अधिक मासात घरात राहूनच व्रतवैकल्ये करावीत ः भास्करगिरी महाराज
अधिक मासात घरात राहूनच व्रतवैकल्ये करावीत ः भास्करगिरी महाराज
भाविकांनी देवगडला न येता प्रशासनासह देवस्थानला सहकार्य करण्याचे आवाहन
नायक वृत्तसेवा, नेवासा
मंदिरे उघडण्याचा अजून कोणताही आदेश नसल्याने नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथे भाविकांनी दर्शनासाठी येण्याचे टाळावे. तसेच घरात राहूनच अधिक मासातील व्रतवैकल्ये करावीत, असे आवाहन गुरुदेव दत्त पिठाचे प्रमुख भास्करगिरी महाराज यांनी भाविकांना केले आहे.

कोरोनाच्या संकटामुळे जगभर संपूर्ण जनजीवन तथा आरोग्य यंत्रणा वेठीस धरली गेलेली आहे. संपूर्ण भारतभर वेगळ्या टप्प्यांमध्ये देश लॉकडाऊन होता. महाराष्ट्र शासनाने देखील लॉकडाऊनचे वेगवेगळे टप्पे जाहीर करत राज्यभर बंद पाळला गेला. त्यामध्येही शहर, गावे उत्स्फूर्तपणे जनता कर्फ्यू पाळून बंद करण्यात आली. जवळजवळ सहा महिन्यांचा कालावधी यामध्ये गेला; नाईलाजास्तव कोरोनाचे संकट दूर झालेले नसतानाही व्यवहार कुठेतरी पूर्ववत होताना दिसत आहेत.

परंतु मठ, मंदिरे, देवालये व इतर धार्मिक स्थाने खुली करण्याबाबत शासनाने कुठेलेही निर्देश जारी केलेले नाहीत. शासनाने मंदिरे बंद ठेवण्याचे आदेशित केल्यामुळे देवगड येथील श्री भगवान दत्तात्रेय मंदीर, श्री समर्थ सद्गुरु किसनगिरीबाबा समाधी मंदीर, पंचमुखी श्री सिद्धेश्वर मंदीर व इतर मंदिरे परिसरातील प्रसादाची दुकाने पान-फुल, नारळ, यात्री निवास, यात्री भवन, भक्त निवास, भोजनालय, प्रसादालय पूर्णतः बंद आहे. त्यामुळे बाजारपेठा सुरू झाल्या असल्या तरी देवालय बंद असल्या कारणाने कुणीही देवगडला येऊन गर्दी करू नये, आपली गैरसोय होईल, मंदीर परिसर महाद्वारापासूनच पूर्णपणे बंद आहे, त्याचप्रमाणे प्रवरा नदीपात्रात देखील मोठ्या प्रमाणावर पुराचे पाणी आहे. त्यामुळे पर्यटकांना देखील नदीपात्रालगत जाण्यास देवस्थानच्यावतीने मज्जाव करण्यात आलेला आहे.

पुरुषोत्तम मास हा हिंदू धर्मियांच्या पवित्र महिना आहे. या कालखंडामध्ये आपण आपल्या घरूनच व्रतवैकल्ये, उपासना करावी. श्रीदत्त मंदीर व इतर देवालयातील नित्य पूजा-विधी, आरती, हरिपाठ, श्रीमद् भगवदगीता पाठ, मंदिरात वास्तव्यास असलेले सेवेकरी, विद्यार्थी हे नित्य नियमाने करत आहेत. त्याचप्रमाणे तीन वर्षांनी येणारा पुरुषोत्तम मास यावर्षी सुरु झालेला आहे. यानिमित्ताने देवगडला अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन होत असते. परंतु कोरोनामुळे शासन निर्देशांनुसार कुठलीही गर्दी जमवण्यासाठी बंदी असल्याने नेहमी होणारा अध्यात्मिक उपक्रम खंडीत होवू नये म्हणून फक्त श्री क्षेत्र देवगड संस्थानचे विद्यार्थी सेवेकरी हे मंदिरातच मर्यादित अल्पसंख्येत भजन, पूजन करत आहेत. याकरीता भक्तांनी कृपया देवगडला येवून गैरसोय करुन घेवू नये. प्रशासन अथवा देवस्थानला सहकार्य करावे, असे आवाहन भास्करगिरी महाराजांनी केले आहे.

