदवारीपासून अटकाव करणे, मयतांच्या यादीत संशयीत सभासदांची नावे घालणे अशी वेगवेगळी कारणं सांगत माघार घेत असल्याचे जाहीर केले. त्यातून राजकीय ‘संशय’ निर्माण झाला असून संगमनेरात नेमकं चाललंय काय? असा प्रश्‍न सामान्य माणसाला पडला आहे.


वास्तविक दक्षिणेतील पराभवामुळे थोरात-विखे यांच्यातील राजकीय वैर शिखरावर गेले. मात्र विधानसभेत थोरातांनाही पराभव पहावा लागल्याने त्याची फिट्टमफाटही झाली. त्यापूर्वीपर्यंत सहकाराच्या बाबतीत विखे-थोरात सख्य पाळतात असे बोलले जायचे. मात्र गेल्या वर्षभरात दोघांनीही एकमेकांच्या पराभवाला हातभार लावल्याने अशी कोणती गोष्ट घडेल अशी शक्यताही दिसून आली नव्हती. आमदार खताळांच्या घोषणेवरुन तर दोघांमधून आता विस्तवही जात नसल्याचे अधोरेखीत झाले होते. मात्र असे सगळे असतानाही विरोधकांची निवडणुकीतून संपूर्ण माघार अनेकांसाठी न उलगडणारे कोडे बनली आहे. मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या होकारानंतरच प्रत्यक्ष तयारी सुरु होवूनही घडलेला हा प्रकार राजकीय विश्‍लेषकांनाही बुचकळ्यात टाकणारा आहे.


भाजपच्या राजकारणावर दृष्टीक्षेप टाकल्यास राज्याच्या सर्वोच्च सत्तेत आल्यानंतर पक्ष विस्तार आणि स्वबळ यासाठीचा त्यांचा कार्यक्रम जोर पकडतो. राज्यातील प्रमुख अडथळा असलेल्या शिवसेनेसह राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर आता त्यांनी स्वतःच ‘शक्तिमान’ होवून पुढील लोकसभा आणि विधानसभा निवडणूक स्वबळाने लढवता येईल याची तयारी सुरु केली आहे. संगमनेरात महायुतीचा आमदार असतानाही पदवीधरच्या अपक्ष आमदाराला सरकारकडून मिळणारा प्रतिसाद हिच गोष्ट अधोरेखीत करणारा ठरतो. त्यातूनच महत्व वाढलेल्या अपक्ष आमदार सत्यजीत तांबे यांच्या माध्यमातून कारखान्याची निवडणूक टाळण्याची गळ घातली गेली असावी आणि भविष्यातील राजकीय गणितांचा विचार करुन मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप केला असावा अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्यातून राज्यातील बदलत्या राजकारणाचेही दर्शन घडत असून भविष्यातील निवडणुकीत संगमनेरात भाजपचाही उमेदवार असेल असे संकेत मिळू लागले आहेत.


सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतून भाजप संगमनेरात आपली ताकद निर्माण करीत असल्याचे चित्र दिसू लागले असून त्यासाठी पदवीधरचे आमदार सत्यजीत तांबे यांच्या पंखात बळ भरण्याचे काम सुरु असल्याची राजकीय चर्चा आहे. त्यामुळेच विखे पिता-पुत्रांच्या होकारानंतरच निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची घोषणा होवूनही ऐनवेळी आमदार अमोल खताळ यांच्यासह स्थानिक कार्यकर्त्यांना तोंडघशी पडावे लागले. यासर्व घडामोडी सूप्तपणे बदलणार्‍या राज्याच्या राजकारणाचे चित्र दाखवणार्‍या असून भविष्यात संगमनेरातही त्याचे प्रतिबिंब उमटण्याची दाट शक्यता आहे.

Visits: 46 Today: 4 Total: 423500

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *