माझ्या दत्तात्रयाला न्याय द्या; आईचा टाहो न्यायासाठी कुटुंब आणि गाव बसले साखळी उपोषणाला

नायक वृत्तसेवा, अकोले
अकोले तालुक्यातील घोटी गावचे ग्रामस्थ व कवटे कुटुंब मागील काही दिवसांपासून कै. दत्तात्रय सोमनाथ कवठे यांच्या संशयित मृत्यू प्रकरणी न्यायासाठी साखळी उपोषणाला बसले असून दत्तात्रय कवठे यांच्या आईने माझ्या दत्तात्रयाला न्याय द्या हो, असा टाहो फोडला आहे.

कै. दत्तात्रेय मागील १३-१४ वर्षांपासून सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यात योगेशवाडी येथे सचिन सुरेश साळुंखे यांच्या कुक्कुटपालन शेडवर काम करत होते. १४ मार्च रोजी त्यांचा तेथे संशयास्पद मृत्यू झाला होता.कवटे कुटुंबीयांनी त्यांच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी केली असता ती अद्याप पूर्ण झाली नाही, त्यामुळे त्यांनी साखळी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. दत्तात्रय कवठे यांच्या मृत्यू प्रकरणी आदिवासी अत्याचार प्रतिबंधक कलमांखाली गुन्हा दाखल करावा,सीआयडी किंवा एसआयटीमार्फत चौकशी व्हावी,प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे,केस अहिल्यानगर जिल्ह्यात चालवावी, जेणेकरून साक्षीदारांना न्यायालयात हजर राहता येईल अशा मागण्या केल्या आहेत. त्यामुळे कवठे कुटुंब आणि घोटी ग्रामस्थांचा आवाज सरकारने, प्रशासनाने ऐकावा, आणि दत्तात्रय यांना न्याय मिळवून द्यावा, अशी एकमुखी मागणी संपूर्ण परिसरातून केली जात आहे. न्याय न मिळाल्यास संपूर्ण तालुक्यात मोठे आंदोलन केले जाईल जाईल असा इशारा घोटी ग्रामस्थ व परिसरातील जनतेने दिला आहे.

आमदार डॉ. किरण लहामटे यांनी विधानसभेत लक्षवेधी उपस्थित करून हा प्रश्न मांडला.या तरुणाच्या मृत्यूचे खरे कारण, या घटनेची विशेष पथक किंवा सी.आय.डी. मार्फत चौकशी आणि मृताची आई व गावकऱ्यांच्या उपोषणाची सरकारने दखल घ्यावी अशी मागणी केली. गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी या प्रकरणात डॉ. लहामटे यांच्या आग्रहास्तव पुन्हा तपास करण्याचे आदेश दिले.

Visits: 159 Today: 6 Total: 1105233
