विद्यार्थ्यांनी गिरवला मतदानरूपी लोकशाहीचा पाठ

नायक वृत्तसेवा, लोणी 
 पाथरे बुद्रुक येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात विद्यालयस्तरीय विद्यार्थ्यांचे मंत्रिमंडळ निवडणूक मोठ्या उत्साहात आणि पारदर्शकतेने पार पडली. विशेष म्हणजे यामध्ये विद्यार्थ्यांनी ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन) चा वापर करत  मतदान प्रक्रिया कशी पार पडते याचा पाठ गिरवला.
या उपक्रमात विद्यार्थ्यांनी लोकशाही मूल्ये आत्मसात केली. निवडणुकीची पूर्ण प्रक्रिया शाळेत उभी करण्यात आली होती. त्यामध्ये उमेदवारांची निवड, अर्ज भरणे, प्रचार मोहीम, घोषणाबाजी, मते मागणे, अशा सगळ्या टप्प्यांचा समावेश होता. प्रचाराच्या दरम्यान विद्यार्थ्यांनी प्रचारफेऱ्या, बॅनर, पोस्टर, नारे, यांचा वापर करून वातावरण उत्साही केले होते. या निवडणूक प्रक्रियेत हर्षल कदम हा विद्यार्थी मुख्यमंत्री तर दिक्षा कडू ही उपमुख्यमंत्री म्हणून निवडून आले. यावेळी मुख्याध्यापक बारगुजे म्हणाले, विद्यार्थ्यांना लोकशाही शिक्षण प्रत्यक्ष कृतीतून मिळावे, हा उद्देश समोर ठेवून हा उपक्रम राबवण्यात आला. भविष्यात जबाबदार नागरिक आणि सजग मतदार घडविण्यासाठी असे उपक्रम अत्यंत महत्त्वाचे ठरतात. यावेळी उपमुख्याध्यापिका श्रीमती वाणी, पर्यवेक्षक  तांबे,शिक्षक, पालक, ग्रामस्थ उपस्थित होते.
Visits: 147 Today: 1 Total: 1849358

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *